कथा - हावरट
©शीतल अजय दरंदळे
***********************************************************************
"अय्या पावभाजी कोणी आणलीये? अहाहा" सरलाने अगदी उत्सुकतेने विचारले..
नीलिमा,रेवती,आशिष , तृप्ती, विजय एकमेकांकडे बघत सूचक हसले. आणि सगळ्यांनी आपापले डबे उघडले.. सरला तिच्या डेस्क वरून उठून सगळ्यांच्या डब्यात बघत होती. रेवतीची पावभाजी बघून तिने डबा पटकन ओढून घेतला आणि आपल्या प्लेट मध्ये त्यातली अर्धी भाजी आणि दोन पाव वाढून घेतले. तिने बकाबका खायला सुरुवात केली.
" रेवती मस्त झालीये गं पावभाजी, मी पण अशीच करते..अगदी हॉटेलमध्ये असते तशीच होते माझीही" पहिला घास खाल्ल्यावर सरला म्हणाली..
"विजय तू पुलाव आणलाय ना? या डिशमध्ये ठेव हा मला " सरलाने विजयकडे बघत त्यालाही ऑर्डर दिली.
विजय मानेनेच हो म्हणाला..सरलाकडे बघून सगळ्यांना हसू यायचं..
सरला शिवदे ऑफिसमध्ये नव्यानेच रुजू झाली होती. बावीस वय, उंच, सावळा वर्ण, सडसडीत बांधा, तेल लावून घट्ट पोनी बांधायची. सलवार कुर्ता, ओढणीची दोन्ही टोकं नेहमी पुढच्या बाजूला सोडलेली, मुलं जसे शेरवानी वर दुपट्टा घेतात तसेच. दापोडीवरून रोज दोन बस बदलून कोथरूडच्या ऑफीसला यायची..रोज उशीरच व्हायचा तिला..नुकतंच लग्न झालेलं.. नवरा दुसऱ्या शहरात कामाला होता..सुट्टीत यायचा...घरी सासू,सासरे आणि नणंद सगळे होते…
सरला कामात अगदी चोख होती. काही चुका झाल्या तर समजावून घ्यायची आणि परत चूक होऊ द्यायची नाही. नवनवीन शिकायला आवडायचं तिला. खूप हुशार आणि उत्साही असायची. फक्त एकच विचित्र सवय ..खायची… कोणीही काहीही आणलं की ही न विचारता अगदी अधाशी असल्यासारखी ओढून घ्यायची..ज्याने आणलं असायचं तो अगदी ओशाळून जायचा...नाही कसं म्हणणार? तसे ऑफिसमध्ये टिफिन शेयरिंग व्हायचं पण स्वतः काही भाग देणं वेगळं.. सरलाचा डबा कुठे असं विचारलं तर म्हणे, "आज आमच्या बाईने भाजी जाळली,आज खारट झालीये, आज पोळ्या कडक केल्यात" खूपदा डबाच आणायची नाही..आणि कधी आणला तर द्यायचीही नाही. तसं ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये खाता यायचं पण ही कधी एक रुपया खर्च करायची नाही..वरून म्हणणार,
"तुमचे डबे आहेत ना? मला असं किती लागणार आहे? "
सगळ्यांची गोची झाली होती..काय बोलणार अश्या वागण्याला? ती एक चेष्टेचा विषय बनली होती. ती नसताना आशिष तर अगदी हुबेहूब तिची नक्कल करायचा, मुलीच्या आवाजात म्हणायचा
"अय्या तृप्ती तू पुरणपोळी आणली का? दे बरं माझ्या डिशमध्ये,..अय्या नीलिमा तू आळूवडी? अय्या रेवती इडली?? द्या द्या" त्याची नक्कल बघून सगळे पोट धरून हसायचे..
एकटी नीलिमा म्हणायची, " असुदे रे, कोणाचं खाणं असं काढू नये..आवडतं तिला खायला"
" पण असा हावरटपणा शोभतो का? लहान आहे का आता ती?" रेवती
"मग काय स्वयंपाकाला बाई आहे ना तिच्याकडे, मग कधी स्वतःही सगळ्यांसाठी आणावं..हिनेnएकदा तरी स्वतः हून आपल्याला कधी खायला घातलंय का?" तृप्ती
"परवा आशिषच्या वाढदिवसाला आणलेला केक तिनेच अर्धा खाल्ला...कुठल्या गावावरून आलीये काय माहित? काही एटिकेट्सच नाहीत" सगळे परत खो खो हसले..
नीलिमा तेवढी शांत होती..तिला फार कोणाची चेष्टा मस्करी करणं जमायचं नाही आणि आवडायचंही नाही..कोणाच्या मागे असं बोलणे चुकीचं वाटे. तसं सरलाचही वागणं तिला खटकायचं पण व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणून ती सोडून द्यायची..
ऑफीसची वार्षिक पार्टी होती.. एका मोठ्या हॉटेलमध्ये सगळ्यांना कुटुंबासोबत आमंत्रण होतं.. सगळे छान तयार होऊन आले होते..नीलिमाही मिस्टरांसोबत आली होती..सरला कोणासोबत येते याची उत्सुकता सगळ्यांना होती..पार्टी सुरू झाली..सरला अजून आली नव्हती. बर्याच उशीरा ती आली तेव्हा तिच्या हाताला एक पट्टी बांधलेली दिसली."
"सरला, काय गं झालं हाताला?" निलिमाने काळजीने विचारले.
"काही नाही भाजलं,आज गुलाबजामचा बेत करत होते..नेमकं तेल उडाले"
"अरेरे काळजी घे गं, त्यामुळे उशीर झाला का? आणि एकटीच आलीस?"
"हो, ते सध्या इकडे नाहीत ना, म्हणून एकटीच आले. बसच मिळाली नाही लवकर"
"जाताना आमच्यासोबत ये, आम्ही सोडतो तुला. इतक्या रात्री एकटी जाऊ नकोस"
इतक्यात ऑफिसचे बाकीचे ही तिच्याभोवती गोळा झाले..तिला मेनूमध्ये काय काय आहे हे सांगू लागले..तिला घेऊनच गेले..तिही खूप खुश झाली.. अख्खं ताट भरून खायला बसली..सगळे मस्करी करतच होते, तिही हसत खात होती… सगळी पार्टी सम्पल्यावर निलिमाने तिला सोडण्याबाबत विचारलं पण तिला बसनेच जायचं होतं..मग शेवटी बसमध्ये बसवलं..
दुसऱ्या दिवशी ती उशिरानेच आली, दोन दिवस सुट्टी हवी होती म्हणून अर्ज करत होती..सगळ्यांनी विचारले तेव्हा लाजून तिने नवरा येणार आहे म्हणून सांगितलं. निलिमाने तिला डॉक्टरला तिचा भाजलेला हात दाखवून ये याची आठवण करून दिली.तो पूर्ण दिवस आनंदात गेला.
दोन दिवसांनी सरला आली..खुशीत होती. नवरा बायको बरंच कुठे कुठे फिरले होते..नविन फोनही घेतला होता. आणि चक्क डबा भरून सगळ्यांसाठी खास खाऊही घेऊन आली होती. आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं म्हणत रेवतीने टोमणाही मारून झाला..सरला लगेच हसून म्हणाली, "माझा वाढदिवस येतोय पुढच्या चार दिवसांत.. सगळ्यांसाठी पार्टी देणार आहे ,बघाल तुम्ही"
"खरंच का सरला? म्हणजे आम्ही डबा आणायला नको त्यादिवशी म्हणून" आशिषने कुजकं हसत विचारलंच..
"नाहीच आणायचा" सरला सरळपणे म्हणाली. सगळ्यांना चर्चेला विषयच मिळाला.
पुढचा दिवस परत सरला नेहमीप्रमाणे आली .. रिकामा डबा, सगळ्यांच्या डब्यातले खाऊ लागली.. त्या दिवशी संध्याकाळी ती बऱ्याच गडबडीत दिसली. सारखे कोणाचे तरी फोन येत होते.. साहेबांना विचारून घरी ही लवकर निघणार होती..बरीच तणावात दिसली.. निलमाने विचारलेही पण ती काही बोलली नाही.. निघायच्या गडबडीत होती..भराभर सामान आवरले आणि सरला तासभर आधीच ऑफिस मधून निघाली..
निलीमा बाय करून परत तिच्या कामात गुंतली. थोड्या वेळाने फोन वाजला.. बराच वेळ वाजत राहिला..दोनदा वाजल्यानंतर कळले की सरलाच फोन विसरलीये गडबडीत.. निलिमाने फोन घेतला उचलला..कोणा राकट स्त्रीचा आवाज आला. काहीतरी बोलत होती..निलिमाला कळलच नाही जरा वेगळीच भाषा होती..तिने फोन ठेऊन दिला. नीलिमाने ठरवलं आज सरलाच्या घरी जाऊन तिचा फोन द्यावा काहीतरी emrgency असायची तर कळणार नाही..
नीलिमा ऑफिस सुटल्यावर दापोडीला पोहोचली..सरलाचा पत्ता तिने बरोबर घेतलाच होता..बराच वेळानंतर ती तिच्या घराच्या जवळपास पोहोचली..एकंदर एरिया बघून तिला अंदाज आलाच होता..साधी वस्ती दिसत होती. बैठी पत्र्याची घर चिकटून चिकटून एकमेकांना उभी होती. काही एक मजली, दुमजली तर काही तिनजमजली. अंधाऱ्या गल्लीतून चालताना नीट जागाही नव्हती. विचारत विचारत ती एक घरा समोर पोहोचली..तिथे पाहिलं तर कुलूप दिसलं..ती जवळपास गाडीवर तशीच बसून राहिली..एक मूलगी तिच्याकडे बघत होती..तिने विचारलं " हे शिवद्याचं घर ना?" ती मुलगी मानेनेच हो म्हणाली.."कुठे गेलेत? मी सरलाच्या ऑफिसमधून आले आहे"
"सरला ताई का? ती दवाखान्यात असेल, सासू ला बरं नाही तिच्या" नीलिमाला ऐकून वाईट वाटलं..ती मुलगी पुढे म्हणाली, " असंच पाहिजे त्या म्हातारीला" नीलिमा अवाक होऊन तिच्याकडे पाहत बसली..
"हो, तुम्हाला माहीतच असेल ना? सरलाताईला घरचे किती छळतात ते, तुमच्याच ऑफिसमध्ये आहे ना ?"
..हं???? निलिमा न समजून प्रश्नार्थक बघत राहिली..
"अहो , सरला ताईच्या पैशावर घर चालतं सगळं, म्हणजे दादा कमावतो पण खूप कमी..सासू अख्खा पगार काढून घेते तिचा दर महिन्याला..थोडेसे देते खर्चायला..सरलाताईला तिला नीट स्वयंपाक येत नाही म्हणून उपाशीच ठेवते. सारख्या शिव्या बसतात तिला..सरलाताई जे बनवेल तेच तिने खायचं..सरलाताई ला इतकी सवय नव्हती स्वयंपाकाची मग कधी जळत,कधी कच्च राहतं, कधी खारट, तिखट पण ते तिनेच खायचं. बरं बाहेर काही खाईल तर पैसेच नाहीत..खूपदा शिळच खावं लागतं… फक्त दादा येतो तेव्हा सगळे चांगलं वागतात..पण तो येतो महिन्यातून एकदा..इतर वेळी ती गप्पच..किती वेळा मग मीच तिला काही आणून देते. तिला नाही आवडत स्वयंपाक करायला..तिला नोकरी करून खूप मोठ्या हुद्द्यावर जायचय ,स्वयंपाकाला बाई ठेवायचीये..त्या दिवशी तर गरम तेल उडालं हातावर ,भाजलं तिला पण तेल खाली सांडलं , वाया घालवलं म्हणून शिव्या खायला लागल्या , हाताकडे तर कोणी पहिलच नाही"
"फक्त स्वयंपाक बनवता किंवा आवडत नाही करायला म्हणून इतकी मोठी शिक्षा?" नीलिमाचे डोळे भरून आले. तिने सरलाचा फोन तिच्याकडे दिला व ती घरी निघाली. गाडी चालवताना डोळे सारखे भरून येत होते..सरलाच्या वागण्याचा अर्थ आता उलगडला होता..ती हावरट नाहीच, ती खरं तर उपाशीच...आणि एकदाही बोलली नाही कोणाला..
दुसऱ्या दिवशी फोन मिळाला म्हणून सरलाने निलिमाला फोन केला..सासू हॉस्पिटलमधून घरी आली की येते असं सांगितलं…
दोन दिवसांनी सरला आली तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच.. सर्वांनी आनंदाने तिचे स्वागत केले..सगळ्यांनी डबे भरून तिचे आवडते पदार्थ करून आणले होते..निलीमाने मोठ्या प्रेमाने तिचे औक्षण केले. तिला खाऊ घालताना नीलिमा आणि सगळ्यांचे डोळे भरून आले..सरलाला काही कळेना..पण निलिमाने काही कळू दिलेच नाही..इतके सारे पदार्थ पाहून तिचे ही मन आनंदून गेले होते..यापुढे तिला कोणीही हसणार नव्हतं…
....समाप्त....
©शीतल अजय दरंदळे
(कथा कशी वाटली नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा )


2 टिप्पण्या
शीतल बाई तू छान च लिहितेस!
उत्तर द्याहटवामला आवडलं साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही!लिखाण चालू ठेव!नववार्षाच्या शुभेच्छा
विकास शिंदे
खूप धन्यवाद, Happy new year..
हटवाNo spam messages please