Ad Code

Responsive Advertisement

सोलोगामी की काय ते

 #सोलो_लग्न_आणि_श्रीकांत


©शीतल दरंदळे


सोलो लग्नाचं (स्वतःशीच लग्न करणे) खूळ डोक्यात घेतलेला श्रीकांत वय २५ ,आईवडलांचा सोलो (एकुलता एक) मुलगा आज घरात सगळ्यांना एकत्र घेऊन काही घोषणा करणार होता. एक आठवडा घरात नुसता गहजब उडला होता. श्रीकांतची आई, आजी, काकू जमेल तेव्हा जमेल तितके आसवं गाळून 'काय चुकलं या पोराला वाढवताना!' यावर विचार करत त्यांचा फॅमिली अल्बम काढून बसल्या होत्या.त्यातही त्यांना श्रीकांतचे सोलो फोटोच जास्त संख्येने आहेत हे लक्षात आलं. ते पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रूंची टीप जाऊन धबधबे वाहत होते.


बाबा,काका, दादा,आजोबा ह्यांना या बायांना कसं थांबवावं कळेना. यातल्या प्रत्येकाला सोलो काळजी लागली होती. पण आज काय ते सोक्ष मोक्ष लागुदे यावर त्यांचं सहमत झालं. श्रीकांत त्याच्या सोलो खोलीतून आला. हो! काही दिवसांपासून त्याने खोलीत एकटं राहणार म्हणून त्याच्या धाकट्या चुलत भावाला त्याचा लाडका क्रिकेट संच देऊन टाकला होता. क्रिकेट हा सांघिक खेळ मी खेळून काय करणार यापुढे सोलो खेळच शोधतो. म्हणून त्याने टेनिस, बॅडमिंटन खेळणे सुरू केले होते. यात जोडीदार नसला भिंतीला मारून खेळता येतं.घरात बुद्धिबळ आहेच.


सगळे गोल करून एकत्र बसले. श्रीकांत स्टूल घेऊन आला आणि मध्यभागी बसला. सगळ्या बायांनी ओढणी एका हातात धरून नाकाला लावली. आजी आपला पदर ओढून बसली.


श्रीकांत - आजोबा मी ठरवलंय आता सोलो लग्न करणार. मुहूर्त १० दिवसानंतर आहे.


हे खूळ सोडून दे बाळा. मुलींची काय कमी नाही. लग्न करून सुखात राहशील.


नाही आजोबा. माझा निर्णय ठरला म्हणजे ठरला. आता यात माघार नाही. श्रीकांत हे नावही मी सोडलं आता फक्त श्री..सोलो अक्षर..


अरे, काय दुर्बुद्धी सुचते तुला.. एकत्र कुटुंबात वाढलेला तू लहानपणी संडासला जायला तुला सोबत लागायची आणि आता सोलो लग्न?


काका, सोलो संडास आणि सोलो लग्न यात फरक आहे..


काकू - अरे कोपऱ्यावरच्या महाबळेश्वरलाही तू सोलो ट्रीप म्हणून ग्रुप टूर मध्ये गेला होतास. कसं जमेल एकट्याने सगळं?


जमेल सगळं जमेल.. आता 'मी आणि माझा ... ' आम्ही दोघं सुखाने आयुष्य जगणार.


मी..ठीक आहे पण तुझा .....


अहो जरा सांभाळून. प्रसंग काय तुम्हाला काही...?


श्री आता बास झालं. हे लग्न आम्हाला मान्य नाही. हे खूळ डोक्यातून काढून टाक.


नाही आजोबा..यादी करायला घ्या प्रत्येक घरातून एकाला निमंत्रण द्या. पुलाव किंवा बिर्यानी. गुलाबजाम किंवा जिलेबी..बास.


आजी - अरे तुझ्या पाचव्या वाढदिवसाला पण अख्ख गाव जेवायला आलं होतं. पंच पक्वा्नांवर ताव मारला होता...आणि लग्नात हे एवढच? ऐसे कैसे चलेगा


सासूबाई तुम्ही यूट्यूब बघणं जरा कमी करा. ऐसे कैसे चलेगा चॅनल वर बघून हसत असतात सारख्या.


 तुझे रेसिपी चॅनलवरचे फसलेले पदार्थ बघून हसण्यापेक्षा माझा ऐसे कैसे चलेगा चॅनल बरा. 


यूट्यूब आहे का विषय? प्रसंग काय आहे?


सोलो लग्नात एक एक पदार्थच करतात.


म्हणजे तूही फक्त कुर्ताच घालणार दादा? सोलो लग्न म्हणून विचारलं.


चेष्टा सुचते तुम्हाला? सोलो लग्न म्हणजे आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि...


आत्महत्या????


नाही!! आत्मसंशोधनाची एक संधी..आता मला duet गाण्यापेक्षा सोलो गाणी ऐकली जास्त प्रसन्न वाटतं..


श्रीकांत ऐक बाळा, लग्न म्हणजे सहजीवन, सहचर, सुख दुःख वाटून घेणे. असं एकाकी जीवन म्हणजे त्रास नाही का? माणूस हा समाजात राहणारा, कुटुंबव्यवस्था राखणारा प्राणी आहे.


हो ना, माझ्या चॅनलवर माकडांनीपण लग्नसंस्था स्वीकारली आहे असं पाहिलं मी परवा... 


हे सगळं जुनं झालं आजी..आता ट्रेण्ड प्रमाणे प्रत्येक प्राण्याला कसं राहायचा याचा अधिकार आहे. माकडांनी काय करावं हा त्यांचा त्यांचा सोलो विचार आहे.


श्रीकांत काय सांगू तुला? लग्न झाल्यावर पुरुषाचा माकडच होतो!


अहो! काहीही काय बोलताय सगळ्यांसमोर? 


काकू, लग्न झाल्यावर मी कितीतरी मित्र पाहिलेत, जे लग्न करून घटस्फोट घ्यायचा विचार करत आहेत. जे मोडायचंच आहे ते करायचं कशाला?


पण म्हणून सोलो लग्न हा विचार पटत नाही. हे म्हणजे स्वतःच दुकान उघडायचं, स्वतःच ग्राहक म्हणून यायचं, वस्तू विकत घेऊन परत दुकानात ठेवायची आणि दिवसाच्या शेवटी धंदा झाला या समाधानाने झोपायचं.


तुमच्या मागच्या बिझिनेसमधे तेच झालं. वड्यांचा बिझिनेस करत होते. माझ्याकडुन बनवून घेतले आणि ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये ठेवले. तिथे खपले नाहीत म्हणून स्वतःच विकत घेऊन खात होते. शेवटी कमाई नाही पण यांचं वजन वाढलं.


वड्यांना चव असती तर विकले नसते का गेले?


थांबा तुम्ही दोघं. विषय वड्यांचा आहे का? विषय लग्नात वडे की पावभाजी याचा आहे.


तुम्ही सगळे थांबा!!! फक्त विषयांतर होत आहे.मी सोलो लग्न करणार हे पक्क आहे. तुम्हाला मान्य नसेल तर मी एकटा जाणार आणि लग्न करणार.


अरे राज्य पण आजकाल एकटा पक्ष चालवू शकत नाही आणि हा अख्ख आयुष्य काढणार.


(तेवढ्यात रेणूची एन्ट्री) 


थांब श्री!!! माझ्या प्रेमाचं काय? कोविड काळात तुझ्या आणि माझ्या खिडकीतल्या भेटी विसरलास? तू ऑनलाईन भाजीची डिलिव्हरी घेताना, मी जेव्हा खिडकीत ओले केस झटकायचे. तेव्हा तू मास्कच्या आडून माझ्याकडे बघून आ वासत होतास. हे प्रेम नाही तर काय आहे? तू एकदा तरी मला विचारायचं होतस


रेणू खरं सांगू मला भीती वाटली. मागच्या महिन्यापासून तुझ्या घरात लग्नाची गडबड दिसली. लग्न ठरलं अस कळलं. मग काय करणार मी?


अरे माझं लग्न नाहीये. आज खिडकीतून पाहताना कळलं तू सोलो लग्न करतोयस. मला राहवलं नाही आणि थेट मागणी घालायला आले.


अरे ही खिडकीची लवस्टोरी आम्हाला कशी कळली नाही? तरी विचार करत होतो, श्रीकांत त्याच्या खिडकीतल्या दोरीवर बनियन चड्डी का वाळवू द्यायचा नाही? 


अहो विषय काय आहे? 


विषय लग्नाचा आहे. श्रीकांत आणि रेणू यांची लग्नपत्रिका आता लवकरच छापायला घ्या..मुहूर्त १० दिवसांवर आहे..काय श्रीकांत चालेल ना?


श्रीकांतच्या चेहऱ्यावर लाजत हसत dual लाली पसरली होती.


©शीतल दरंदळे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या