सकाळी ब्रेकफास्ट उरकूनच डॉक्टर व्योम भराभर बंगल्याच्या ऑटोमेटेड पायऱ्या रोल डाउन करून खाली आले. डॉ. व्योम ची आई आसावरी डिजिटल पेपर वाचत बसली होती. मोठ्या स्क्रिन वर न्यूजपेपर वाचावा लागत होता. बारीक अक्षरे दिसत नव्हती. त्यामुळे डॉ व्योमने एक 32 इंच स्क्रिन लावली त्यात हवं ते वाचता यायचं मोठया अक्षरात व्यवस्थित दिसायचं. रिमोटने फक्त पुढचं पान उलटायचं.
"व्योम नाष्टा केलास का रे?"
" हो आई, आज उशीर होईल यायला,तू वाट पाहू नकोस माझी"
"रोजच उशीर होतोय व्योम तुला? मला घरी कोणीच नसतं रे बोलायला"
"दिनोला घेऊन जा, कुठे बाहेर गेलीस तर, मला कळेलच"
"व्योम एक छान स्थळ आलंय"
"आई सकाळी सकाळी नको तो विषय. माझं जग तूच आहेस अजून कोणाची गरजच नाही"
व्योम बाहेर गेलासुद्धा.आई परत निराश झाली. तसं नाही म्हणायला काहीच कमी नव्हती. व्योम सगळं प्रेमाने करायचा.पण तरीही एक पोकळी होती.म्हणून व्योमचं लग्न लावून निवांत व्हायचं होतं. घरात अजून कोणीतरी आलं तर बोलायलाही माणूस भेटेल. अशी व्होमच्या आईची साधी अपेक्षा होती.
साल 3015. बंगला रुमो. या 2500 sq ft च्या अवाढव्य बंगल्यात डॉक्टर व्योम आणि त्यांची आई राहत होते. डॉ. व्योम शहरातले खूप नामांकित नयूरॉलॉजिस्ट डॉक्टर. वयाची चाळीशी आली तरी त्यांनी लग्न केलं नव्हतं. आई हेच त्यांचं सर्वस्व होतं. बाबा गेल्यावर आईची पूर्ण जबाबदारी व्योम यांनी घेतली. त्यांचं खूप प्रेम होतं आईवर. आईला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून ते नेहमी दक्ष असत. आईच्या सर्व टेस्ट, खायचे प्यायचे वेळापत्रक त्यांनी घरात सेट केलं होतं. त्या त्या वेळेला बरोबर मेसेज यायचा. त्यामुळे आईच्या तब्येतीची चिंता त्यांना नव्हती. नंतर उपचार करण्यापेक्षा आधीच दक्षता घेतली तर आईला काही त्रास होणार नाही असा विश्वास त्यांना होता. घरात दिनो रोबोट होताच. आईला कुठे चालवायला न्यायचे असेल तर दिनो घेऊन जायचा. ठरलेली वेळ आणि रस्ता दिनो रोबोटच्या मेमरीत फीड केली होती. तो बरोबर आईला घेऊन जायचा. डॉ. व्योमच्या सुपर फोनवर ट्रॅकिंग व्हायचेच. समजा अजून दुसरीकडे जायचे असेल तर तो ट्रॅक दिनोच्या मेमरीत फीड करायचा. आधुनिक विज्ञान म्हणा किंवा तंत्रज्ञानामुळे बरेचसे सोपे झाले होते. बाहेर लांब फिरायला जायचं असेल तर ऑटो सोलर कार तयारच होती. ड्राइव्हरलेस कार फक्त व्हॉइस मेसेज करून आज्ञा द्यायची. हव्या त्या जागी बसून जायचं. काही अडचण नव्हती.त्यामूळे अजून तिसरी व्यक्ती हवीच कशाला? व्योमला त्याचं काम आणि आई बास एवढंच जग प्यारं होतं.
त्यादिवशी आई अशीच बाहेर मैत्रिणींना भेटायला गेली. देनोला बरोबर नेलं नाही कारण कारनेच जायचं होतं. गाडीत बसून आज्ञा केली, " पॅलेस गार्डन". कार बरोबर निघाली आणि निर्धारित वेळेत गार्डनच्या गेटवर पोहोचली. आई बाहेर पडली आणि मैत्रिणींची वाट पाहत बसली. थोड्यावेळातच मैत्रिणी आल्या. एकमेकींशी गप्पा सुरु झाल्या. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती त्यामळे खूप वेळ मनमोकळ्या गप्पा झाल्या. व्योम लग्न करत नाहीये त्यामुळे आईला काळजी होतीच. तीच काळजी त्यांनी मैत्रिणींना बोलून दाखवली. मैत्रिणींनी एक स्थळ सुचवलं, लगेच फोटो आणि सगळी माहिती पण दाखवली. आईला मुलगी चांगली वाटत होती दिसायला तर स्मार्ट होतीच पण उच्चशिक्षितही होती. व्योम हो म्हणाला तर भेटही घेता येईल त्यामुळे आई खूप उत्साहात घरी निघाली. कार आली.
डॉ व्योम घरी आल्यावर आईच्या खोलीत गेले आई दिसली नाही. असं कधीच होत नाही. दिनोला पाहिलं , त्याला विचारलं पण ती माहिती त्याच्याकडे सेव्ह नव्हती. व्योमनी बाहेर जाऊन पाहिलं कार पार्क झालेली होती म्हणजे आई बाहेरच नव्हती गेली. मग आई कुठे? आईला ट्रॅकिंग करणे सुरू केलं. सगळीकडे शोधाशोध चालूच होती. पण रेंजमध्ये नसल्याने काही कळत नव्हतं. व्योम काळजीने सैरभैर झाला. बाहेर येऊन रस्ता दिसेल तसा धावू लागला. आईला सगळीकडे शोधत होता. नेहमीच्या जागा पहिल्या पण दिसेना. काहीच कळेना. डोक्यात नाही नाही ते विचार येऊ लागले. आता काय करू? असा हतबल विचार आतापर्यंत कधी आलाच नव्हता. शेवटी दोन तास फिरून व्योम घरी आला. घरी परत पाहिले तर आई नव्हतीच. व्योमने शेवटी जोरात हंबरडा फोडला."आई...कुठेस तू?" डोळयांत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. बराचवेळ तो रडत होता. आई पटकन कशीही समोर यावी म्हणून तो देवाची प्रार्थना करू लागला. आणि अचानक त्याला आठवलं पोलिसांत जावं. त्याने डोळे पुसले पटकन गाडीत बसून आज्ञा केली. गाडी निघाली. रस्ताने जाता जाता डोळे आईलाच शोधत होते. आणि अचानक आईसारखी कोणी एक बाई एका झाडाखाली बसलेली दिसली. व्योमने गाडी थांबायची आज्ञा केली. तो पटकन बाहेर येऊन त्या बाईसमोर जाऊन उभा राहिला.
त्याने नीट पाहिले तर आसावरीच होती. शून्यात नजर, केस विस्कटलेले, ओठ कोरडे पडलेले, घाबरलेली वाटत होती."आई?" त्याने हलवून आईला विचारले. त्याला कसतरी झालं. तिने व्योमकडे पाहिलं , ती रडायलाच लागली, "व्योम, आपली कार आली पण मला आठवेना कोणती आज्ञा द्यावी, मग ती तशीच निघून गेली" नंतर काहीच कळेना काय करावं? मी अशीच कितीवेळ बसून आहे रे?"
"आई, रडू नकोस, ठीक आहेस तू, मी आलोय ना?आधी पाणी पी" आईने घटाघट पाणी प्यायले. तिला शांत करून, तिचा हात धरून त्याने आईला गाडीत बसवले. गाडीने सरळ घरी आले. आईला खायला देऊन व्योम तिच्याजवळच कितीतरी वेळ बसला. आईला दमल्याने लगेच झोप लागली. दुसऱ्यादिवशी सकाळीच व्योम आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. सगळ्या टेस्ट करून घेतल्या. दुसऱ्यादिवशी रिपोर्ट आले. आईला विस्मरणाचा आजार सुरू झाला होता. व्योमला धक्का बसला. काहीच कळलं कसं नाही? असं त्याला वाटलं? एवढया सगळी काळजी घेऊनही कोणताही आजार झालाच का? आणि असा आजार ज्यावर अजूनही उपचार नाहीयेत. गेले किती वर्षे माणूस या आजाराशी लढतोय पण अजून त्यावर यश मिळालं नाही. व्योम घरी आला, आईजवळ तो शांतपणे बसला.
" व्योम काय आले रे रिपोर्ट?"
"आई तुला घरी काय त्रास झाला का ग कधी?"
"कसला त्रास व्योम? तू इतकी चांगली काळजी घेतोस माझी"
"म्हणजे काही आठवत नाही, एकटं वाटतय असं काही?"
"एकटं वाटायचं रे, या सगळ्या स्क्रिन, रोबोट यांच्याशी मनातलं काही बोलताच नाही यायचं ना? आठवायला काही त्रास झाला नाही कारण सगळं तू ऑटोमेटेड करून ठेवलं होतंस ना? मेंदूची काही गरजच नव्हती"
"पण मनाने एकटी पडत गेलीस आणि मला कळलंच नाही..तुला आठवत नाही हे दिनो मुळे लक्षातच आलं नाही कधी, त्याच्या मेमरीत सगळं फीड करत गेलो पण तुला एकटी केलं मी..मीच जबाबदार आहे तुझ्या या आजाराला" असं म्हणून व्योम रडू लागला.
"कसला आजार व्योम? धडधाकट आहे मी"
"विसमरणांनाचा आजर आई, ज्यावर अजून काही ईलाज नाही. तू हळूहळू मला विसरणार.. नाही सहन होत मला आई"
"अरे काही काय? आई कधी मुलाला विसरेल का? आधुनिक जग आहे हे, काही होत नाही मला, बदाम भिजवतो बघ रोज आता मी..सगळं लख्ख आठवेल" आई हसत म्हणाली.
व्योम आईच्या कुशीत जाऊन म्हणाला, "आई तुला मी कुठेच सोडून जाणार नाही आता.आपण रोज बोलूयात , गप्पा मारुयात. फिरायला जाऊयात"
"व्योम, तू खूप मोठ्या पदावर आहेस, इतकं हळवं होऊन कसं चालेल. कोणी आयुष्यभर पुरत नाही रे. या आधुनिक विज्ञानाने , तंत्रज्ञानाने माणसाची बरीचशी कामं अगदी सोपी झालीत. पण माणसाला माणूस हवाच.यंत्र फक्त मदतीसाठी असतात ती माणसाची जागा घेऊ शकत नाहीत. मी नक्की बरी होईल. पण तू माझी एक इच्छा पूर्ण केलीस तरच?"
"कोणती? तू म्हणशील तसं करेन मी आई, तुला काय हवंय ते सांग"
"मला तुझा संसार पहायचाय, माझी सून, नातवंडं सगळं अनुभवायचं आहे. खूप वर्ष आपण एकटे होतो. पण आता मला घर भरलेलं पाहायचं आहे . ऐकशील माझं तेवढं?"
व्योमने होकारार्थी मान हलवली. विज्ञानाची महती खूप आहेच. पण ते फक्त माणसाच्या जीवनाला सुलभ करायला मदत करते हे त्याला कळून चुकलं होतं. माणसाला माणूस हवाच. आपला कोणीतरी, आपल्याला जवळ असणारं, आपल्याला समजून घेणारं फक्त आज्ञा मानून काम करणारं नाही.


1 टिप्पण्या
सुंदर लेख वाचून मला तर आनंद झाला
उत्तर द्याहटवाNo spam messages please