Ad Code

Responsive Advertisement

कुंकू

 



नशेत त्याने बायकोवर परत एकदा हात उचलला. ती खोलीत एका कोपऱ्यात जाऊन दूरवर  दाणकन आपटली. बादलीची कडी तिच्या कपाळावर लागली. डोक्यातून भळाभळा रक्त वाहिलं. तिच्याकडे न पाहताच तो तसाच बाहेर निघून गेला. ती कशीबशी उठून बसली. अंग जड झालं होतं , वाहतं रक्त तिने पाण्याने धुवून टाकलं. डब्यातून हळद काढून पटकन  जखमेवर दाबली. थोडी झोंबली, तिने हात तसाच दाबून ठेवला. डोकं खूप दुखत होत. ८ वर्षाचं तिचं घाबरलेलं पोरगं तिच्या जवळ आलं. त्याने ग्लासात पाणी दिलं. ती घटाघट प्यायली. लेकाच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत ती खोटं हसली आणि म्हणाली, "ठिक आहे रे मी, हे रोजचंच आहे. तू खाऊन घे, चल जेवायला वाढते." तिने भाकरी थापली आणि आपल्या वाटची पोरालाच दिली. तिचं पोट रोज मार खाऊनच भरत होतं. आरश्यात उभी राहून तिने तिचं कुंकू नीट केलं. कुंकू जराही पुसलेलं तिला चालायचं नाही.


तिने किती वेळा समजवायचा प्रयत्न केला नवऱ्याला. पण बाटली काही सुटत नव्हती. रोज त्यासाठी त्यांची भांडण, वाद, मार ती अगदी कंटाळून गेली होती. नशिबाचे भोग म्हणत आला दिवस ढकलत होती. उपाशी पोटाला उपास करून अजून मारत होती. देवाला डोळे मिटून म्हणायची एक दिवस तरी नवरा सुधारेल आणि न पिता घरी येईल. पण तसा दिवस कधी आलाच नाही. एक रुपया कमवायचा नाही, त्याच्या रिकामटेकड्या मित्रांबरोबर रोज दिवसभर टवाळक्या करायचा. कोणाची जबाबदारी नको, फक्त पिणे,आणि उनाडक्या करत दिवसभर भटाकायचा.


त्याउलट ती हाडाच्या काड्या करून लेकरांना खाऊ घालत होती. दिवसभर राब राब राबून ४ पैसे लपवून ठेवायची नवर्यापासून. कधी कधी तेही राहायचे नाहीत. बाटलीसाठी तो ओरबाडून घ्यायचा, पैसेही आणि शरीरही. नवरा बायको नातं कधीच मेल होतं तिच्यासाठी. दारू पिऊन वासना शमवायला तो तुटून पडायचा तिच्यावर. ती तेव्हा केवळ मादी बनायची. व्यसनाबरोबर वासना वाढत होती. नाही ऐकलं तर मग मार, बाटली साठी पैसे नाही दिले तर मार, जेवायला आवडीच नाही केलं तर मार..रोज एक कारण पुरायच त्याला तिच्यावर हात उगरायाला. ती सहन करत होती. काहीही झालं तरी तो कुंकू होता तिच्या कपाळावरचं. लाल कुंकू त्याच्याच नावाचं आणि रोज होणारी जखमही..


कधी वाटायचं लेकरांना घेऊन विहीर जवळ करावी, काय उपयोग जगून तरी? अशा जगण्याला किंमत तरी काय, एक दिवस हिच जखम तिला कायमची घेऊन जाणार. रोज तो पिऊन कुठे पडलेला सापडला की त्याला उचलून कसं बसं घरी आणायचं. त्याला जाग आली की खाऊ घालायचं. घर कुठलं? पत्र्यानी झाकलेली एक बंद जागा. एका कोपऱ्यात मांडलेली भांडीकुंडी आणि थोडे कपडे. त्या खोलीत तिचा जीव गुदमरायचा. पण लेकराकडे बघत जीव कालवायचा. त्यांना कोण बघणार? जगायला हवं..जगायला हवं..


आज तिनं ठरवलं, पोराला डॉक्टरकडे घेऊन जायचं. खूप दिवस पोट दुखतंय म्हणत होता. पण त्यादिवशी नवरा परत पैसे मागू लागला. तिने नाही दिले, एक मुस्कटात खाल्ली तरीही नाहीच दिले. ती पोराला घेऊन डॉक्टरकडे गेली. औषध घेऊन आली. पोरगं त्यादिवशी शांत झोपलं. दोन दिवस नवरा आलाच नाही. ती पण शोधायला गेली नाही. पोराला जरा आराम मिळेल म्हणून, भांडण नको म्हणून ती गेलीच नाही.


तिसऱ्या दिवशी कडेलोट झाला, नवरा नशेत अजून मित्रांना घेऊन आला. त्यांची ती घाणेरडी नजर तिच्या मस्तकात गेली. पोरगं उठलं. ती पोराला घेऊन बाहेर पडणार इतक्यात ती श्र्वापदं तिला धरू लागली. नवरा पैसे मोजत होता.. पोरं घाबरून रडायला लागलं. नवऱ्याने त्याला बाहेर घालवलं. ती काय करणार होती? जीव खाऊन ओरडायला लागली. तिचं लाल कुंकू तिला वाचवणार नव्हतच. उलट तो ओरडला, "गप बोंबलू नको, पैसे कसे मिळणार मला, तू तर लपवत होतीस ना? आता चांगली किंमत मिळलीय तुझी.." त्याने परत तिला लाथ मारली. ती पडली, श्र्वापदं जोरदार हसली. तिच्या जवळ आली. तिच्या हाताला कोपऱ्यातली सळई लागली. तिने सगळी शक्ती लावून ती फेकली. ती बरोबर नवऱ्याला जाऊन लागली. रक्त भळाभळा वाहू लागलं. ती श्र्वापदं घाबरून पळून गेली.


ती साडी सावरत उठली. नवऱ्याच्या जखमेला पटकन कापड गुंडाळलं. तो निपचित  पडला होता. जवळच्या डॉक्टरला बोलावलं, डॉक्टर बघून म्हणाले, "वाचणार नाही. जोरात बसलाय मार. मोठ्या हॉस्पिटलला न्या" डॉक्टर गेले.


ती  बघत बसली, तिला उठवसं वाटलं नाही, धावाधाव करावीशी वाटली नाही. उलट ती सैलावली. आरश्यात गेली.. कुंकू विस्कटल होतं. तिने ते खसाखसा पुसून टाकलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला. 


*****समाप्त*****

Katha -Kunku




©शीतल अजय दरंदळे

(कथा कशी वाटली नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा


(marathi katha,marathi blog)


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

No spam messages please