"जॉन हे बघ, माझ्या मॉमने नवीन सॉक्स आणि फ्रॉक पाठवला आहे." सारा बॉक्स उघडून दाखवत होती.
"व्वा सारा, खूप छान आहे. तू जाणार आहेस का घरी?" जॉनने बंक बेडवरून खाली उतरत विचारलं.
" येस, दरवर्षी जातो ना आपण,तू कोणाकडे जाणार मॉम का डॅडकडे?" तिने जॉनला विचारलं.
" माहीत नाही" जॉनने खांदे उडवत साराला सांगितलं आणि तो उडी मारून परत बेडवर गेला.
तिकडून डॅन हातात कँडीज घेऊन आला. त्याने सारा आणि जॉनला दिले.
"माझ्या आंटीने पाठवलंय, कॅण्डी बॉक्स फॉर थँक्सगिविंग" डॅनने कॅण्डी चाटत सांगितलं.
"म्हणजे तुझ्या डॅडची फ्रेंड? त्यांच्याबरोबरच राहते तीच ना?"
"येस, ते लवकरच लग्न करतील. या ख्रिसमसला मी त्यांच्या नव्या घरी जात आहे."
"खरंच डॅन! ग्रेट!!मला इथेच राहायचंय" कॅण्डी संपवून जॉन हात धुवायला पळत गेला.
"हॅपी फॅमिली" हाऊस टेक्सासच्या ईस्टला लहान मुलांचे वसतिगृह. फादर ब्रोहन आणि सोळा मुलं, दोन टीचर्स आणि सिस्टर्स. जॉनला इथे येऊन पाच वर्ष झाली. मार्क आणि केली यांचा एकुलता एक मुलगा जॉन. फक्त सहा वर्षांचा होता तो, जेव्हा हॅप्पी फॅमिलीत आला. मार्क आणि केली यांनी घटस्फोट घेतला आणि जॉनची रवानगी या हाऊस मध्ये झाली. त्यावेळी दोघांनाही जॉनची जबाबदारी नको होती. जॉन इकडे आला तेव्हा तो खूप रडे, त्याला मॉम डॅड दोघेही हवे होते पण थोड्याच दिवसांत तो रुळला.
जॉन दरवर्षी ख्रिसमस सुटीत मार्क आणि केली यांच्याकडे दिवस विभागून राहायला जायचा. जॉन खूप खुशीत असायचा पण यावेळी त्याला जायला मन होत नव्हतं,नकोसं वाटत होतं. याचं कारण होतं मार्क आणि केली यांचं वागणं. दोघेही खूप गिफ्ट्स द्यायचे आवडीचं खायला द्यायचे पण एकमेकांवर कुरघोडी करु पहायचे. "तुझ्या मॉमपेक्षा मी किती छान गिफ्ट देतोय" असं डॅड सांगायचे. आणि मॉम "तुझ्या डॅड असा प्लमकेक करूच शकत नाही" असं सतत सांगायची. सतत ती तुलना. आधी तो हसायचा पण आता त्याला समजू लागलं होतं. त्याला हे नको होतं. त्याला तो प्रेमळ स्पर्श , सहवास, संवाद हवा होता. एक हॅपी आणि मेरी ख्रिसमस ब्रेक.पण तसं फार कमी व्हायचं.
त्यापेक्षा हॅपीफॅमिली हाऊसमध्ये त्याला आवडायचं. त्याचे जिवलग मित्र सारा आणि डॅन ज्यांच्याशी तो सगळं शेयर करायचा. फादर ब्रोहन तर सर्वांची खूप काळजी घ्यायचे. ख्रिसमस सुटी ते स्वतः सांताला प्रार्थना करून बोलवायचे आणि सगळ्यांना आवडत्या गिफ्ट द्यायचे. सिस्टर लोरीस पण खुप मायाळू होत्या. त्या छान गाणं गात गिटार वाजवत. बाहेर स्नॉफॉल सुरू व्हायचा, शेकोटीची ऊब घेत गाणी , गोष्टी ऐकायला त्याला खूप आवडायचं. गोष्टींच्या सुंदर दुनियेत फिरून आल्यावर छान झोप यायची. येशूची प्रार्थना करून रात्री झोपून जायचं. जॉनचं जगच जणू हॅपीफॅमिली झालं होतं.
"चिल्डरन हॅsssssपी हॉलिडेज" सिस्टर लोरीस हातात गिटार घेऊनच आल्या..
"सिस्टर हॅपी हॉलिडेज.." जॉन आणि मुलं खुश होऊन चित्कारत ओरडली.
फादर ब्रोहनही मागाहून केक घेऊन आले.
" मुलांनो उद्या तुम्ही जाणार.. मग आपण दरवर्षी प्रमाणे आजच सेलिब्रेट करूयात. स्टोरीज, सॉंग्स अँड डान्स हे सर्वकाही आज रात्री…" सगळ्यांनी जोरदार जल्लोष केला. जॉन तर खुष होऊन नाचू लागला.
सर्वांनी हसत खेळत केक कापला, एकमेकांना भरवला. नाचून-गाऊन खूप मज्जा केली. दुसऱ्यादिवशी थोड्या उशिरानेच जॉनला जाग आली. आज मॉम येणार होती न्यायला. कंटाळतच त्याने हात ताणून आळस दिला. समोर सारा बॅग्ज घेऊन बसली होती. तिच्या बंक बेडवर छान तयार होऊन बसली होती. तिच्या डॅडची वाट पाहत होती.जॉनला उठलेला पाहताच तिने तिच्या हाताने बनवलेले ग्रीटिंग दिले. "मेरी ख्रिसमस जॉन" डॅनीनेही उठून त्या दोघांना वीश केले. तिघांनीही एकमेकांना मिठी मारली.
फादर ब्रोहन यांचा जॉनला निरोप आला, त्याची मॉम अर्धा तासात येणार होती. जॉन बॅगेत कपडे कोंबू लागला. वॉश घेऊन नाश्ता करून तो तयार झाला. मॉम आली हे कळल्यावर तो व्हिजिटिंग रुम मध्ये गेला. केली आलेलीच होती. ती जॉनला बघताच तोंडभरून हसली. जवळ येऊन त्याच्या गालाचा मुका घेतला. जॉनलाही मॉमला भेटून छान वाटलं. त्याने मनातल्या नकारात्मक भावना दूर केल्या.
केली बोलू लागली," जॉन कसा आहेस? खूप छान प्लॅनिंग केलंय आपण सुटीत. या वर्षी ट्रीपला जाऊयात 'क्रेव बेटावर'. तिथे मस्त राहुयात, खाऊयात, पिऊयात मज्जा करूया..तुला खूप आवडेल"
"पण मॉम , मला चार दिवसांनी डॅडला भेटायचंय. आपण परत कधी येणार तिथून?"
"अरे, त्याला सांग यावर्षी मी नाही येणार, मॉमने खूप छान प्लॅनिंग केलंय.. मी, मॉम आणि रॉबिन"
"मॉम, रॉबिन अंकल का?"
"अरे त्यानेच प्लॅन केलेय. तुलाही आवडेल तो"
"मॉम एक मिनिट, म्हणजे तुम्ही आधीच प्लॅन केलंय. मला फक्त ऍड केलय?"
"नाही जॉन, असं काही नाही. तू आता मोठा झालायेस मग सांगायला हरकत नाही. आम्ही लग्न करतोय" केली एका श्वासात बोलून गेली.
"कॉंग्रेट्स मॉम! तू प्लिज तुमची वेकेशन खराब नको करुस, मी डॅड सोबत राहीन.मी आता त्यांना फोन करतो" केली त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण जॉन ऐकत नाही. तिच्या फोनवरून तो मार्कला फोन लावतो आणि तो त्याच्याकडे येणार असल्याचं सांगतो.
"हे जॉन, मला खूप आवडलं असतं तुझ्यासोबत राहायला. पण यावर्षी इतक्या कामात अडकलो की सुट्टीच मिळत नाहीये. म्हणून तुझ्या मॉमला सांगितलंय. मी प्रयत्न करतोय येण्याचा..बाय , मेरी ख्रिसमस" मार्कने एवढं बोलून फोन ठेवला.
जॉनने हे ऐकताच त्याचा गोरापान चेहरा लालबुंद झाला, त्याच्या निळ्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. त्याला प्रचंड चीड आली. हातातला फोन फेकून द्यावासा वाटला. केलीकडे फोन देऊन त्याने त्याच्या बॅगवर जोरात लाथ मारली. केलीला सांगितलं, "तू जा, मेरी ख्रिसमस. मी माझ्या या फॅमिलीसोबत राहतो..बाय मॉम"
केली त्याचा आवेश पाहून गोंधळते. जॉनला अजून बोलून उपयोग होणार नाही हे तिच्या लक्षात येतं. ती त्याला बाय करून परत निघते.
जॉन धावतच फादर ब्रोहन यांच्या केबिनमध्ये येतो. त्याला खूप ओरडावसं, रडावसं वाटतं. पण तो पाहतो फादर कॅडल्स लावून येशूच्या मूर्तीसमोर डोळे मिटून उभे आहेत. पूर्ण खोलीत अंधार पसरलेला आणि त्यांची ध्यानस्थ चेहरा, समोर येशू. फक्त कॅडल्सचा प्रकाश. जॉनचा राग कुठल्या कुठे विरघळतो. त्याला शांत वाटतं. तो बराच वेळ तिथे शांत बसतो. फादर ब्रोहन त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवतात. तो उठतो त्यांना मिठी मारतो. त्याला काहीच बोलायचं नसतं.
थोड्यावेळातच तो बॅग घेऊन रूममध्ये त्याच्या जागेवर येतो. डॅन काही चित्र काढत असतो. साराचा बेड रिकामा दिसतो. त्याला साराची खूप आठवण येते. तो तिने दिलेले ग्रीटिंग उघडतो आणि मेसेज वाचू लागतो, "डिअर जॉन, आपण सगळी गॉडची मुलं आहोत. सांता त्यांनाच गिफ्ट देतो ज्याच्या मनात सगळ्यांविषयी प्रेम असेल. तू खूप प्रेमळ आहेस. आणि माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. नेहमी असाच रहा. 'मेरी ख्रिसमस' " जॉन मनोमन खुश होतो. त्याला खूप सेप्शल वाटतं. तो डोळे मिटून सांताकडे प्रार्थना करतो," डिअर सांता माझ्या मॉम डॅड ना नेहमी सुखी ठेव. आणि सारलाही, डॅन , फादर ब्रोहन, सिस्टर लोरीस आणि मार्क, लॉरेल……."
त्याची नावांची यादी थांबते. सगळ्यांसाठी प्रार्थना करून त्याला पहिल्यांदा इतकं आनंदी वाटतं.. त्याला लक्षातही येत नाही की स्वतःसाठी त्याने काहीच मागितलं नाही. हा "ख्रिसमस" त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारे "मेरी/हॅपी" होतो.
...समाप्त….
©️शीतल अजय दरंदळे
aolsheetal@gmail.com
सर्वांना कशी वाटली कथा, नक्की कळवा. 'शीतलच्या शब्दांत' पेजला लाईक करायलाही विसरू नका. Merry Christmas"


2 टिप्पण्या
जॉन च्या मनातील राग, द्वेष, चीड आणि नंतर निर्माण होणारं प्रेम....! एका मनाचे बदलत जाणारे भाव आणि शेवटी एक आश्वासक चित्र...!! खूपच छान वाटली कथा...!!
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद मेघश्री
हटवाNo spam messages please