कथा - आजीचं क्रिकेट, घना आणि चांदनी
।©शीतल दरंदळे।
*****************************************************************************************
नानी आजी घरभर घना ला शोधत फिरत होत्या..आजी म्हणजे असतील 70 नॉट आऊट आणि घना म्हणजे घनश्याम त्यांचा नातू...... कॉलेज करणारा...आता कॉलेज म्हणजे शिकण्यासाठी कमी आणि गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक सामूहिक जागा असे तो मानणारा.. नानि आजींना सकाळपासून रिमोट काही सापडत नव्हता म्हणून त्या घनाला शोधत होत्या..त्यांची आज क्रिकेट ची मॅच सुरू व्हायची वेळ झाली होती..
आजींना क्रिकेट चे भयंकर प्रेम..पूर्ण मॅच होईपर्यंत त्या टीव्हीला, गुळाला जश्या मुंग्या चिकटतात तशा चिकटून बसतात.. बरं नुसत्या बघत बसल्या तर कोणाला काय त्रास होत नाही, पण या रिमोट घेऊन जोरजोरात ओरडणार.."अरे विराट 4 मार..... अरे केद्या पळ की रन जोरात...वजन कमी केलं पाहिजे याने, पुण्याचं नाक कापणार हा आज... जसा की केदार जाधव यांच्या मागच्या गल्लीत राहतोय.. चहल ला ऑफस्पिन नीट जमत नाही अजून, असा चेंडू वळला पाहिजे ना, की डायरेक्ट पायामधून स्टंपस् वर..."" आणि हे ओरडताना अक्टिंग ही करायच्या.... त्यांच्या नऊवारी साडी त उभे राहून रिमोट हातात घेऊन त्याने कसा मारला पाहिजे याचे प्रात्यक्षिक बघताना तर इतकी गंमत यायची की सगळे बॅटस्मन धोतर घालून उभे असावेत असं बघणाऱ्याला वाटावे...
आणि या वल्ली नानी आजीचा अवली नातू म्हणजे घना..त्याला घना हे नावच आवडायचं नाही..घनश्याम हे नाव पुरातन काळात ढिगाऱ्याखाली बुजले गेले असूनही माझ्याच आईबापाने ते परत खणून काढून त्याला दिले असे त्याला वाटायचे..शाळेत तर त्याला लाज वाटायचीच, पण आता कॉलेजला आल्यावर ते कसे लपवायचे यासाठी तो हरप्रकारे प्रयत्न करायचा...रोजची होणारी हजेरी तर तो नाव घेण्याआधी हजर किंवा प्रेजेंट सर म्हणून मोकळे व्हायचा..सगळ्यांना त्याने स्वतःचे नाव सॅमी असे सांगितले होते..आणि तो स्वतःवर खूप खुश होता कारण ते नाव लवकरच सर्वांच्या तोंडी आले..खास करुन मुली जेव्हा त्याला सॅमी म्हणायच्या तेव्हा त्याला शेणाला cowdung म्हणल्या वर किंवा गावरान मेथी ला fengruk म्हणल्या वर कसं भारी वाटेल असं वाटायचं...
त्यामुळे नानी आजी त्याला घना या नावाने हाक मारूनही हा पठठ्या काही ओ देत नव्हता.. बाल्कनीत एका कोपर्यात बसून याचे कुठल्याश्या मुलीशी खूप महत्वाचे चॅटिंग चालले होते..पण आजीने शेवटी पकडलेच..
आजी --"अरे तू इथे बसलाय? कधीची तुझ्या नावाने हाक मारतेय, ऐकू नाही आले तुला??तरी सांगत होते हे वाढलेले केस काप एकदाचे, कान झाकले गेलेच आहेत..आता पूर्ण चेहराही नको झाकायला..आम्हाला कळणार नाही पाठमोरा उभा आहेस का सरळ उभा आहेस??
घना -- नाणी ते घना घना हाक मारण बंद कर आधी ,,तुला कितीदा सांगितलय..कॉल मी सॅमी..(केसातून हात फिरवून) आणि माझ्या केसांबद्दल तर बोलू नकोस..आपली हेअरस्टाईल तर आख्या कॉलेजमध्ये फेमस आहे.. मुली मरतात माझ्यावर...
आजी -- मरतात? का मारतात? परवा तो समोरचा पक्या सांगत होता..घनाला एका मुलीने मुस्काटात मारली का म्हणे तर तू तिच्यावर चारोळी फेकून मारलीस?? अरे तिला कवितेच्या चारोळी आवडत असतील, तू बासुंदीतल्या दिल्यास?
घना(गालावर हात ठेवत)- त्या पक्याला तर बघतोच मी...ते जाऊदे तू कशाला बोलावत होतीस मला?
आजी - अरे हो! ते तर विसरलेच.. तो मेला रिमोट सापडत नाहीये मला कुठेच..आज मॅच आहे ना..
घना- बाबांनी लपवून ठेवलाय तो..ऑफिस ला जाताना मला म्हणाले आजीला फक्त टीव्ही लावून दे आणि परत कपाटात ठेवून दे..तिच्या मॅच मुळे नऊ रिमोट फुटलेत आजपर्यंत...हा आता फुटायला नको..आणि मॅच लागायला अजून खूप वेळ आहे..
आजी(अतिशय दुःखी चेहरा करून ) - काय?? एका बिचाऱ्या म्हातारी बाईला ला साधा टीव्ही लावायला ही हक्क मिळू नये?..फुटले असतील दोन चार रिमोट माझ्याकडून...पण त्याची ही एवढी शिक्षा?? माझ्याच घरात मला असं म्हणावे लागेल आता ....कोणी घर देता का घर??
घना- आजी भाड्याच्या घरात राहतो आपण...त्यावरूनच आई बाबांना सारखी बोलत असते, देशपांडे घरान्याला एक साधं हक्काच घर घेता नाही आलं,,...आणि गप्पा घराणेशाहीच्या सगळ्यांच्या...
आजी- तिला काय कळणार घराणं?? भोर ला केवढा मोठा वाडा होता, पण इंग्रजानी खाल्ला का गिळला...वाडा गेला पण घराणं थोडीच नेणार आहेत? ते आपण चालवायचं..,पुढे तू न्यायचं कळलं का?? आणि दे रिमोट आता मला...
आजीने घनाकडून रिमोट ओढून नेला.. ..पण घनाला आनंद झाला कारण त्याला एकांत मिळाला गप्पा मारायला त्याच्या चांदनी बरोबर.. चांदनी नावाप्रमाणेच खूप सुंदर आणि गोड दिसायला..तिची आई श्रीदेवीची फॅन असावी बहुदा असा सर्वांचा समज..चांदनी गायतोंडे...तिला आडनाव सांगायला लाज वाटायची..त्यामुळे लग्न करताना मुलापेक्षा आडनाव ला महत्व द्यायचे तिने पक्क ठरवलं होत. Samy देशपांडे म्हणून तिच्या मनात बसला होता. त्याआधी तिने अनेकांना नकार दिला होता..
तिकडे गावसकर आणि त्याबरोबरच आजी ची ही कॉमेन्ट्री सुरू झाली आणि इकडे घना ने चांदनी ल फोन लावला...
"Hi डियर, काय करतेस? माझ्याच फोन ची वाट पाहत होतीस ना?" घनाने खुशीत येऊन विचारले..
" हॅलो.. आपण कोण बोलताय?" चांदनी चा अनपेक्षित सवाल..
" सॅमी बोलतोय आणि कोण ????माझा नंबर सेव्ह केला नाहीस तू?" सॅमीचिडूनच बोलला..
"अरे आऊट झालास तू, हो बाहेर..." मध्येच आजीची कॉमेन्ट्री.. सॅमीला वाटल आपल्यालाच बोलली..
" नाही रे राजा, वॅक्सिंग करत होते ना , earphone लावलेत म्हणून स्क्रीन पहिली नाही. आणि कधी कधी राजा च पण फोन येतो ना."
"राजा? तो कशाला फोन करतो तुला ?" सॅमी
" काही नाही अशीच आठवण येते त्याला माझी, शेवटी हे प्रेमाचे बंध असतात तुटत नाहीत लवकर" चांदनी उसासे टाकत म्हणाली.
" Wide टाकतोय बेट्या तू.." आजी परत बाहेरून...
"ए चांदनी...त्याला सांगून टाक सरळ,आता मीच मझ सर्वकाही आहे आणि तुला इतका का ग पुळका येतोय त्याचा! कसले प्रेमाचे बंध,??"
"अरे नाही, मी त्याला नो म्हणालेय. तो राजा पापुद्रे.... हे काय आडनाव आहे?..चांदनी पापुद्रे कस वाटतं ते,,, ई ई ई"
"तुला सॅमी देशपांडे आवडत ना.. तुला अजुन काय आवडत माझ्यात"
बराच वेळ चांदनी काहीच बोलत नाही, विचार करत असावी...
" डोक्यावरून बॉल टाकणार हा आता बघ, नो बॉल च होणार" आजी
"चांदनी अगं इतका वेळ लागतो विचार करायला?"
"नाही रे तुझे केस खूप आवडतात मला..ते बुटके कुत्रे असतात ना केस वाले, पोमेरानियन.. सेम तसेच आहेत..आणि मला कुत्रे खूप आवडतात."
" हॅहॅहॅ " आजी जोरात हसते... घना शंकेने बाहेर जाऊन बघतो. पण आजी मॅच मध्येच दंग असते..
"चांदनी ही कसली उपमा? जाऊदे, आता मी दाढी ठेवायचा पण विचार करतोय, स्टाईल आहे आजकाल...भारी दिसेल मला"
"नको नको, खूप गोऱ्या आणि हँडसम मुलांना छान वाटते ती..तू असच छान आहेस"
"तू फक्त अपमान च करतेस माझा मी ठेवतो फोन .....बाय." घना कॉल कट करतो..
" हॅहॅहॅ .....all out ...." आजी चित्कारत हात वर करते आणि रिमोट वर उडतो..आजी भीतीने ओरडते.. घना पळत बाहेर जातो..रिमोट पकडणार इतक्यात तो पडतो आणि फुटतो...आजी आणि घना एकमेकांकडे घाबरून बघतात..
"तुला कळत नाही का? आता बाबा मलाच ओरडणार ना"
"अरे फाय 150 त आँल आउट केलय इंग्लंड ला...आज भारत जिंकणारच..म्हणून .."
"म्हणून काय रिमोट फोडायचा...उडवून लावायचा...भारत जिंकेल पण माझी विकेट जाणार"
"तशीही गेली च आहे मगाशी" आजी हसत म्हणते..
"आजी...जाऊदे आता काय करायचं सांग" घना विचारतो..
" थांब पैसे देते घेऊन ये लगेच...कोणाला काय कळणार आहे?". घना पैसे घेऊन जातो..
तितक्यात बेल वाजते..आजी दार उघडते.. दारात कोणी गॉगल घातलेली, केस सोडलेली, उंची ड्रेस, गोरीपान मुलगी उभी होती..
" सॅमी आहे का?"
"तू कोण?"
"मी चांदनी"
"चांदणी असशिल तर चंद्राकडे जा....इकडे कशाला आलीस?"
"अहो आजी, मी सॅमीची खास मैत्रीण आहे,,तो कुठेय मला त्याच्याशी बोलायचय"
"त्याच्या अश्या बऱ्याच खास मैत्रिणी आहेत, ये तू ...बस.. वाट बघ"
आजी तिला न्याहाळत म्हणते, "तुझ नाव चांदनी कस ग!? मराठीच वाटतेय तू"
"हो माझ्या आईला आवडत, आता तुमचा नाही का Samy Deshpande तसाच"
"हॅहॅहॅ हुशार आहेस बोलण्यात तू,आवडली मला..क्रिकेट बघतेस का?"
"अय्यो!! हा काय विषय आहे?? मी कॉलेजला दांडी मारते मॅच च्या दिवशी,,धोनी खूप आवडतो मला..आज काय स्कोर झालाय? पाहताच नाही आली..पुढच्या आठवड्यात सबमिशन आहे,,मग पपा ओरडतात.."
"तू दिल खुश केलं माझं ...मुली...तूच नातसून होऊन येणार या घरी" आजी फरमान सोडते आणि तेवढ्यात घना येतो..चांदनी ला समोर बघून त्याला धक्का बसतो..
"आजी ही चांदनी, कॉलेजची वही घ्यायला आलिये. सबमिशन आहे ना पुढच्या आठवड्यात" घना सारवासारवी करत म्हणतो..
आजी आणि चांदनी जोरात हसायला लागतात..
"अरे घना मला सगळं कळलंय, मुलगी पसंत आहे देशपांड्यांना.."
" घना का बोलताय तुम्ही त्याला? "
"घनश्याम आहे त्याचं नाव" आजी नाव सांगून विस्फोट करते...
"काय घनश्याम ,,हे कुठल्या काळातले नाव आहे?' चांदनी चवताळून ओरडते...
"चांदनी मी सांगतो सगळ...... आजी तू पण कशाला बोललीस? आता झाली ना गडबड, कशी बशी ती पटली होती" घना आजीला बाजूला घेऊन बोलतो..
"अरे मला काय माहीत आता..हिट विकेट होईल ते" आजी . घनाला घाम फुटतो..
"प्रिये मी तुला सांगणारच होतो..पण तू असं चिडू नकोस" चांदनी ला समजावण्यासाठी घना तिच्याजवळ जातो.
"चिडत नाही मी..... पण मलाही काही सांगायच आहे ... माझ खर नाव " चंद्रकला गायतोंडे" उर्फ चांदनी"
काय????घणा ओरडतोच...
" हॅहॅहॅ ये लगा सिक्सर....चंद्रकला घनश्याम देशपांडे...अगदी घराण्याला शोभेल नाव"" आजी हसत बोलते...
घनश्याम आणि चंद्रकला एकमेकांकडे बघून डोक्याला हात लावून खालीच बसतात... आणि आजीची मॅच ची कॉमेन्ट्री परत सुरू होते...
... समाप्त......
© शीतल अजय दरंदळे, पुणे
(कथा कशी वाटली नक्की कळवा , धन्यवाद)


1 टिप्पण्या
कथा तुमच्या नावाने share करु शकतो का?
उत्तर द्याहटवाNo spam messages please