युद्धविरामासाठी 'पांढरे निशाण'च का पडकवले जाते? याचे मूळ आणि नेमका इतिहास काय आहे?
सध्या युद्ध हा शब्द जरी ऐकला तरी अंगावर काटा येतो. जगातील इतिहासात एकमेकांचा ताबा मिळविण्याची स्पर्धा, किंवा कुरघोडी करण्यासाठी युद्ध केली गेली. कोणत्याही युद्धात दोन्ही बाजूंची हानी होते. भारतीय इतिहासात अनेक भीषण युद्धांच्या कथा आहेत. त्यात शूरता दिसतेच, पण त्याचबरोबर होणारी हानी कधीही भरता येत नाही. पण काही ठिकाणी युद्ध रोखण्यासाठी तह होतात, प्रसंगी शरणागतीही पत्करली जाते. त्यासाठी पांढरे झेंडे दाखवले जातात. आज जाणून घेऊयात की शरणागती स्वीकारताना पांढरा रंगच का वापरतात आणि हे झेंडे दाखवण्याचा इतिहास काय आहे?
युद्धादरम्यान जेव्हा एक बाजूचे सैन्य पराभूत होते किंवा ते पराभूत होणार आहे याची खात्री होते तेव्हा त्या बाजूच्या सैन्याकडून पांढरा झेंडा दाखवून युद्धविराम आणि आत्मसमर्पण सूचित केले जाते. पांढरा ध्वज हा युद्धविराम आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे.
इतिहासकार म्हणतात की पांढरा ध्वज फडकवल्याचा पुरावा पहिल्या शतकात सापडतो. पश्चिमेकडे रोमन लेखक कॉर्नेलियस टॅसिटस यांनी इसवी सन ६९ मध्ये पांढरा ध्वज वापरल्याच्या नोंदी आहेत. क्रेमोनाच्या दुसर्या लढाईबद्दल लिहित असताना, टॅसिटसने नमूद केले की व्हिटेलियन्सने "व्हेस्पासियन्सला शरण जाताना पांढरा ध्वज फडकावला".
चीनमध्ये पूर्वेकडील हान राजघराण्यांतर्गत इसवी सन २५-२२० च्या सुमारास या प्रथेचा उगम झाला असे मानले जाते. तेव्हा ते चीनच्या हान राजवंशात वापरले जात असे. तर रोमन इतिहासकार टॅसिटसच्या मते, प्युनिक युद्धांदरम्यान रोमन सैनिकांनी भयानक विनाश टाळण्यासाठी पांढरी लोकर आणि ऑलिव्ह फांद्या वापरल्या.
इतर इतिहासकारांच्या मते, क्रेमोराच्या दुसऱ्या लढाईत शरणागती आणि युद्धविराम म्हणून पांढरा ध्वज वापरला गेला. तसेच युद्धादरम्यान पांढर्या ध्वजांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले असावे. या कारणासाठी पांढरा ध्वज बहुधा वापरला गेला होता. पांढरे कपडे त्या काळी सगळेजण वापरत असावेत हेही एक कारण असू शकते. तसेच युद्धातील नियमाप्रमाणे पांढऱ्या ध्वजांचा कोणीही गैरवापरही करू शकत नाही.विसाव्या शतकात जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या सभांमध्ये असे म्हटले होते की कोणतेही सैन्य खोटी शरणागती पत्करण्यासाठी आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी पांढर्या ध्वजाचा वापर करू शकत नाही.
असे बरेच ऐतिहासिक संदर्भ किंवा कथा पांढरा ध्वज वापरण्याच्या ऐकवल्या गेल्या आहेत. यातली खरी कोणती हे नक्की सांगणे कठीण आहे. पण पांढरा रंग शांततेचे प्रतिक मानण्यात येते. त्याचे कारण इतिहासातच दडलेले आहे. बऱ्याच लढाया यामुळे थांबल्या किंवा संपल्या होत्या.
तुम्हाला या संदर्भात शरणागती पत्करण्याने थांबलेले कुठले युद्ध आठवते का? असेल तर जरूर कॉमेंट करून सांगा.
शीतल दरंदळे

0 टिप्पण्या
No spam messages please