Ad Code

Responsive Advertisement

कथा - वारी


कथा - वारी  

"'मला वारीला पायी जायचं " डायनिंग टेबलवर विक्रम जाहीर करतो. त्याचे बाबा वसंतराव आणि आई वसुधावसंतराव लगेच त्याला बोलतात, " अरे, काम नसलेल्यांची काम ती, ब्रेक हवाय तर मस्त ट्रेकिंग कर, भारताबाहेर जा, मी सगळी सोय करतो, उगीच ते वारी बिरी वेळ घालवू नको"

"बाबा, आपले आण्णा ही जात होते, म्हणून मलाही इच्छा आहे. मला तो सोहळा अनुभवायचाय.'

"विक्रम मला त्यांचंही नाही पटलं आणि तुलाही तेच सांगतो. तुझी ईच्छा आहे तर तू बघ, माझा नकार आहे"

"उद्या सकाळीच निघतोय, माझी इच्छा आहेच. तयारी करतो" विक्रम निक्षून सांगतो.

वसंतरावांचा एकुलता एक मुलगा विक्रम. खूप मोठ्या प्रॉपर्टी चा एकुलता एक वारस. नुकतंच कॉलेज सम्पवून वसंतरावांना कंपनीत जॉईन होणार होता. त्या रात्रीच वारीची तयारीला मित्राबरोबर रात्री बाहेर गेला. पण नियती! त्याचा येताना मोठा अपघात झाला. धडक इतकी जोरात होती की तो  कोमात गेला. वसंतराव आणि वसुधा यांना तर जबर धक्का बसला. डॉक्टर प्रयत्न करत होते, पण यश येत नव्हते. एकच चांगली गोष्ट की विक्रमचा श्वास चालू होता. मृत्यूशी तो निकराने झुंज देत होता.

तो वाचेल किंवा नाही सगळं त्याचं दैव. वसुधाबाईंनी देव पाण्यात ठेवले, जेवण सोडलं. वसंतरावांना बघवेना. कोण कुणाला समजावणार ? कसं समजवणार? त्यांचा काळजाचा तुकडा तिकडे हॉस्पिटलच्या गादीवर नळ्यानी वेढलेला.

तरीही वसंतराव गदगद स्वरात बोलले, "वसुधा, विक्रम ठीक होईल. डॉक्टर सगळे प्रयत्न करतायेत..काळजी करू नकोस"

वसुधा त्यांच्या छातीवर डोकं ठेवून फक्त अश्रू सांडत राहिल्या. त्यांची अवस्था समजत होती. वसंतरावांनी त्यांच्या पाठीवरून अलगद हात फिरवला. थोड्यावेळाने वसुधा बाईंना काही आठवले त्या अश्रू पुसून म्हणाल्या, " अहो,विक्रमची खूप इच्छा होती वारीला जायची. आता ती तुम्ही पूर्ण करा. पांडुरंग आता या संकटातून आपल्याला वाचवेल"  वसंतरावांचा अशा गोष्टींवर कधी विश्वास नव्हता पण आता त्यांचा नाईलाज झालापटत नसूनही ते निघाले त्या मार्गावर ज्यावर ते कधी पायही ठेवणार नव्हते.

असंख्य वारकऱ्यांच्या वारीत ते सामील झाले पण तटस्थपणे. स्वतःला त्यांनी वेगळंच ठेवलं. विठ्ठलाचं नामस्मरण  त्यांच्या कानावर पडत होतं पण मनापर्यंत नाही. विक्रमची काळजी त्यांना आतून पोखरत होती. म्हणून ते शांत झाले होते. कोणाशीही बोलायची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना दिसत होतं पांढरी गांधी टोपी, पांढरा शर्ट, कुर्ता ,काहींच्या पायात चप्पल, तर काही अनवाणी असे कितीतरी जण दिंडीसोबत निघाले होते. कोणालाही कोणाची ओळख नव्हती, पण हितगुज ,विठल्लाचे नामस्मरण एकसुरात चालू होते

चालताना चकून त्यांना एकाचा धक्का लागला, वसंतराव थांबले, त्याने त्यांना हसून नमस्कार केला. वसंतरावांची त्रासिक नजर पाहून तो म्हणाला, " नविन आहात का माऊली?"  ते काहीच बोलले नाहीत. त्याने ओळखलं तो पुढे म्हणाला,"मी ही दहा वर्षांपूर्वी असाच सामील झालो, एकदा आलो आणि चुकता येत राहिलो. खरतर ओळख सांगू नये पण मी रमण वालचंदवसंतरावांना खूप आश्चर्य वाटलंइतकी मोठी असामी ती ही इतक्या साध्या वेशात? त्यांचे कुतूहल वाढले.

"वारीत पाहताय ना, वारकरी सर्व जात,धर्म,पद,प्रतिष्ठा विसरून एक होतात त्या पांडुरंगासाठी. कोणीही लहानमोठं नाही, वर्षभर ज्या कॉर्पोरेट खोट्या जगात आपण जगतो ते सर्व पुसलं जातं काही दिवस आणि आपण बंधनमुक्त होतो.खूप शिकवते ही वारी, अनेक नवीन अनुभव जे कुठेही शिकवले जात नाहीत, "

 वसंतराव हे ऐकून विचारात पडले. जेवायची वेळ झाल्यावर सगळे एकत्र खायला बसले. वसंतराव संकोचत होते ते पाहून एक आजी आली त्याचा हात धरून म्हणाली, " पोरा, मनात काही दुःख ठेऊ नको बग, तो पांडुरंग सगळं बघून घेईल ,काळजी सोड. तो आहे ना,चल चार घास खाऊन घे, तिने भरवले" त्यांना आतून गलबलून आले, पांडुरंग खरंच ओळखेल  माझे दुःख?

 हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत पाऊले पुढे पडत होती . एका गावी मुक्कामी वारी थांबली. तिथे काही गावकरी त्याच्या बाबांचा म्हणजे अण्णांचा फोटो तिथे ठेवत होतेवसंतरावांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं  "हे अण्णा म्हणजे आमची विठू माऊलीच आहे. खूप मोठा माणूस, खूप केलंय या गावासाठी. प्रत्येक वारीला येऊन आम्हाला प्रत्यक्ष भेटून सगळं जाणून घ्यायचे, इथे शाळेला ही त्यांचे नाव आहे. आता ते गेल्यावर त्यांनी अशी सोय केलीय की काही कमी पडत नाही. पण वाईट एकच वाटतं ही माऊली आम्हाला आता भेटत नाही. त्यांची कुठलीही ओळख नाही. फक्त नावच माहितेय."

वसंतरावां्या डोळ्यात पाणी तरळले, अण्णाची ही ओळख मला झालीच नाही. किती चुकीचा विचार करायचो मी. त्यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे वाहू लागले. त्यांनी स्वतःला सावरले,आणि वारीत सहभागी झाले. मनात एक नवचैतन्य आले, विठूनामाच्या गजरात आशेचा नवीन किरण दिसला, मन तल्लीन होऊ लागले. नकळत वैश्विक शक्तीचा आभास जाणवला. पांडूरंगाच्या दर्शनासाठी मन आसुसले. प्रतिष्ठा,पद,ओळख याचा गर्व कधीच गळून पडला.

वारी पंढरपुरी पोहोचली, तिथे अलोट जनसागर उसळलेला,पावसाची जोरात सर आली आणि सगळे टाळ,मृदंग च्या गजरात नाचत भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले.वसंतरावासाठी विलक्षण, अभूतपूर्व  असा तो क्षण होता.पहिल्यादाच असा सोहळा ते अनुभवत होते. पांडुरंगाचे नामस्मरण त्यांच्या मनापर्यंत पोहोचले होते.

दर्श घेऊन बाहेर आले, त्यांना जाणीव झाली  त्या आभाळाएवढ्या रुपासमोर माणूस किती क्षुल्लक आहे तरीही किती खोट्या प्रतिष्ठेत जगत राहतो. त्यांनी वसुधा ला फोन केला

"आपला विक्रम नक्की बरा होईल बघ, मी साकडच घातलंय विठू माउलीला, काही होणार नाही त्याला , पुढच्या वर्षी आम्ही दोघे जातो की नाही वारीला तू बघशीलच" दोघांचे  डोळे एक होऊन वाहत होते.

....विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल....

..... समाप्त ....

© शीतल अजय दरंदळे,पुणे

(कशी वाटली कथा नक्की कळवा,कमेंटमधून धन्यवाद) 





Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

No spam messages please