विश्वास डोकं टेकवून छताकडे बघत हताश बसला होता. फॅनचे तीन हात अगदी मरगळल्यासारखे एकामागे एक गोल गोल फिरत होते. मुंबईच्या उन्हाळ्याला ते अजूनच वाढेतयेत की काय असे वाटत होते. बूट अजूनही पायात तसेच होते. बुटाच्या लेस जमिनीवर फतकल मारून अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.शर्टचा टाय ढीला करून तो हतबल बसला होता.
निशा आतून थंड पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याजवळ बसली.त्याच्या हातात ग्लास दिला. पाण्याचा एक घोट पिऊन तो मान खाली घालून बसला.
"विश्वास, तू मान खाली घालायची काही गरज नाही. तू काही चुकीचं वागला नाहीस"
"निशा नोकरी गेलीये माझी, दोन तासात सगळं संपलं" विश्वास डोळ्यात पाणी आणून म्हणाला.
"नवीन मार्ग मिळेल,तू हताश होऊ नकोस. मी आहे ना?" निशा त्याचा हात हातात घेत म्हणाली.
विश्वासला एकदम भरून आलं, तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. निशाचे डोळेही पाणावले. ती त्याच्या डोक्यावरून हलका हात फिरवत राहिली.
विश्वास गुणे नावाप्रमाणेच अतिशय गुणी मुलगा. शाळेत असल्यापासून अत्यंत हुशार. पहिल्या पाचात याचं नाव पक्क असायचं. डिग्री पूर्ण करून एमबीएसाठी मुंबईत आला. एमबीए नंतर एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करू लागला. गावाकडे भरभक्कम पैसा पाठवू लागला. बापाने सांगितलं तू साठव पैसे आणि मुंबईत घर घे. याने तसंच केलं. ठाण्याला टू बीएचके बुक केला. पॉश सोसायटी,अधून मधून गावाकडून आई बाप येऊन जात होते. विश्वास पंचविशीचा झाला आणि घरी लग्नाची बोलणी घरी सुरू झाली. विश्वास स्थळं बघू लागला. कुठली मुलगी पटवावी असा प्रयत्न त्याने कधी केला नाही. मुंबईच्या मुली गावाकडच्या मुलाला कशाला हो म्हणतील? म्हणून त्या फंदात तो कधी पडलाच नाही. दिवाळीत मोठी सुटी टाकून गावाला गेला, तिथे चार मुली पाहिल्या. तिसरी भावली आणि लग्नाची बोलणी झाली. लग्न झाले.
निशा सोनपावलांनी घरात आली. विश्वास हळू हळू संसारात रमला. निशा ही संसारी मुलगी. घर, संसार, स्वयंपाक यात रुळली. दोघा राजारणीचा संसार सुरू झाला. पण त्या दिवशी असं काही घडलं की विश्वास हादरून गेला. त्याच्या बॉसने त्याला बोलावून सगळं हँडओव्हर करायला सांगितलं. कारण काय ? तर कंपनी आर्थिक तोट्यात आहे. पण विश्वासला खरंच वाटेना. इतक्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला हे असं काढून टाकावं? पुढच्या सहा महिन्यांचा पगार आणि सगळी कागदपत्रं त्याच्या हातात दिली. विश्वासला काही बोलयला वेळच मिळाला नाही. अश्या अपमानास्पद वागणूक मिळेल असं त्याला कधी वाटलही नाही. पण दुर्दैवाने तेच सत्य होतं.
निशाला कळल्यावर धक्का बसला. पण तिने क्षणात स्वतःला सावरलं. तिने खंबीर व्हायचं ठरवलं. आता खरी गरज होती विश्वाससोबत उभं राहायची. थोडाफार अर्थिक फटका बसणार होताच पण हातात वेळ होता. सगळे अवाजवी खर्च कमी करायचं गणित ती जमवू लागली. विश्वास हळूहळू सावरत होता. त्याच्या कलाने ती घेऊ लागली. जुन्या फोटोंचा अल्बम ती घेऊन त्याच्या पुढ्यात बसली.
"विश्वास हा बघ तुझा फोटो या ट्रॉफी बरोबरचा? कसली ट्रॉफी आहे ही?"
"मी आठवीत होतो तेव्हा, चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळाले होते. पहिला आलो होतो"
"काय? तू चित्र काढतोस? कधी बोलला नाहीस"
"त्यात काय सांगायचं? सगळ्यांना काही ना काही कला येतेच"
"हे बघ अजून सर्टिफिकेट पण आहेत, तू बरीच बक्षिसं जिंकलीस की" विश्वासाने कपाटावरची खूप जुनी फाईल काढली. त्यात काही चित्र होती. निशा अवाक झाली. विश्वासचा हा कल तिला माहीतच नव्हता. तिने पटापट त्यातल्या काही चित्रांचे फोटो घेतले आणि सोशलमीडियावर शेयर केले. विश्वासला हे अजिबात आवडलं नाही पण निशाने ऐकलं नाही.
दुसऱ्या दिवशी निशा काही कामानिमित्त बाहेर गेली. तिने विश्वासला विचारलं पण त्याचा मूड नव्हता. दोन तीन तासांनी ती मोठ्या बॅग्स घेऊन घरी घेऊन आली.
"निशा, हे काय आहे? तू कुठे होतीस'
"सांगते, घोटभर पाणी तरी पिऊ देशील ना?" ती बॅगा टाकून आत गेली. विश्वास पाहत होता, लॅपटॉपची बॅग दिसत होती. बॉक्स दिसत होता. कॅनव्हास, रंग, पेन्सिल, ब्रश काही पुस्तकं होती. त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने निशाकडे पाहिलं.
"तू आता काय मला चित्रं काढायला लावणार आहेस का?, किती खर्च केला आहेस"
" खर्चाची काळजी करू नकोस, मी दरवर्षी माझ्या अकाउंटवर साठवले होते. काही अनावश्यक खर्च टाळून. आता गरज होती म्हणून ते काढून घेतले. "
"पण हे कशासाठी? नोकरी शोधायची सोडून हे रंगरंगोटी करत बसू का?"
"विश्वास, ही कला आहे. जी तुझ्यात आहे. काल जे तुझ्या चित्रांचे फोटो टाकले होते ना सोशल मीडियावर, त्यावर शेकडो मेसेज आलेत मला. लोकांना इतकी चित्र आवडली आहेत. आता पहिल्यांदा अशी संधी मिळलीये. तू वेळ काढून छंद जोपस. नोकरी शोधण्याचं काम पण सुरू ठेवूच ना. नोकरीने जीवनाचा चरितार्थ चालतो पण कलेमुळे जीवनात जिवंतपणा येतो रे"
विश्वास कागद, पेन्सिल ,रंग यामध्ये इतका बुडाला की त्याचा चेहरा फुलू लागला. आधी हात बसायला वेळ गेला पण सरावाने मनातले रंग कागदावर खुलून येऊ लागले. त्याला आंतरीक समाधान मिळू लागलं. निशा हे टिपत होती. तो आत्मविश्वास हरवून गेलेला विश्वास परत दिसू लागला होता . एका स्पर्धेत त्याने चित्र पाठवलं ते तिसऱ्या क्रमांकावर निवडून आलं. विश्वासला अत्यानंद झाला. त्याने जोमात काम सुरू केलं. एक ग्रुप जॉईन केला त्यात कामं मिळू लागली. कोणाला घराची भिंत डिजाईन करायची होती, कोणाला पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन करून हवे होते. कोणी तर क्लास सुरू करायला सांगितले. हळूहळू पैसा येत होता. विश्वासला खरंच वाटेना. त्याचं नाव होऊ लागलं. लोकं ओळखू लागले. विश्वासची उमेद वाढली . एखादा छोटासा कोर्स करावा असा विचार तो करू लागला. निशाने त्याला प्रोत्साहन दिले. अजून शिकून घे यात खूप मोठं करिअर आहे. नोकरीचे इंटरव्ह्युही त्याबरोबरीने सुरू होते.
विश्वासने एका पुस्तकाचे डिझाईन केलं होतं ते एका प्रकाशकला इतकं आवडलं की त्याने अनेक लेखकांना विश्वासचे नाव सुचवलं. विश्वासने रात्र रात्र जागून ते काम पूर्ण केलं. त्याचा मोबदलाही डबल मिळाला. कॉम्पुटर ग्राफिक्स कोर्से सुरू केला. या क्षेत्रात नवीन संधी हवी तर डिजिटलही शिकून घेतलं पाहिजे. जात्याच हुशार असल्यामुळे त्याने तेही पटकन शिकून घेतलं. आपलं सोशल मीडिया पेज सुरू केलं. त्यात केलेली सगळ्या कामांची माहिती आणि फोटोही टाकले. हळूहळू फॉलोअर्स वाढले. मोबाइल वाजू लागला. आता अशी वेळ आली की काहो कामं त्याला नाकारावी लागली. इतका वेळच नव्हता. कधी चांगले वाईट,अनुभव येत होते पण निशाने ती बाजू सभाळली. तिचा खमक्या स्वभाव विश्वासला बरोबर साथ देत होता.
त्या दिवशी इंग्लंडवरून एका मित्राच्या भावाचा फोन आला, त्याला भारतीय रेस्टॉरंट लंडनमध्ये उघडायचे होते. नवीन भिंतचित्र करण्यासाठी त्याला भारतीय चित्रकारांची गरज होती. त्याने डिजाईन करून मागितली जर आवडली तर पौंडमध्ये पैसे मिळणार होते. विश्वासाने लगेच होकार कळवला. आणि तयारी सुरू केली. आताच केलेल्या ग्राफिक कोर्सचा खूप उपयोग झाला. त्याने निर्धारित वेळेत काम करून दिलं.
निशाने हात जोडून देवाची आराधना केली. "देवा हे काम होउ दे,खूप उपकार होतील"
"निशा वेडी आहेस का? त्यांना आवडलं तर मिळेल, नाही आवडलं तर नाही. इतकी का काळजी करतेस?"
"तसं नाही रे! ही खूप मोठी संधी आहे, परदेशात काम मिळण्याची. "
विश्वासचा फोन वाजला. निशाची उत्सुकतेने पाहू लागली. ज्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता तिथून निवड झाल्याचा कॉल होता. विश्वास खूप खुश झाला. निशाने ऐकल्यावर ती संभ्रमित झाली. "विश्वास आता काय करायचं? इतके महिने तू हे काम करतोयस यात यशही मिळतंय. आता पूर्ण बंद करून पुन्हा नोकरी करणार?" विश्वासही विचारात पडला. नोकरीचे महिन्याचे महिन्याला पैसे मिळणार पण हे काम आज मिळेल उद्या कोणी अजून आलं तर माझा पत्ता कट होऊ शकतो. काय करावं सुचेना.
गावावरून बाबांचा फोन आला, त्यांना नोकरी गेल्याची बातमी कळवली नव्हती. त्यांना त्रास होईल म्हणून लपवलं होतं. पण कुठूनतरी बातमी गेलीच. बाबा म्हणत होते, "तू कशाला काळजी करतो रं? तुझा बाप हाय की खमक्या. अश्या हजार नोकऱ्या आल्या गेल्या. तू तुझी कंपनी टाक. मी करतो मदत. तुझी आय उगाच टीप गळीत बसलीय. येतो मी तिला घेऊन उद्याच" विश्वास, निशाला भरून आलं, आनंदाश्रू वाहू लागले. निशानी विश्वासच्या डोळ्यात डोळे घालून म्हणलं, "आता संभ्रम दूर झाला का?"
"हो निशा, मी आता नोकरी नाही करणार. मी याच क्षेत्रात खूप मेहनत करणार. अजून जम बसला की फर्मही सुरू करूयात. अनेक संधी मिळतील. पण आता मागे वळून बघायचं नाही. मला तुझ्या म्हणण्याचा अर्थ कळलाय. कला माणसाला जिवंत ठेवते. पैसा हा व्यवहार आहे तो गरजेचाच आहे पण तो मिळवायला स्वतःची ओळख करून सिद्ध करावं. बाकी गोष्टी मागोमाग येतातच. यात जो आनंद आहे तसा मला कधीही मिळणार नाही."
निशाने आनंदून त्याला मिठी मारली. लॅपटॉपवर मेसेजचा आवाज झाला. विश्वासाने मेल उघडून बघितला तर लंडनवरून त्याचे काम निवडलं गेल्याचा मेल आला होता. दोघेही हा योगायोग बघून हरखून गेले. निशाने देवापाशी दिवा लावला आणि दोघांनी नमस्कार करून देवाचे आशीर्वाद घेतले. दिव्याच्या प्रकाशात तेजाने दोघांचे चेहरे उजळून निघाले. नवी उमेद आता भरारी घेणार होती.
..समाप्त..
©️शीतल अजय दरंदळे
aolsheetal@gmail.com
सर्वांना कशी वाटली कथा? नक्की कमेंट करून कळवा. 'शीतलच्या शब्दांत' पेजला लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद


1 टिप्पण्या
छान आहे कथा... संवादामुळे जिवंतपणा आला आहे
उत्तर द्याहटवाNo spam messages please