Ad Code

Responsive Advertisement

कथा- विळखा

 कथा- विळखा


रेचल सर्पमित्र,फोटोग्राफर,ट्रेकर सर्वकाही. अवघी वीस, बविशीची ची असेल. अगदी लहानपणापासून तिचे डॅड डेविड बरोबर ती जंगलात फिरत असे. अनेक हिंस्त्र प्राण्यांशी तिने डेव्हिड सोबत सामना केला आहे. पण तिला जास्त रस आहे तो सापांमध्ये. आफ्रिकेत या सळसळणाऱ्या प्राण्याच्या ती अक्षरशः प्रेमातच आहे. अनेक साप तिने लिलया पकडले आहेत. त्यांना पकडून ते साप सुरक्षितपणे दूर जंगलात सोडणे हे तिचे काम.
ब्लॅक माम्बा , ग्रीन माम्बा, स्पिटिंग कोब्रा, पायथॉन हे विषारी साप पण तिने अनेकदा पकडून वाचवले आहेत. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन ती या कामाला जुंपली. रेचल इतकी लोकप्रिय आहे की कुठेही साप दिसला की हिला फोन येतो आणि ही लोकेशन विचारून लगेच तिच्या कारमध्ये स्वार. तिचे साप पकडायचे टॉंग (लांब चिमट्यासारखी काठी), सॅक, बॉक्सेस सगळे डिक्कीतच तयार असते.
असाच एक दिवस, संध्याकाळी एका बैठ्या घरात साप निघाला असा फोन आला. रेचलने डिटेल्स विचारले आणि ती लोकेशनवर पोहोचली. तिथल्या लोकांनी सांगितलेल्या वर्णनावरून तो स्पिटिंग कोब्रा वाटत होता. काळा लांबसडक फुत्कारणारा, हा साप विष लांबूनच सोडतो ते थेट बघणाऱ्याच्या डोळ्यात जाऊ शकते, अंगावरची उघडी जखम ही पुरेशी असते विष अंगभर पसरायला. जर हे विष शरीराच्या आत आले, योग्य उपचार न मिळाल्यास माणूस 30 मिनिटात खल्लास. इतका भयंकर हा विषारी साप. रेचल तिचे पकडण्याचे टॉंग घेऊन शोधू लागली. जागा गॅरेज ची होती. खूपच अंधारी त्यात रात्र होत आली होती. एक बल्ब चा प्रकाश होता. रेचल त्या गॅरेज मधल्या सगळ्या वस्तू उचलून शोधत होती. विष डोळ्यात जाऊ नये म्हणून गॉगल डोळ्यावर चढवला होता. तितक्यात काही तरी आवाज आला, तिने टायर उचलले तर पटकन सापाची शेपूट सळ सळ हलत पुढे निघाली. रेचल ने बरोबर ओळखले तो स्पिटिंग कोब्रा च होता. एक अत्यंत विषारी साप.
ती पटकन पुढे सरकली. तिने त्याच्या शेपटीला हाताने पकडले व दुसऱ्या हातातल्या काठी ने ती सापाची मान धरू लागली. साप खूप विष फुत्कारत होता. इतक्यात त्या गॅरेज मधील दिवा ही गेला. काहीच दिसेना! रेचल सापाची शेपूट हातात घेऊन उभी. बाहेरचे लोक खूप घाबरले आता काही खरं नाही रेचलचं अस त्यांना वाटलं. पण काही मिनिटातच रेचल साप हातात घेऊन बाहेर आली, तेही हसत ! तिने मान घट्ट धरली होती व ती त्याला आता एक बॉक्स मध्ये बंदिस्त करणार होती. तिने अगदी लिलया त्या सापाला जेरबंद केले. सर्व लोकांनी तिचे टाळ्या वाजवून कौतुक केले. तिच्याबरोबर फोटो ही काढले. अशी ही रेचल प्रचंड धाडसी, निडर .
कॉलेज मध्ये असताना तिची घट्ट जिवलग मैत्रीण, जेफरी ही अत्यंत हुशार, रेचल शेजारीच राहायची. जेफरी पेशाने मानसोपचारतज्ज्ञ. दोघींनाही निसर्गात रमायची खूप आवड. रेचल ला खूप आवडायचं रेफल बरोबर वेळ घालवायला. रेचल आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर एकटीच राहायची. गेले 3 वर्ष ती एकटीच होती. जेफरी तिच्या बॉयफ्रेंड, जॉन सोबत राहायची. गेले सहा महिने ते लिव्ह इन मध्ये होते. दोघींच्या घट्ट मैत्रीमुळे त्यांना एकमेकींचा आधार होता.
असेच एक दिवस जेफरी आणि रेचल डिनर करत होत्या. तितक्यात रेचलला फोन आला. एका घरात साप होता, बेडरूम मध्ये शिरला पण नंतर दिसलाच नाही. रेचलला निघावं लागणार होतं , जेफरी ने आग्रह केला की तिलाही यायचंय. रेचल तिला घेऊन निघाली. रात्रीचे आठ वाजत आले होते. थोड्याच वेळात त्या दोघी जिथून फोन आला होता त्या लोकेशन वर पोहोचल्या. रेचल तिचे टॉंग घेऊन निघाली , तिने जेफरीला बाहेर थांबण्यास सांगितले.आत गेल्यावर रेचल नेहमीप्रमाणे रुम मधील सामान बाजूला करून पाहू लागली. साप कुठेच दिसला नाही. बेडची गादी तिने पूर्ण उलटी करून फाडली तर त्यात काही हालताना दिसले. तिने टॉर्च चा प्रकाश त्यावर सोडला तर तिला कळले तो ब्लॅक मांबा आहे. विषारी साप. हा चावला तर श्वसन संस्थेवर परिणाम होऊन अटॅक येऊन हृदय बंद पडते, अवघ्या अर्धा तासात मनुष्य मरून जातो. तिने टॉंग ने पकडायला सुरू केलं ,पण तो खूप चपळ होता. पटकन खिडकीच्या फटीत शिरला. खिडकी बंद असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. रेचल ने पटकन त्याची मान पकडली. शरीर टॉंग मध्ये अडकले होते. ती त्याला घेऊन बाहेर आली. त्या घरातील लोक प्रचंड घाबरले होते. तिने सगळ्यांना समजावले, की एक उंदराच्या मागे हा घरात आला असावा, त्याच्या पोटात एक शिकार दिसतच होती. उंदीर किंवा बेडूक असू शकतो. सगळे पटापट फोटो काढत होतेच. रेचल ने त्याला तिच्या सॅकमध्ये भरून पेटीत बंद केले. जेफरी हे सर्व पाहत होती. तिला मैत्रिणीचे खूप कौतुक वाटले .परत निघताना गाडीत तिने विचारले " हे साप पकडणं भयानक आहे, जीवाला किती धोका प्रत्येकवेळी? असं काम का करतेस?"
रेचल - मला हा प्राणी खूप आकर्षक वाटतो, त्याला काहीं चूक नसताना बऱ्याचदा मारलं जातं, हे चांगलं नाहीये, त्यांना वाचवणेही गरजेचं आहे. नाहीतर निसर्गचक्र बदलू शकतं आणि त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.
जेफरी - ते खरंय, हॅट्स ऑफ , तुझ्यासारखे विचार करणारे आहेत म्हणून चांगलं आहे. मी पहिल्यांदा तो साप इतक्या जवळून पहिला खूप भीती वाटली मला
रेचल - जाऊदे, चल एक बियर घेऊ, तुझी भीती निघून जाईल.
दोघी हसतात. एका हॉटेल मध्ये थांबून बियर आणि काही खायला ऑर्डर करतात. तेवढ्यात कोणी एक इसम ब्लॅक ह्रल्मेट आणि ब्लॅक जॅकेट घालून रेचलच्या दिशेने येतो. आणि तिच्या डोक्याला बंदुकीचे टोक लावतो. रेचल न घाबरता विचारते,"कोण आहेस तू? काय हवंय तुला?"
तो म्हणतो- मला तो साप हवाय ,त्याचं विष खूप अमूल्य आहे. लगेच दे चल
रेचल- कधीच नाही, मी तुला त्याला मारू नाही देणार. मी त्याला जंगलात सोडणार आहे.
आणि ती त्याला जोरात धक्का देते, तो गोळ्या झाडतो पण गोळी जेफरी ला लागते. जेफरी कोसळते. तो मारणारा इसम गडबडतो. तो पटकन तिथून पळून जातो.रेचल उठून त्याच्या मागे धावते पण तो बाईक वरून पळून जातो. जेफरी ला बघायला रेचल धावत येते. तिला खूप हाका मारते पण सगळं संपलेले असतं. रेचल लगेच पोलिसांना फोन लावते. पोलिस येऊन सगळी चौकशी करतात. जेफरी ला हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं. पण तिला मृत घोषित केलं जातं. रेचल ला प्रचंड धक्का बसतो. आपल्यामुळे जेफरीला जीव गमवावा लागला. ती विमनस्क अवस्थेत घरी पोहोचते. जॉन ला सांगायचं असतं. तिला कळत नाही कसं सांगावं? ती जेफरीच्या घरी जाते, तेव्हा जॉन किचन मध्येच असतो. त्याला कळल्यावर त्याला ही धक्का बसतो. पण तो लगेच सावरत रेचल ला शांत राहण्यास व स्वतःला सांभाळण्यास सांगतो. रेचल ला आश्चर्य वाटतं. इतका कसा हा शांत? पण तो विचार सोडून ती घरी जाते. आणि स्वतःला सोफ्यावर ढकलून देते. तिचे डोळे वाहायला लागतात. ,ती खूप रडते. तिला होणारा त्रास ती कोणालाही सांगू शकत नाही. खूप मोठं गिल्ट घेऊन आता आयुष्य काढायचं असतं.
पोलीस शोध घेतच असतात, चौकशी चालूच असते. इकडे जॉन रोज रेचल कडे येऊन तिची विचारपूस करतो. त्यांची हळूहळू मैत्री वाढते. जेफरी आणि त्याचे अनेक क्षण तो तिच्यासोबत शेअर करतो. तिलाही थोडे हलके वाटते. तिला जॉन ने आरोपी ठरवले नाही याचं खूप कोतुक वाटते. तिला त्याचे मन खूप मोठे असल्याचं जाणवते. रेचलला काम सुरू करायचे आहे पण तिचे हात आता थरथर कापत असतात. या अपघाताने आत्मविश्वास गेलेला असतो. सहा महिने होऊन गेले पण पोलिसांना शोध लागत नाही. ते केस बंद केल्याचं रेचल ला कळवतात. रेचल हतबल होते. जॉन तिला सगळं विसरून काम सुरू करण्यास सांगतो. पण तिचे मन काही लागत नाही. जेफरीच्या आठवणींनी तिला खूप बैचेन वाटत असतं, ती स्वतःला दोषी ठरवते. दरम्यान तिची आणि जॉनची मैत्री खूप घट्ट होते, मैत्रीच्याही पलीकडचं नातं फुलतं. एक दिवस जॉन त्याला साप पकडायचे प्रशिक्षण घ्यायचंय असं तिला सांगतो तेव्हा रेचल ला खूप आनंद होतो , आपल्यासाठी कोणी इतकं शिकतय, स्वतःचा जीव ही धोक्यात घालायला जॉन तयार आहे ,तिला जॉन मनापासून आवडतो. जॉन ला तिने घट्ट मिठी मारते.
त्यारात्री ते दोघे डेट वर गेले. छान गप्पा मारून, डिनर करून घरी आले. जॉन ने तिला जवळ ओढले आणि एकत्र राहण्यासाठी विचारले. रेचल ने थोडा वेळ मागितला. पण तिने कबूल केले की तिला जॉन आवडतो. दोघांनी एकमेकांना किस केले. रेचल घरी आल्यावर बऱ्याच दिवसांनी आनंदात होती.
दुसऱ्या दिवसापासून जॉन चे ट्रेनिंग सुरू झाले. रेचल त्याला सर्व सापांची माहिती करून देत होती.
विषारी ,बिनविषारी सापांचे प्रकार समजावून सांगत होती. सापाला कसे पकडायचे याचे तंत्र तिने समजावून सांगितले. हळूहळू जॉन सर्व शिकत होता. रेचलने परत काम सुरू करायचा विचार केला. जॉन ही खूप उत्सुक होता कारण कितीही तयारी केली तरी प्रत्यक्षात ते काम केल्याशिवाय काही करता येत नाही हे रेचल चे बोल त्याला चांगले लक्षात होते. रेचल ला त्याचा उत्साह समजत होता. तिने परत काम सुरू केले आणि परत फोन सुरू झाले. रेचल आता बिनविषारी साप जॉन ला पकडायला सांगू लागली. हळूहळू त्याचा हात बसू लागला. पण अजून मोठ्या सापांना सामोरे जायचे होते. ज्यादिवशी जॉन ने पाहिला बिनविषारी साप पकडला त्या रात्रीच ते दोघे लिव्हइन मध्ये राहू लागले. दोघे खूप आनंदात होते.
दुसऱ्यादिवशी रेचल फोनच्या आवाजाने उठली. एका शेतात खूप मोठा अजगर आला होता. अनेक बकऱ्या, कुत्रे हे त्याचे शिकार झाले होते. रेचल झटपट तयार झाली. जॉन ने विचारल्यावर तिने सांगितले , तो ही तयारी करू लागला. तो फ्रेशरूम मध्ये गेला आणि बाहेर त्याचा फोन वाजला. रेचलने फोन उचलेपर्यंत कट झाला आणि एक msg फ्लॅश झाला " Get the poison soon". रेचल ला मेसेज वाचल्यावर काही आठवले, जॉन ला कशाचे विष हवं? तिला एकदम आठवतो तो गन रोखून धरणारा माणूस, त्याला ही विष हवे होते सापाचे? तिच्या मनात शंकेची पाल चुकचूकते. ती त्याचं कपाट चेक करू लागते. तिला ते काळे जॅकेट आणि हेल्मेट ही दिसते. तिला धक्का बसतो, म्हणजे जॉन सापाच्या विषाची तस्करी करतो? म्हणजे यानेच जेफरीला मारले?
तितक्यात जॉन बाहेर येतो. ती पटकन कपाट बंद करून बाहेर येते.
दोघेही कारमधून निघतात. प्रवासात रेचल जॉन शी एक शब्दही बोलत नाही. ते कॉल लोकेशन वर पोहोचतात. तिथले शेतकरी सांगतात त्या प्रमाणे पायथॉन स्नेक च असावा. अजगरच. हा शिकार करताना प्राण्याला घट्ट आवळतो त्याची मान करकचून आवळून धरतो. मग श्वास गुदमरून तो प्राणी श्वास सोडतो. रेचल आणि जॉन पायथॉनला शोधू लागतात. एका झाडामागे गुहे सारखा खड्डा असतो तिथे मेलेल्या प्राण्यांचे काही भाग दिसतात. रेचल ला समजते तो पायथॉन त्या गुहेतच असणार. ती जॉन ला घेऊन आत शिरते बराच अंधार असतो. जॉन टॉर्च घेऊन तिच्या मागे चालत असतो. थोडं आत चालून गेल्यावर तिला ते अजगर वेटोळे घालून बसलेले दिसते. रेचल जॉन ला दाखवते. जॉन थोडा घाबरतोच. पण ती त्याला समजावते की या अजगराचा घट्ट वाटोळा मानेभोवती मारू द्यायचा नाही बाकी काही भीती नाही. रेचल त्या पायथॉनला हलकेच जवळ घेते. तिने त्याची मान धरलेली असते. तो पटापट तिला वेटोळे घालू लागतो. पण ती मोठ्या चातुर्याने ते विळखे सोडवून टाकते. नंतर ती जॉन ला पकडायला सांगते. तो तयार होतो आणि सापाची मान पकडतो. साप जॉन भोवती वेटोळे घालू लागतो. जॉन खूप घाबरतो वेटोळे त्याच्या पोटाभोवती यायला लागतात. तो रेचल ला सांगतो पण रेचल हलत नाही. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागतो.रेचल फक्त बघत असते.
"जॉन घाबरू नकोस, अजून खूप वेळ आहे, तो मानेभोवती आल्याशिवाय तुला काहीही जाणार नाही?"
" तू हे काय बोलतेस, मला सोडव ग ? अशी काय वागतेस आज?"
" नालायक माणसा तूच मारलंस ना जेफरी ला? त्या विषासाठी? किती विश्वास होता तिचा तुझ्यावर? तू आमच्या दोघींचा विश्वासघात केला. मी आज फोन पहिला नसता तर तुझं हे खर रूप कळलच नसतं"
" नाही, मी तिला नाही मारले, तुझी गोळी चुकून तिला लागली. मी सांगतो सगळं, पण आधी मला सोडव, मला ,श्वास घ्यायला त्रास होतोय" अजगराची मिठी अजून घट्ट होऊ लागते.
" थोड्या पैशासाठी तू सगळ्यांचा जीव घ्यायला निघाला होतास? आणि पोलिसांना ही मॅनेज केलेस ना? केस क्लोज करून" रेचल चिडून विचारते, तिचे डोळे रागाने भरून येतात.
"सॉरी मी चुकलो, मी सगळं खरं सांगेन पोलीसांना, माझा गळा? तो मला गळ्याभोवती आवळतोय" जॉन निपचित पडतो. ती त्याचा श्वास चेक करते, पूर्णपणे थंड झाला असतो. रेचल पायथॉनला सोडवून बाहेर आणते. त्याला बॅगेत भरते. नंतर पोलीस व हॉस्पिटल ला फोन करून झालेल्या प्रसंगाबद्दल कळवते.
घरी गेल्यावर टीव्हीवर बातमी फ्लॅश होते, प्रसिद्ध सर्पमित्र रेचल यांचा मित्र जॉन याचा साप पकडताना अपघाती मृत्यु" रेचल ला खूप दिवसांनी शांत झोप लागते.

©®शीतल अजय दरंदळे

Snake stories, Python, anaconda, cobra , story



(कथा कशी वाटली नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा )
aolsheetal@gmail.com
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

No spam messages please