Ad Code

Responsive Advertisement

केके चे कोणते गाणे आवडते?

 

आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय कोरोनात आलाच होता. काल प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्णकुमार कुन्नाथ याच्या जाण्याने तो पुन्हा आला. तीन दशकांहून अधिक काळ संगीतप्रेमींना भुरळ घालणारी प्रसिद्ध बॉलीवूड गाणी त्याने गायली. वयाच्या फक्त ५३ व्या वर्षी आपल्या आवडत्या गायकाच्या आकस्मिक जाण्याने प्रत्येकजण दु:खी झाला असून,केकेचे स्मरण करून श्रद्धांजली वाहतो आहे.


केकेने आपल्या गायन कारकिर्दीत हिंदी, तेलगू, मल्याळम, पंजाबी, कन्नड आणि तमिळ अशा ११ वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. याशिवाय त्याला बंगाली आणि आसामी भाषेतही गाण्याची आवड होती. बॉलीवूडच्या चकाकीपासून दूर असलेल्या या गायकाने अनेक हिंदी गाणी गाऊन ती अमर केली आहेत. त्याची सर्वच गाणी पुन्हापुन्हा ऐकून ९० च्या दशकात तरुणाई त्यांचावर प्रेम करत होती. त्यातली काही निवडक गाणी आज केकेच्या स्मरणार्थ येथे देत आहोत.


१. पल -


पल अल्बम कोण विसरू शकेल? 90 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अल्बम . त्यात केकेच्या आवाजातले हे गाणे त्याकाळी सुपरहिट ठरले होते. खरतर त्या अल्बमची सगळीच गाणी हीट ठरली होती. यारों हे मैत्रीवर बेतलेले गाणे त्यापैकीच एक! आजही तितक्याच आवडीने ऐकले जाते. कॉलेज जीवनात या गाण्याने अनेकजण भावूक झाले होते.


पल हे गाणे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी गायलेले हे शेवटचे गाणे ठरले.


२. हम दिल दे चुके सनम - 'तडप तडप के'


ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप के' या गाण्याने लोकांना वेड लावले होते. या गाण्यात जे चढउतार आहेत, ते त्यांनी अगदी सहजपणे गायले आहेत. त्या गाण्यातला 'दर्द' रसिकांच्या थेट ह्रुदयात पोहोचतो. फक्त रोमँटिकच गाणी नाही, तर अशी ब्रेक-अप गाणीही गाऊन केके यांनी आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध केलं.


३. 'बचना ए हसीनो' - 'खुदा जाने'


रणबीर कपूरच्या 'बचना ए हसीनो' या चित्रपटातील 'खुदा जाने' या लोकप्रिय गाण्यात केकेच्या आवाजाने जादू केली होती. हे रोमँटिक गाणं रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. त्याकाळात संगीतविश्वात ते गाणे बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. रणबीरने मुलाखतीत हे गाणं त्याचं लाडकं आहे असं सांगितलं होतं.


४.काईट' - 'जिंदगी दो पल की'


हा चित्रपट तुम्हाला फारसा आठवत नसेल! पण 'जिंदगी दो पल की' हे केकेने गायलेले तुम्ही नक्कीच विसरला नसाल. हृतिक रोशनच्या काइट चित्रपटातील हे एक रोमँटिक गाणे आहे. हृतिक रोशन आणि बार्बरा मोरी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. 


५.तुम मिले' - 'दिल इबादत'


इमरान हाश्मी रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची बरीच गाणी केकेच्या आवाजात आहेत.इमरान हाश्मी आणि सोहा अली खान यांच्यासोबत असलेले 'दिल इबादत' हे गाणे केकेच्या जादुई आवाजातले गाणे आहे. हे गाणे म्हणजे रोमँटिक गाण्याची एक वेगळी ओळख आहे. याच चित्रपटातले तुम मिले हे गाणेही खूप गाजले होते.


६. 'जन्नत' - 'जरा सी'


रोमँटिक गाण्यांवर केकेची खास पकड होती हे या यादीतून तुम्हाला जाणवलं असेलच.. २००८ मध्ये त्यांनी गायलेल्या 'जरा सी' या रोमँटिक गाण्याने केवळ रोमँटिक गाण्यांमध्येच नाही तर संगीताच्या जगात एक नवा विक्रम केला. या गाण्याला यूट्यूबवर ६०००००००हून अधिक लोकांनी लाइक केले आहे.


७- दिल चाहता है - 'कोई कहे'


२००१ मध्ये दिल चाहता है चित्रपटाने खूप रेकॉर्डस मोडले. या चित्रपताटली गाणीही गाजली. तीन मित्रांवर असलेल्या कोई कहे या गाण्यात केकेचाही आवाज आहे. तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी हे गाणे होते. कितीतरी पार्ट्यामध्ये हे गाणे त्या काळात वाजले आहे.


८- 'बजरंगी भाईजान' - 'तू जो मिला'


हा चित्रपट फारसा जुना नाही. सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटातील 'तू जो मिला' हे गाणे केकेच्या आवाजातले आहे. आजही ते गाणे ऐकणाऱ्याला भावूक करते.


९- 'दस' - 'दस बहाने कर ले गये दिल'


अभिषेक बच्चन असलेला दस हा मल्टीस्टारर चित्रपट तुम्हाला कदाचित आठवत असेल.'दस बहने कर ले गये दिल' या गाण्यातील केकेच्या आवाजाची जादू अशी काही आहे की यावर तरुणाई थिरकली आहे लावते. या चित्रपटापेक्षा हे गाणेच हीट ठरले होते. डान्स चार्टमध्ये ते पहिल्या नंबर वर होते.


१०- 'ओम शांती ओम' - 'आँखों में तेरी अजब सी'


दीपिकाचा पदार्पणाचा सिनेमा म्हणून ओम शांती ओम हा सगळ्यांना माहिती आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित केलेले 'आँखों में तेरी अजब सी' हे गाणे त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे ऐकल्यावर आपण एका स्वप्नांच्या दुनियेत एका परीसोबत आहोत असाच भास होतो. 


 

‌केके आज आपल्यातून निघून गेले असतील, पण त्यांच्या आवाजाने ते कायम आपल्यात राहतील हे नक्की! 

तुमचे यातले आवडते गाणे कोणते आहे? कॉमेंट करून सांगा.


शीतल दरंदळे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या