कथा - रिकामी जागा
********************************************
"बाबा तुम्हाला काही समजत नाही" ऑफिस मधून आलेली मोठ्ठी झालेली लाडकी लेक मनू बाबांच्या हातातला मोबाईल खेचत म्हणते.
"अगं नवीन फोन आहे अजून, वेळ लागेल की" श्रीकांत मनूला सांगतात.
"हे बघा, हे असं झालं डाऊनलोड..लवकर शिका" बाबा चश्मा नाकावर वर सावरत बघतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून लेक म्हणते, " शिकाल लवकर सगळं?"
"तू अमेरिकेला जायच्या आत डेड लाईन दिलेय स्वतःला, अविनाशला भेटणार आहेस ना उद्या?"
" मी कुठे जात नाही,मी लग्नच करणार नाही तर भेटायचे कशाला? मी तुम्हाला सोडून नाहीच जाणार"
"मनू वेडी आहेस का तू? अवी खूप चांगला मुलगा आहे , खूप हुशार आहे मेहनती आहे.. कर्तुत्वाने अमेरिकेपर्यंत पोहोचलाय तूही तिकडे प्रगती करू शकतेस.. का असं प्रवाहाविरुद्ध जायचं आहे तुला?"
"हो मी वेडी आहे,आपण हा विषय थांबवला होता. आई गेली तेव्हा, दोन वर्षांची होते मी.. तुम्ही एकटे राहिलात माझ्यासाठी प्रवाहाविरुद्ध " मनू तिचा निर्णय सांगते.
श्रीकांत गप्प झाला, मनू हट्टी आहे हे त्यांना चांगलच माहित होतं. एका अपघातात कविता सोडून गेल्यापासून मनू आणि तो इतकंच त्यांचं जग. अनेक मित्र म्हणाले लग्न कर परत, सोपे नाहीये आयुष्य एकटे काढण पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. मनू ची सर्व जबाबदारी एकट्याने घेतली.ऑफिस सांभाळून मनू कडे दुर्लक्ष केले नाही.. ऑफिस मध्ये कधी बढती दुसऱ्या ठिकाणीं आली तर स्वीकारली नाही कारण मनुची शाळा, मित्र-मैत्रिणी बदलायला नको. बसलेली घडी विस्कटली की परत मनुला अवघड जाऊ नये हाच विचार. तिही अभ्यासात खूप हुशार, शाळेत पहिला नंबर सोडला नाही कधी.. अनेक मित्र मंडळी जोडली..शिक्षकांची नेहमी लाडकी राहिली त्यामुळे श्रीकंतची कॉलर नेहमी ताठ. दोघांच्या आयुष्यात कधी तिसऱ्याची कमी जाणवली नाही. मनू जशी मोठी होऊ लागली श्रीकांतने मित्राची भूमिका घेतली. त्यामुळे मनू ही मन मोकळे करायला कधी कचरली नाही. अशी ही बाप लेकीची घट्ट जोडी.
मनूला कसे समजवावे हे श्रीकांत ला समजत नव्हते. आता बाबांना सोडून जायचे नाही म्हणून लग्न नको, परदेशी नको असं तिने ठरवले होते. ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. आता लॅपटॉप , स्मार्ट फोन ही तो शिकून घेत होता कारण कुठंही राहिलो तरी सहज जोडले जाऊ शकू. फोन वर म्हणूनच तो watsup वर शिकत होता. अनेक नंबर जोडत होता. तितक्यात एका ग्रुप वर तो add झाला. ग्रुप त्याच्या कॉलेजचा होता. अनेक मित्र त्याला वेलकम करू लागले. श्रीकांत पूर्णवेळ सगळ्यांशी chat करत राहिला. त्याला खूप आनंद झाला. जवळपास राहणारे २,४ मित्र होते ज्यांचे येणं जाणं होत पण बाकी सर्वांचा संपर्क नव्हता. त्यामुळे इतक्या वर्षांनी ती नावं ऐकल्यावर त्याला गंमत वाटली.
अचानक एक personal msg. आला. "हॅलो श्री कसा आहेस?" श्रीकांत एक मिनिट शांत झाला...कॉलेजात आपल्याला श्री म्हणणारी एकच 'समिधा'... हो नक्की तीच असणार.
त्याने रिप्लाय केला"समिधा?" .....रिप्लाय आला " कसं ओळखलं ?"
"श्री.म्हणणारी तूच आहेस समिधा" ....."बरं उद्या दुपारी कॉल करशील का?"......... "करतो,नक्की" bye..
श्रीकांत ला वाटलं "इतकंच??" समिधा इतक्या बोलण्यावरच कशी थांबली? मला वाटलं प्रश्नांची सरबत्ती सुरू करेल. श्रीकांत स्वतः शीच हसला.. कॉलेजमधली मैत्री .. कोवळ वय, अगदी सरळ विचार, स्वप्नवत जग या वयातच अगदी आपली जवळची मैत्रिण म्हणजे समिधा... तिचं खूप काही लक्षात आहे असं नाही पण दोन सोडलेल्या वेण्या आणि अखंड बडबड... या दोन गोष्टी कधीही न विसरण्या सारख्या....ही कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलू शकते..अगदी सहज..तिच्या या बिनधास्त आणि बडबड्या स्वभावामुळे च आपली खूप छान मैत्री झाली होती..कारण दोन विरूद्ध स्वभाव हा शांत आणि ती बडबडी, अगदी निखळ मैत्री ...
श्रीकांत ला मनूची हाक ऐकू आली..त्याने फोन बाजूला ठेवला आणि तो उठला...दोघेजण जेवायला बसले..श्रीकांतला अजूनही मधून हसू येत होते.. मनूने विचारले तेव्हा तो म्हणाला, काहीं नाही कॉलेजमधल्या मित्रामुळे ....तेव्हाच्या गमती जमती आठवल्या...दोघांनीही जेवण उरकले मनू ने आवरून ती झोपायला गेली आणि श्रीकांत समिधाचा विचार करतच झोपला..उद्या फोंन वर काय काय बोलायचे हा विचार करू लागला...
दुसऱ्यादिवशी दुपारी श्रीकांत ने फोन लावला.. समिधाने उचलला, श्रीकांत नें विचारले, " कशी आहेस ग? किती वर्षांनी बोलतोय तुझ्याशी?"
"मी मस्त आहे रे, तू कसा आहेस श्री? म्हातारा झाला आहेस ना ? मुलाबाळांची लग्न झालीं असतील हो ना?"
" नाही अजुन, एकच मुलगी आहे, लग्न व्हायचय अजून तिचे...आणि अजुन म्हातारा व्हायला खूप वर्ष आहेत"
"हो का? मी झाले रे म्हातारी...२ नातवंड झाली..मुलगा लंडनला आहे आणि दुसरा याच शहरात राहतोय..आणि आम्ही म्हातारे म्हातारी आपल्या जुन्या घरातच नव्याने संसार करतोय "
"नवीन संसार कसा गं?"
"अरे मुलं त्यांच्या मार्गी लागली की परत जेवायची दोनच ताट होतात, पोळ्यांची संख्या अर्ध्यावर येते, भाजी पावकिलो आणली जाते,, एकाच गाडीवर दोघांनी बसणं सुरू होतं...घाई गडबड संपते.. हा नवीन संसार नाही का?"
" वा काय व्याख्या आहे? छानच, एक प्रश्न विचारू?"
"बोल की"
"अजूनही तू दोन वेण्या घालतेस का गं?" श्रीकांत जोरजोरात हसू लागतो
"ए, गप्प बस, तू तेव्हा ओढून ओढून माझे केस सगळें उपटून टाकणार होतास ना"
'हाहाहा' दोघेही हसतात.
"मला वाटलं, कस बोलणार इतक्या वर्षांनी? पण तू तशीच बडबडी आहेस"
" अरे, ही जुनी नाती आहेत, तुटत नाही कधी, मनाने जोडली गेली असतात..कितीही वर्ष संबंध नसले तरी कधी दुरावत नाहीत"
"हो पटलं, तू कुठे राहतेस भेटूया ना आपण"
"हो ये की घरी, एकच शहरात राहतोय आणि या रविवारीच ये, सगळ्यांना घेऊन ये...बघ मी माझ सगळं सांगितल तू काहीच बोलला नाहीस..."
"भेटून बोलू की सविस्तर, रविवारी येतो"
"ये नक्की, ठेवते आता, कोणीतरी दार वाजवतय ...बाय"
"हो , बाय" फोन ठेवला.
श्रीकांत रविवारची आतुरतेने वाट पाहू लागला..कॅलेंडर वर त्यानें भेटीचा दिवस गोल मार्क करुन ठेवला. केस डाय केले..गाडीची condition ठीक करून घेतली....मनू आपल्या बाबांना नव्याने पाहत होती. इतके का उतावीळ झालेत कॉलेजच्या मैत्रिणीला भेटायला,? एवढं काय तिच्यात? इतके वर्ष तर कधी बोलले नाहीत मला...आणि इतका उत्साह कुठून आला??
पण श्रीकांत खुश होता हे बघून तिला बरं वाटलं ,,त्यांचा वेळ तरी छान जाईल..नाहीतरी ऑफिस मुळे मलाही काही जास्त वेळ देता येत नाही..साधं नाटक ही पाहता नाही आलय गेले कित्येक महिने...
रविवारी श्रीकांत खाण्याचे भरपूर पाकीट घेऊन आला..मनु ने विचारले, " बाबा इतकं का घेऊन आलाय आज? हे लाडू तर.आपल्या दोघांना नाही आवडत"
"अग समिधा कडे जायचे आहे ना आज? विसरलीस का? तूही येशील का? तिने सगळ्यांना बोलावलं आहे"
"बाबा तुम्ही कमाल करता, मी काय करू येऊन? मी ओळखत ही नाही.."
"तिला वेळ नाही लागत ओळख काढायला,तू एकदा भेट फक्त"
"नको, जा तुम्ही..मी नाही येणार..आणि ती जुनी गाडी कशाला हवी? रिक्षा ने जाऊ शकता की"
"तू नको येऊस, पण मला गाडी घेऊन जाऊदे, आठवणी आहेत" श्रीकांत हसत मिनूला म्हणाला.. मिनू शांत होऊन फक्त बघत बसली.
समिधा ही सकाळ पासून खूप गडबडीत होती. आज वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते खास श्रीकांत साठी.तिचे मिस्टर ही खूप उत्सुक होते श्रीकांत ला भेटायला.. संध्याकाळी श्रीकांतने दारावरची बेल वाजवली.. समिधाने पटकन जाऊन दार उघडले. दोघे एकमेकाकडे बघत तोंडभर हसले.. दोघांनीही एकमेकांना न्याहाळले... आजच्या वयाच्या खुणामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपत नव्हता.
सुमिधाने ओळख करून दिली. मग गप्पा रंगल्या, संध्याकाळ संपून कधी रात्र झाली हे दोघांनाही कळलेच नाही..समिधा चे मिस्टर थोड्या गप्पा आणि खाऊन झाल्यावर झोपायला निघून गेले पण समिधा आणि श्रीकांत खूप वेळ गप्पा मारत बसले. अनेक आठवणी नव्याने उलगडल्या, एकमेकांचे सुखदुःख सांगितले. शेवटी मनूचा फोन आला आणि श्रीकांत उठला. समिधा ने घड्याळ्याकडे बघितले आणि तिलाही खूप उशीर झाल्याचे जाणवले..शेवटी निरोप घेऊन श्रीकांत घरी आला.
मनू जवळजवळ गुश्यातच होती .पण बाबांचा प्रफुल्लित चेहरा पाहून ती काही बोलली नाही. श्रीकांतला मनमोकळ्या गप्पा मारून खूप बरं वाटलं..अश्या गप्पा आपण किती दिवस कोणाशी मारल्याच नाहीत याची जाणीव झाली..समिधा तेव्हाही खूप सहजपणे आपल्याशी सगळ शेअर करायची आणि आजही तसाच कनेक्ट आहे...जुनी नाती नव्याने भेटल्यावर ऋणानुबंध अजून घट्ट जोडला जातो असं त्याला वाटलं..
श्रीकांत पुढचे काही दिवस खूप छान मुड मध्ये होता. मनूला आश्चर्य वाटले. एरवी कंटाळा करणारे बाबा अचानक बदलल्यासारखे वाटले तिला. आज तर दोघे नाटकाला निघाले होते..बाबांनी मनू ला विचारले ही नव्हते. तिला वाईट वाटले. नाटक झाल्यावर कुठं प्रदर्शन होते नंतर कधी गाण्याचा कार्यक्रम , कधी नवीन हॉटेल उघडले म्हणून बाहेर जेवायचा प्रोग्राम..श्रीकांत समिधा सगळीकडे जायचे. मनूला वाटले आता तिची त्यांना गरजच नाहीये..ती खूप दुःखी झाली.पण बाबांना कसं बोलणार ते तर खूप आनंदी दिसत आहेत त्यांच्या नवीन मैत्रिणी बरोबर..तिला नक्की काय वाटतय हे तिचे तिलाच कळेना. पण ती वेळ लवकरच आली. मनूने एका रविवारी समिधाला जेवायला बोलावले.. ती आल्यावर श्रीकांत सगळ जातीने समिधा ला काय हवे नको पाहत होता..त्यांच्या मस्त चेष्टा मस्करी सुरू होती.. मनूला खूप राग आला ती एकदम भडकून बोलली..
"बाबा तुम्हाला आता माझी गरजच उरली नाही ना? तुमची मैत्रिण तुमच्या आयुष्यात आल्यापासून ?"
"मनू, काय बोलतेस हे ? तुझे आणि माझे नाते आता नव्याने सांगायची गरज आहे का? We are friends "
"मला नाही आता असं वाटत, माझे बाबा माझ्यापेक्षा जास्त तिच्याशीच बोलतात" मनू रडवेल्या आवाजात बोलली..
"मनू शांत हो बाळा, प्रत्येक नात्याची एक विशिष्ट जागा असते.ते कधीही रीपल्स होत नसते..समिधा आणि मी इतक्या वर्षांनी भेटलो कदाचित माझ्या मनातली मैत्रीची जागा इतके वर्ष रिकामी होती हे माझे मलाही कळले नव्हते. तुझ्याशी मी सगळ बोलतो पण तुझा दृष्टिकोन आणि माझ्या समवयस्क व्यक्तीचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो..शेवटी वयाचा फरक असतोच ग,..तुला जशी तुझ्या वयाची व्यक्ती समजून घेऊ शकते तितका मी घेऊ शकत नसेल..मी वडीलकीच्या नात्याने तुला समजावू शकतो पण तुमच्या वयाचे प्रश्न हे मला तितकेच समजतात असं नाही"
"बाबा बरोबर असेल तुमचं बोलणं पण तरी माझी चिडचिड का होतेय? I am really sorry"
"मनू तुम्ही दोघांनीही आपल्या जगात कधी कोणाला प्रवेश करूच दिला नाही. श्रीकांतने तुझ्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष केले आणि आता तूही लग्नाला नको म्हणतेय त्यामुळे श्रीला समजेना तुला कसे समजवावे..त्याला वाटतच ना तुझेही आयुष्य सुरळीत व्हावे..आईबाबा कोणाला आयुष्यभर पुरतात का ग? आपल हक्काचं माणूस आपल्याला शोधावं लागत.. एकटेपणा च्या यातना तुला होऊ नये असच त्याला वाटतं... त्याचं एकटेपण लादलेल होतं तू असं करू नकोस ती रिकामी जागा लवकर भरून काढ" समिधा मनूला समजावते..
"हो मावशी , मी असा विचार केला नव्हता कधी. एकाच चशम्यातून जग पाहता येत नाही..आणि बाबांसाठी मी कायम त्यांची लाडकी च राहणार आहे...जगाच्या पाठीवर कुठेही राहिले तरीही..आणि तुमच्या दोघांची निखळ मैत्री ही मला आता समजली"
" Thanks समिधा ..तुझ्यामुळे तिला समजावता आले, आता उद्याच अविनाश ला जाऊन भेटतो" श्रीकांत मनूला जवळ घेतो दोघांचेही डोळे ओलावतात.समिधाचेही डोळे बाप लेकीच्या प्रेम बघून भरून येतात.
"रडू नको मनू आता, रडकी मुलगी कोणी पसंत नाही करत बरका " समिधाच्या या बोलण्यावर तिघेही हसू लागतात..
......समाप्त...
©शीतल अजय दरंदळे

2 टिप्पण्या
छानच
उत्तर द्याहटवासुंदरच
उत्तर द्याहटवाNo spam messages please