#गोष्ट_एका_ट्रिपची...
©शीतल दरंदळे
मैत्रिणींची ट्रीप प्लॅन करणे म्हणजे सोपं नाही बरं...घरातलं लग्न ठरवणं एकवेळ सोपं, पण प्रत्येकीचे ऑफिस आणि घरच्या कामातून वेळ पाहून तारीख ठरवणं महाकठीण!?
तर गेले दोन वर्ष ठरत असलेली आमच्या चार जणींची ट्रीप 1 महिना अथक प्रयत्नांनी एकदाची ठरली. 4 दिवसांवरून क्रॉप करत डायरेक्ट दोन दिवसावर आणली . त्यामुळे लेह पासून सुरू झालेलं लोकेशन जवळ करत करत थेट महाबळेश्वर पर्यंत येऊन पोहोचलं. शेवटी आपलं महाबळेश्वर पण काश्मीरपेक्षा काही कमी नाही..या वाक्यावर एकवाक्यता झाली.
त्यानंतर शोधाशोध सुरू झाली हॉटेलची. सगळ्याजणी आपआपली नावं सांगू लागल्या.मला पोहायला येत नसलं तरी swimming pool हवा होता. कारण फोटो छान येतात. मग एकजण म्हणली वेण्णा लेक जवळ काढू तुझे फोटो ..स्विमिंग पूल नको. दुसरी म्हणाली ते जेवणाची सोय नीट बघा , मला बाहेरचं खाण्यामुळे acidity होते. आणि ते नाश्त्यात पोहे नको बाई. तिसरी काही म्हणायच्या आत चौथीने बुकिंग करून टाकलं..आणि सांगितलं आता तिथे जाऊनच बघा हॉटेल कसं आहे. त्यामुळे विषय संपला ....नाहीतरी त्यावर अजून आठ दिवस चर्चा रंगली असती.
निघायचा दिवस ठरला..शनिवारी सकाळी ड्रायव्हर दादा रेडी होते ..अगदी वेळेवर गाडी घेऊन आले. 🧳🧳आपापल्या नवऱ्याला प्रत्येकीने बॅगा उचलायला बोलवलं होतच. आमच्या हातात बॅग साईझ पाहून दोन की आठ दिवस जातेय? असा प्रश्न बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. पण तरीही मनोमन खुश होते..दोन दिवस बायको घरी नाही...हा आनंद मोठा होता...🤠🥸
मस्त गाडीने ऐटीत निघालो, सेल्फ्या पडत होत्या. कुठले फोटो कसे काढायचे, कुठे काढायचे, शॉपिंग काय काय करायची पासून ...'यावेळी जास्त नको बाई खर्च करायला. मेप्रोत खाण्यापेक्षा घरी जाऊन strawebery with cream बनवून खाऊ." असा चौघीनी समजुतीने निर्णय झाला.🫣😱
पांचगणीत पोहोचलो आणि पाहतो तर एक ४ बेडरूम चा अवाढव्य बंगला आमच्यासाठी सज्ज होता.😱🤗 एका बेडरूम मध्ये तर चित्रपटात दाखवतात तसा झोपून अंघोळ करायचा टब होता.🛀
दोन क्षण मी स्वतःला lux च्या जाहिरातीतील माधुरी समजले.. गुलाबांच्या पाकळ्या, पांढरा शुभ्र फेस,..पुढे विचार करणार इतक्यात मैत्रिणीने आवाज दिला.. "चल ग , चहा पिऊ." माधुरी फेसातच राहिली आणि मी वरच्या मजल्याच्या रूममध्ये पोहोचले. प्रशस्त बाल्कनी होती. तिथल्या मावशींनी आम्हाला रात्री जेवणाला काय खायचे विचारलं. माझ्या एका मैत्रिणीने तिला पदार्थ सांगताना रेसिपी सकट सांगितले. तिने सगळं ऐकल्यावर "मी करते चांगलं ताई, तुम्ही नका काळजी करू. " असं सांगून शेवटी ती निसटली. 😛
आम्हीं तिथेच एक पॉइंट पहायला गेलो. पाचागणी चा फेमस table land. इथे पोहोचल्या पोहोचल्या " मॅडम घोडा गाडीने जा, बरेच पॉइंट आहेत.तुम्ही पाहू शकाल" असं म्हणत एक घोडा गाडीवाला आला. माझ्यातला पुणेकर जागा झाला .."आम्हाला सगळं माहितेय🤔 इथलं...आम्ही चालतच जाऊ , तुम्ही वेळ घालवू नका" हे ऐकून तो काही न बोलता निघून गेला.
वातावरण आल्हाददायक होतं. १० मिनिटांनी एका मैत्रिणीची चप्पल वाजायला लागली. मैत्रीण चालणार होती पण चपलेला चालायचे नव्हते. 😜शेवटी आम्ही त्या घोडागाडी वाल्याला बोलावले.🐎🐎 त्याला कदाचित कळलं असावं. तो तयारच होता. तो आल्यावर म्हणला, " बसा" ...
" वो हमको चलना आता है, लेकीन मैत्रीण की चप्पल खराब हो गयी" मी गडबडले की वाईट हिंदी बाहेर येतं. मला थांबवत मैत्रीण म्हणाली, " बस आता, त्याला मराठी समजतं..मगाशी बोललो की आपण" 🫣🙈🙊
मी जीभ चावत पटकन बसले. मैत्रिणी खी खि हसायला लागल्या. पुढे एक एक पॉइंट पाहत, फोटो काढत पुढे निघालो. त्या घोडेवाल्याने पण आमचे चौघींचे फोटो मस्त काढले.
थोड्याच अंतरावर एक पांडव कालीन मंदिर होते. खाली उतरत भुयारातून जायचे होते. एका मैत्रिणीला ते बघूनच चक्कर आली.😵💫😵💫 आम्ही तिला सांगितलं तू इथेच थांब आम्ही जाऊन येतो. आम्ही आत गेलो. थंड वातावरण होतं तिथे.. अंधारात पण फोटो काढत होतो.बाहेर आल्यावर कळलं की अंधारात एकही फोटो धड आला नव्हता. पण खूप छान वाटलं.फारशी गर्दीही नव्हती. तिथे पाच मिनिटं शांत बसलो. शहरी कोलाहलापासून दूर त्या शांत जागी बसून कुठेतरी खोलवर शांत झाल्यासारखं वाटलं.
मग अचानक त्या वरच्या (म्हणजे जिला चक्कर आली ती तिथे वरच आमची वाट पाहत बसली होती) मैत्रिणीची आठवण झाली आणि आम्ही भरभर वर चढून गेलो.
पाहतो तर ती मैत्रीण एका ज्योतिषाबरोबर बोलत होती.🤲🤲 आम्हाला पाहून तो लगेच पुढे आला, माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाला, " तुम्ही वर्ल्ड टूर करणार मॅडम" . पुढे म्हणाला," तुम्ही सगळ्यांसाठी करता, पण तुम्हाला हवं तसं मिळत नाही. तुम्ही मनाने खूप चांगल्या आहात" फक्त चेहरा बघून तो हे सांगत होता.
माझ्याकडे तो ज्योतिषी बघत पण नव्हता. बहुदा माझ्या चेहऱ्यावर पुणे सोडून ही जास्तीत जास्त महाबळेश्वर करेल. हे लिहिलेलं त्याने वाचलं असावं. मी आपली चेहरा चुकवत पटापट चालत होते.😜🙈
थोड्यावेळाने ऊन वाढलं. मग बंगल्यावर पोहोचलो. जेवण केले आणि गप्पा मारत मारत कधी झोपलो कळलं पण नाही. ४.३० वाजता जाग आली. पन्ह पिऊन मस्त महाबळेश्वरच्या मार्केटला जायचा प्लान होता. शॉपिंग म्हणलं की आपोआप सगळ्यांना तरतरी येते. तिथे पोहोचल्यावर ड्रायव्हर दादांना सांगितलं, दादा एक तासात येतो आम्ही, तुम्ही इकडच्या कोपऱ्यात थांबा. 🛒🛒
मार्केटमध्ये चक्क गर्दी नव्हती. पुढे दोघी आणि मागे दोघी अशी टीम पडली..मी मागच्या टीम मध्ये. नवऱ्याने तंबी दिली होती, काहीतरी घेऊन ये. मोकळ्या हातानी परत येऊ नको (हो, मला शॉपिंगचा तसा कंटाळा येतो. पुण्यात सगळं मिळतं म्हणून बाहेर मी सहसा काही घेत नाही) . पण मैत्रिणीची साथ होती, म्हणुन अंगात वारं शिरल्या प्रमाणे काय-काय घेत सुटले. मैत्रिणी सगळ्या हुशार , त्यांना कुठल्या दुकानात काय मिळतं correct माहित होतं. सगळ्यांच्या हातातल्या बॅगा वाढत होत्या तरीही, डोळे अजून काय मिळेल शोधत होते. 👀👀
शेवटचं दुकान म्हणत एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे एकीला साडी घ्यायची होती. आम्ही दोघी फुटाणे घेऊन येऊ तोपर्यंत त्या दोघी साडी घेऊन टाकतील असा माझा मूर्ख कयास होता. साडी शॉपिंग मला अजिबात कळत नाही, त्यात नेसायला आवडत नाही. म्हणून त्या तिघी ते दुकान फिरत होत्या. मी फक्त बसून बघत होते. जिला साडी घ्यायची होती, तिला कुठली साडी घ्यावी याविषयी संभ्रम होता. दुसऱ्या दोघी तिला प्रत्येक साडी अंगावर घेऊन दाखवत होत्या. शेवटी दुकानदाराने पण उभे राहून दोन तीन साड्यांचा पदर खांद्यावर घेऊन साड्या उघडुन दाखवल्या. असे दुकानदार पाहिले की मला गंमत वाटते. हे लोक साडी दाखवायला एखादी बाई का ठेवत ? दाढी मिशी वाल्या पुरुषाच्या अंगावर साडी पाहून ती आपल्याला छान दिसेल असा अंदाज मांडणे म्हणजे सुनील शेट्टीचा डान्स बघून हेमामालिनी असा dance मस्त करेल असा अंदाज लावण्यासाखं आहे.😄😎
असो, एकूण चारपैकी तिने एकतरी घ्यावी, असं मला मनोमन वाटलं. पण तिचा वैचारिक चेहरा अजिबात काही ठरवत नव्हता. दोघी मैत्रिणी चिकाटीने तिला साडी दाखवत होत्या.. अगं ही साडी तुला छान दिसेल. कोणतीतरी साडी बहुदा पटली असावी. ती काहीच न बोलता उठली ...तिने साडी अंगावर घेतली. आरश्यात पाहिलं. मला वाटलं आता ही साडी घेणार. दुकानदार पण पॅकिंगच्या तयारीत.. दुसऱ्या दोघींना पण हायस वाटलं. दोन क्षण स्वतःला पाहून ती म्हणाली, " नको ...ही साडी नको.. तुला काय वाटतं?". मला तिचा चेहरा पाहून वाटलं आज हिचा खरेदीचा योग नाही. तर आपण काहीही म्हणलो तरी काय फरक पडणार आहे. मी सांगितलं, " हा रंग तुला सुट होत नाही" तिला एक सेकंदात ते पटलं. आम्ही पुढच्या पाचव्या मिनिटाला कुठलीही साडी ने घेता दुकाना बाहेर होतो. तब्बल ४३ मिनिटं दुकानात गेली होती. बाकीच्या दोघींनी मनोमन ठरवलं असणार, पुढच्या वेळेस मला अजिबात साडी खरेदीला न्यायचं नाही. पण मैत्री प्रेम म्हणून काही बोलल्या नाहीत बिचाऱ्या. 🤗🤔
शेवटी, हातात बॅगा जड होऊ लागल्या, पोटात भुक लागली. ड्रायव्हर दादांना एक तास सांगितलं होत.पण ३ तास झाले होते. त्यांना फोन लावत होतो पण लागेना. मला वाटलं ,त्यांनी कंटाळून फोन बंद करून झोप काढली असणार...आम्हाला फिरून फिरून तहान लागली. तिथल्या एका हॉटेल सारख्या दिसणाऱ्या रंगीबेरंगी दुकानात आम्ही गेलो. तिथे बसायला मस्त जुन्या स्टाइलच्या टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या. त्याला म्हणलं, "पाणी दे बाबा" तो म्हणाला, " मॅडम खास mahableshwar ची वाइन मिळते इथे, अजूनही बरेच options आहेत. या आतमध्ये"
बापरे ...आम्ही एकमेकींकडे पाहिले. बाहेर येऊन नीट पाटी पाहिली तर एका वाइन शॉपमध्ये हॉटेल समजून घुसलो होतो.(देशी दारूचे दुकानात पदडे लावतात, मग वाइन च्या लावत नाहीत का?😑😑) तिथून पटकन उठलो आणि बाहेर येऊन जे हसायला लागलो. तितक्यात ड्रायव्हर दादाचा फोन आला. माझी मैत्रीण हुशार. आम्हाला पुढच्या दुकानाजवळ घेऊन गेली, आणि ड्रायव्हरला तिथे यायला सांगितलं. नाहीतर landmark- वाइन शॉप ऐकून त्याला काय वाटलं असतं देव जाणे..🫣🙊
शॉपिंग मोहीम फत्ते करून बंगल्यावर आलो. गरम गरम जेवण तयार होतं. रात्री मस्त गप्पांची मैफिल जमली. आयपॉड वर गाणी ऐकत एकमेकींशी बोलत किंवा नुसतं शांत बसून लोळत होतो. थंडी वाढू लागली, डोळ्यांवर ग्लानी आली आणि गाढ झोपलो.
सकाळी फ्रेश झालो. उत्साहात नवे कपडे घालून आवरलं. थोडे उड्या मारत व्हडिओ काढले. फोटो साठी तिथल्या मावशींना पकडलं. त्या बिचाऱ्या व्हिडिओ काढत होत्या आणि गालातल्या गालात हसत होत्या.😎🎥 शाळेतल्या मुली यांच्यापेक्षा बर्या असं त्यांना वाटलं असावं. पण आम्हाला काही फरक पडणार नव्हता. 😄😄
पुढे पॉइंट दर्शन.. एक ठिकाणी reels करायचे होते. गर्दी नव्हती. मग तिथेच डान्स करायचे ठरवले. डान्स च्या साध्या स्टेप्स एकीने ठरवल्या होत्या. त्यांना छान जमत होत्या. पण माझे पाय काही मॅच होत नव्हते. माझ्यात अतिउत्साह ..डायरेक्ट गणपती डान्स येतो आपल्याला. अधे मधे काही जमत नाही. पण अखेर, पायांना ओरडले, नीट नाचा बरं. पुढच्या वेळेला त्यांना जमलं..मस्त व्हिडिओ केला.
सगळ्यांनी मनसोक्त निसर्गाचा आनंद घेतला. फोटोसेशन केले. दुपारी जेवण करून परतीच्या वाटेला निघालो. माप्रोत खर्च नाही जायचं ठरवलं होतं म्हणून महाबळेश्र्वरच्या माप्रोत जास्त वेळ न घालवता वाईच्या माप्रोत गेलो..तिथे अगदी काही डझन सरबत बॉटल,😛 थोडसं strawberry with cream आणि सँडविच खाल्लं. उगाच आपलं .अगदी थोडं थोडं🤐🤑....पोट भरल्याने गाडीत बसून मस्त झोप काढली.💤😴
रविवार संपणार होता. दोन दिवस आनंदात गेले. ट्रीप संपणार होती. पण असंख्य आठवणी , गमतीचे प्रसंग , मनमोकळ्या गप्पा मनात साठवून आम्ही आपापल्या घरी आलो. कितीही म्हणा, मैत्रिणी बरोबर जी मजा येते तसा आनंद कुठल्याच ट्रीपमध्ये येत नाही. ❤️🧡💛💚
आणि घरच्यांना जरा सुटका मिळते की. 😄😈आपलं तेही कर्तव्य आहे..😎
बाकी तुम्हाला आमची गोष्ट कशी वाटली? खूप मोठी झालेय नेमकी 🫣🙈
@शीतल दरंदळे👯♀️👯
(Professional writer and Trainer)
8830153966

0 टिप्पण्या
No spam messages please