"निखिल हे अजिबात पटलेलं नाही मला, आपली जानू अशी कशी करू शकते?" स्नेहा तावातावाने बोलत होती. रागाने लालबुंद झालेले नाक बघून निखिलला हसूच येत होतं पण ही मस्करीची वेळ तशी नव्हती. स्नेहाचा राग निखिलला कळत होता. त्यालाही जानूचा राग आला होता पण त्याचा असा उद्रेक झाला नव्हता. जानवी त्यांची १३ वर्षांची एकुलती एक लेक. निखिल, स्नेहा आणि जानवी हे अमेरिकेत स्थायिक झालेलं त्रिकोणी कुटुंब.
निखिल १५ वर्षांपूर्वीच अमेरिकेत शिक्षणनिमित आला, त्याने नोकरी मिळवून स्नेहालाही अमेरिकेत आणले. दोघे इथेच सेटल झाले. जानवी पोटात असताना स्नेहाची आई आणि निखिलची आई आळीपाळीने आली. ६ महिने झाल्यावर त्या परत भारतात गेल्या. स्नेहाने जानवीसाठी पूर्णवेळ घरी थांबायचा निर्णय घेतला. तिच्यावर मराठी संस्कार व्हावेत म्हणून तिच्याशी घरात मराठीतच बोलायचे. मराठी बालगीत ,श्लोक, गोष्टी, गाणी, पुस्तके यांतून तिच्यात भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जात होती.
अमेरिकेत मराठी मित्रमंडळही होतं. आठवड्यातून एकदा सगळे भेटायचे. भारतातल्या आठवणी काढल्या जायच्या..आईवडील, नातेवाईकांची आठवण काढली जायची. सणासुदीला खास मराठी पेहेराव केला जायचा. कधी पुरणपोळी, श्रीखंडपुरी, बासुंदी, गुलाबीजामचे बेत आखले जायचे. कोणी छान गाणी म्हणून दाखवायचं, कोणी गिटार वाजवायचं, कोणाला नृत्याची आवड त्यामुळे नाचही व्हायचा. गणपती, दिवाळी तर अगदी धुमधडाक्यात व्हायची. रांगोळी, फराळ, पूजा, आकाशकंदील अगदी महाराष्ट्राची आठवण करून देणारं. अमेरिकन मित्र मंडळींना ही खास आमंत्रण असायचं. त्यांनाही सगळं फार आवडायचं. निखिल स्नेहासारख्या जोडप्यांच्या एकच हेतू म्हणजे आपल्या मुलांवर मराठी, भारतीय संस्कार झाले पाहिजेत. आपली मुळं त्यांनी कधी विसरू नयेत.
जानव्हीच्या वयाचा राहुल, हाही असाच मराठी आईवडिलांचा अमेरिकन मुलगा. अमेरिकेत जन्म होऊन मोठा झालेला. दोघांची लहानपणापासूनच अगदी गट्टी. एकमेकांकडे राहायला जाणे, तासनतास खेळत बसायचे, जाम पटायचं दोघांचं. एकाच स्कुल, एकाच ग्रेडमध्ये असल्यामुळे अभ्यासही एकत्रच करायचे. शाळेत कोणी चिडवचिवडी केली तर एकमेकांसाठी उभे राहायचे. जसे जसे मोठे होऊ लागले तशी ही मैत्री अजून घट्ट होऊ लागले. एकमेकांसोबत गुपितं शेयर होऊ लागले.
त्यादिवशी जानवी , राहुल आणि काही मित्रमंडळी जानवीच्या घरी पार्टी निमित्त एकत्र जमले होते. रॉस हा जानवीचा अगदी खास जवळचा मित्र झाला होता. तोही पार्टीत आला होता. स्नेहा आणि निखिल मुलांना वेळ मिळावा म्हणून बाहेर बसले होते. दोघांना तशीही आत येण्यास बंदी होती. दार बंद होते. जानवीच्या बेडरूम मध्ये पार्टी सुरू होती, गाण्यांचा आवाज, हसण्याखिदळण्याचा आवाज येत होता. स्नेहाचा एक डोळा आत होता, कानही आत होते. निखिलने तिला "उगीच काळजी करू नकोस राहूलही आत आहे" असं सांगूनही स्नेहा आत बाहेर करत होती.
अखेर एक-एक करून सगळे जाऊ लागले. फक्त रॉस आणि जानवी आत रेंगाळले. राहुलही बाहेर आल्यावर स्नेहाला राहवेना. ती उठली, निखिलने तिचा हात पकडून तिला थांबवले. पण थोडायवेळातच स्नेहा उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिने जे पाहिले तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. रॉस आणि जानू एकमेकांना किस करत होते. दोघांचेही ओठ एकमेकांत गुंफले गेले होते. दोघेही पूर्ण जग विसरले होते की त्यांना दार उघडल्याचेही भान राहिले नाही.
"जानू " स्नेहा जोरात किंचाळली.
जानवी आणि रॉस एकदम दूर झाले. रॉस एकदम गोंधळला. निखिलही आत धावत आला. त्याला लगेच परिस्थिती कळली. त्याने रॉसला शांतपणे जाण्यास सांगितलं. रॉसनं त्याचं जॅकेट उचललं आणि तो बाहेर गेला.
स्नेहा जानवीच्या जवळ येऊन तिच्यावर हात उगारणार इतक्यात निखिलने तिला थांबवलं. जानवी स्फुंदून स्फुंदुन रडू लागली. तिला स्नेहाचा प्रचंड राग आला. तिने धाडकन बेडरुमचं दार लावून घेतलं.
निखिल स्नेहाला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आला.
"निखिल का थांबवलस मला? दोन थोबाडीत द्यायच्या होत्या तिला."
"स्नेहा, शांत हो तू आधी"
"शांत काय? तुही बाप आहेस ना तिचा? त्या रॉसला का जाऊ दिलंस तू?"
"बोलू आपण उद्या सकाळी स्नेहा. आता प्लिज शांत हो"
निखिलने कसंबसं स्नेहाला शांत केलं आणि ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी जानवी बाहेर आलीच नव्हती. निखिल तिला बोलवायला गेला पण तिला कोणाशीच बोलायचं नव्हतं. तिचा ब्रेकफास्ट तो तिला फक्त देऊन आला. स्नेहा थोडीफार शांत झाली होती पण आतल्या आत धुसफूसतच होती. एक तणावपूर्ण शांतता घरात भरून राहिली होती. जानवीने जोरजोरात गाणी लावली, पाश्चात्य संगीतामुळे आवाज जोरजोराने कानांवर आदळत होता. स्नेहा वैतागली तिनं दार वाजवलं पण उपयोग शून्य. ती ताडताड घराबाहेर येऊन बाकड्यावर डोक्याला हात लावून बसली. निखिल स्नेहाच्याजवळ येऊन बसला.
" निखिल हे असे संस्कार केले का आपण जानूवर? चूक करून इतका उद्धटपणा आलाय तिच्यात, काय उपयोग झाला सगळ्याचा?"
"स्नेहा संस्कार एका दिवसात करता येत नाहीत तसंच एका दिवसात जातही नाहीत. ती एक प्रक्रिया असते. जानू मोठी झालीय आता. तिचंही काही म्हणणं असेल, तिला एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नकोस. तिच्यावर हात उचलुन तिला आपल्यापासून कायम तोडू नकोस. तिची चूक तिला कळली पाहिजे पण यापद्धतीने नाही. तिचे मित्र होऊन"
" मला काही सुचेनासं झालंय, आताशी १३चीच आहे आणि किसिंग करतेय. मी १३ची होते तेव्हा काही कळत ही नव्हतं. या देशात येऊन काय उपयोग झाला? बिघडलीच ना जानू? आपला निर्णय चुकला. काव्या बघ ना! १७व्या वर्षीच गरोदर राहिली आता आबोर्शन झालं तिचं. मिनूने काल मला फोनवर सांगितलं. तिच्या आईवडिलांना पण धक्का बसलाय. अमेरिका सोडून भारतात जायचय त्यांना."
"स्नेहा, असं काही होणार नाही. मला राहुलशी बोलुदे, काही मार्ग नक्कीच निघेल. निगेटिव्ह विचार करू नकोस"
निखिल तिला आश्वस्त करून गेला. संध्याकाळी तो राहुलशी बोलला. तेव्हा कळलं की रॉसविषयी जानूला आकर्षण वाटत होतं. रॉस जेव्हा पार्टीला यायला तयार झाला तेव्हा तर ती सातवे आसमान वर होती. तिला खूप बोलायचं होतं त्याच्याबरोबर. पण पुढे असं काही होईल याविषयी त्याला काही कल्पना नव्हती. राहुल जानूशी फोनवर बोलला पण ती फार दुखावली आहे असं त्याला वाटलं. निखिलने राहुलला घरी येऊन तिच्याशी बोलायला सांगितलं. आम्हालाही तिला समजून घ्यायला आवडेल, तिने बाहेर येऊन बोलावं. हा निरोपही निखिलने राहुलला दिला.
राहुल जानूला भेटला, ती निखिल स्नेहाशी बोलायला तयार आहे, पण आधी तिचं बोलणं ऐकावं अशी तिची अट होती. निखिलने मान्य केली. स्नेहाला जे काय चाललंय ते फारसं काही पटत नव्हतं पण ती निखीलमुळे ती गप्प होती.
जानू अखेर बाहेर येऊन निखिल आणि स्नेहासमोर बसली.
"जानू बैस, तुला काय बोलायचं आहे ते बोल नंतर आम्ही बोलू. We are family. दुष्मन असल्यासारखे का वागतोय गेले काही दिवस..lets talk out" निखिलने जानू आल्यावर वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. स्नेहा फक्त एकटक जानूकडे बघत होती.
"डॅड, मला त्या दिवशी अचानक असं का झालं कळलंही नाही. पण मला रॉस खूप आवडतो. तो खूप चांगला आहे. पहिल्यांदाच कोणी मला "सूंदर" म्हणलं असेल तर तो रॉस आहे. तो माझी खूप काळजी घेतो. आमच्या क्लास मध्ये सगळ्यांना बॉयफ्रेंड आहेत. मी भारतीय असल्यामुळे कोणी माझ्याजवळ कोणी येतही नव्हतं. ना धड गोरे ना काळे. राहुल माझ्याबरोबर असल्यामुळे सगळे त्यालाच माझा बॉयफ्रेंड समजत होते. पण तो माझा बेस्टफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड नाही."
"जानू अभ्यास सोडून हवेत कशाला बॉयफ्रेंड? वय आहे का तुझं? मैत्री आहे तोपर्यंत ठीक आहे ना? ही आपली संस्कृती नाहीये." स्नेहा आवाज चढवून म्हणाली.
"ममा, कुठली संस्कृती आहे माझी? माझा जन्म इथला, माझी अमेरिकन सिटीझन म्हणून ओळख. १३ वर्षात दोनदा भारतात जाऊन आलेय म्हणून लगेच मी तिथली होते का? या देशात जन्म झाला, वाढ इथलीच ,मित्र मैत्रिणी इथलेच आहेत. हे मला आपलंसं वाटलं तर चुकलं का ? तुम्ही भारतीय आहात ना मग का इथे आलात? का इथलं नागरिकत्व घेतलं? मला कधी कधी सँडविच झाल्यासारखं वाटतं. ना धड इथली ना तिथली? माझी मला ओळखच नाहीये, पिझ्झा आवडतो पण खायचा नाही कारण पोळीभाजी आपली संस्कृती. मी स्वीकारलं ते. पण शाळेत खूप वेगळं वाटायचं मला. तिथे फक्त राहुल बोलायचा माझ्याशी. दुसरे मित्र लांब राहायचे, वेगळाच विचार करायचे, हसायचे. पण रॉस खूप वेगळा आहे. त्याने मला समजून घेतलं. म्हणून मला तो जवळचा वाटतो"
"इथे का आलो? हा प्रश्न तुझा बरोबर आहे. मलाही इथलं राहणीमान हवं होतं म्हणून, आधुनिक जीवनमान हवं होत आम्हाला. आम्हीच संस्कृतीची गळचेपी केली का तुझी? जे चांगलं आहे ते रुजवायचा प्रयत्न करत होतो जानू. पण आता वाटतंय चुकलं आमचं. जसा देश तसं राहावं. तुला हवं ते करू द्यावं का? "
"सॉरी मॉम डॅड, मला असं नव्हतं म्हणायचं. मी नक्कीच चुकले, त्यादिवशी वाहवत गेले. पण सांभाळायला हवं, हे लक्षात आलंय माझ्या. प्रेम आणि शारिरीक आकर्षण यात गल्लत होतेय का? खूप प्रश्न पडतात पण कोणाजवळ बोलू? तुमची कधी कधी भीती वाटते"
"नाही जानू.. आमच्याशी बोल गं, आम्ही आहोत ना. काही प्रश्न असतील तर मन मोकळं कर माझ्यासमोर.. संस्कृती म्हणजे तरी काय? आपल्या लोकांशी असलेला ऋणानुबंध, त्यांच्याशी असलेला संवाद आणि विश्वास. आम्हीही तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. पण यापुढे असं होणार नाही. आपण कुटुंब आहोत, एक आहोत. हे नेहमी लक्षात ठेव..काहीही बोलायला कधी स्वतःला रोखू नकोस"
"येस मॉम, डॅड. कळलं " जानू आपल्या आईवडिलांच्या कुशीत शिरली आणि रडू लागली. स्नेहाने तिला जवळ घेऊन तिचेही डोळे वाहायला लागले. आपलं पिलू आपल्याकडे परत आलं यासारखा जगात कुठला आनंद कुठला? निखिललने घरात उठलेलं वादळ खूप हळुवार थोपवलं होतं. नात्यातली कोंडी अलगद सुटली होती.
....समाप्त.......
(कथा कशी वाटली नक्की कळवा, शीतलच्या शब्दांत पेज जरूर फॉल्लो करा)


1 टिप्पण्या
तीनही गोष्टी आवडल्या, छान आहेत!
उत्तर द्याहटवाNo spam messages please