Ad Code

Responsive Advertisement

मुलं,वाचन आणि आपण

" मुलं,वाचन आणि आपण"
********************************************

"काय सारखं वाचना बद्दल बोलतेस आई? टीव्ही इंटरनेट वरून सर्व माहिती कळते. पुस्तक वाचणे हे किती आता किती outdated आहे. का वाचायचं?"

अशी वाक्य  सर्रास ऐकायला मिळतात आजकाल. पालकांना ही अवघड होऊन बसत की मुलांना कसे समजवावे?

वाचनाची आवड ही प्रत्येकाला असतेच असे नाही,पण अगदी वर्तमानपत्र का होई ना सगळेजण वाचत असतातच. निरनिराळ्या विषयावर वाचन करताना  माणूस नक्कीच विचारांनी प्रगल्भ होतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमं ही मला फास्ट फूड सारखी वाटतात. म्हणजे पटकन करता येण्यासारखी आणि चटपटीत. पण पुस्तक वाचताना ते थेट हृदयाला भिडतं. ती एक मेहनत घेऊन केलेली रेसिपी जी तितकीच चवदार बनते आणि फक्त पोट भरत नाही तर मनही भरतं.

किती तरी पुस्तकांची मी पारायणं केली आहेत. दर वेळेला वाचलं की ते वेगळंच जाणवत, प्रत्येकवेळी लेखकाची नविन दृष्टी अनुभवता येते. समजा एकच पुस्तक तुम्ही वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वाचता तेव्हतेव्हा ते एक वेगळी आणि सुखद अनुभूती देत जाते.

 मला पु. लं. लहानपणी फार कळायचेच नाहीत. त्यांची विनोदाची शैली फार अवघड वाटायची. पण जशी मी मोठी होत गेले, तसे ते मला समजत गेले. त्यांचे मानवी स्वभावाचे निरीक्षण आणि अभ्यास समजत गेला. म्हणून जरी कळले नाही तरी वाचत राहावे. आजही मला ग्रामीण कथा समजत नाहीत किंवा मी  वाचायला कंटाळा करते. मराठी साहित्यात याच विषयावर शंकर पाटील यांनी किती दर्जेदार लिहिले आहे. पण तरीही मी वाचते ,कारण एक दिवस नक्कीच ते मला जास्त चांगले समजेल किंवा भिडेल याची खात्री आहे. मराठी साहित्य जास्त लाडकं आणि जवळचं वाटतं कारण मातृभाषा. 

आज इंग्रजी माध्यमात मुलं जरी शिकत असली तरी त्यांना मराठी वाचायला प्रोत्साहित करावे. माझी लहान मुलं इंग्रजी लेखकांच्या प्रेमात आहेत, पण त्यांना मराठीची ही गोडी हळूहळू लागतेय. अगदी काही नाही तरी मराठी वृत्तपत्र तरी मी त्यांना आवर्जून वाचायला लावते, तितकाच शब्दसंग्रह वाढतो. विषयावरील ज्ञान वाढते. अर्थात यात त्यांना मजा आली पाहिजे आणि पालक वाचत बसले की मूलही लगेच पेपर घेऊन बसतातच. मुलं कोणत्याही भाषेत वाचूदे त्यात काही चूक नाही पण जितकी चव आईच्या हाताची वरणभाताची आठवते तितकी फ्राईड रईसची आठवत नाही. हा माझा अनुभव. कितीदा वाटतं पुस्तकं इतकी महाग असतात पण महिन्याच्या खर्चाचा हिशोब केला तर अनेक खर्च आपण वायफळ करत असतो. घराजवळ पुस्तकांची लायब्ररी असेल तर तुमच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही.

मुलांची आवडनिवड कायम बदलत राहते. आपल्याला कळतं की आता सध्या माझा मुलगा या विषयात रमलाय जसं कधी अंतराळा विषयी, एखाद्या खेळविषयी,चित्रकला, निसर्ग, एखाद्या गाडीविषयी, एखाद्या पक्षी/प्राण्याविषयी, अगदी एखाद्या कार्टून विषयी, किंवा सिनेमा, अनेक विषय आहेत. तेव्हा त्या विषयी पुस्तक मिळाले तर जरूर त्यांना द्यावे किंवा अगदी लेख दिला तरी चालतो.कारण त्या गोष्टीविषयी प्रचंड उत्सुकता मुलांच्या मनात असते. तेच जर आपण त्यांच्या हातात दिले तर ते आवर्जून वाचतात. परवाच माझ्या मुलाला रव्याचे लाडू करावेसे वाटले आम्ही यूट्यूब पहिलेच पण त्याला ओगलेबाईंचे रुचिरा ही दाखवले. त्यात आजीनी केलेल्या खुणा, सूचना, यातून कितीतरी आठवणी त्याला सांगता आल्या. त्यालाही गंमत वाटली.त्याने अख्ख पुस्तक चाळून काढलं. त्याने अनेक प्रश्न मला विचारले.आणि आमच्या गप्पा रंगल्या.

अगदी छडी घेऊन मुलांना वाचायला लावणे, किंवा टीव्ही च बंद करणे," इतर मुलं वाचतात मग तू काही नाही वाचत?"असे प्रश्न हे मला अजिबात पटत नाही.अश्याने मुलं वाचतात पण त्यांना गोडी लागत नाही. आताच संपलेले रामायणाविषयी माझा अनुभव सांगते. मुलांना पूर्वी मी रामायण वाचून दाखवले होते, तसेच मुलानी छोट्या छोट्या कथांमधून वाचलेही होते.  कुठला प्रसंग पुढे घडणार आहे हे त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांना इतकी गंमत वाटली. वाचून झाल्यावर बघूनही झाल्यामुळे त्यांच्या ते  मोठे झाल्यावरही पक्के लक्षात राहते हे निश्चित.

वाचन ही संस्कृती आहे ती हळूहळू जोपासायला हवी व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवी. मुलांच्या IQ विषयी नेहमी आपण दक्ष असतो पण EQ वाढवायला पुस्तकांची मोलाची साथ असते हे निश्चित. 

लेखाच्या पहिल्या ओळीतला प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर माझा अनुभव सांगते. 

असेच एकेदिवशी मुलगा मला म्हणाला," कार्टून किती छान असतं, एकावेळी किती स्टोरीज दाखवतात, पुस्तकात काही नसतं"

"बरोबर आहे तुझं, तू परवा जो भाग पहिला तो मला सांगू शकतोस का?"

तो म्हणाला " इतकं दिवस कधी लक्षात राहत का?"

" बरं मग मागच्या आठवड्यातली आपण वाचलेली त्या पुस्तकातली गोष्ट तुला आठवते का?"

"हो , सांगू का आता?"

"बघ बर आता, कार्टून चा अगदी कालचा भाग आठवत नाही पण वाचलेलं चांगलं लक्षात राहतं"  त्याला जे समजायचं ते तो बरोबर समजला. कारण वाचताना आपण नकळत त्याचे अर्थ ग्रहण ही करतो.

थोडक्यात काय तर वाचू आनंदे... जसे शरीर सूदृढ ठेवायला व्यायाम हवा असतो तसच मनाला वाचन. जमेल तसे नक्की जोपासावे.

©® शीतल दरंदळे
(तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा)




Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

No spam messages please