इंटरनॅशनल सोलार अलायन्स, भारत सरकार आणि जागतिक बँकेने मिळून नवा कोणता सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे? त्याचा फायदा कसा आणि कुणाला?
सध्याच्या काळात भारतात ऊर्जेचा तुटवडा भासत आहे. ७०% ऊर्जेची गरज भागवण्याचे काम कोळसाच करत आहे. सौर वीज प्रकल्प सूर्यास्तानंतर वीज निर्माण करत नाही. त्यामुळे वीज प्रकल्पातून मिळालेल्या विजेची मागणी इतकी जास्त आहे की पुरवठा अपुरा पडू लागला आहे. विजेची दिवसेंदिवस मागणी वाढतच राहणार आहे आणि कोळसा कमी पडणार म्हणून भविष्यात यातून मार्ग काढण्यासाठी भारताने युनायटेड किंगडमच्या सहयोगाने ग्रीन ग्रीड इनिशिएटिव्ह - वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड (GGI-OSOWOG) नावाच्या प्रकल्पाची स्थापना केली आहे. अमेरिकेचाही या प्रकल्पला पाठिंबा आहे आणि यातून भविष्यासाठी खूप मोठा ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्याची संकल्पना आहे. आपण समजून घेऊयात की हा प्रकल्प नक्की आहे काय?
मूळ कल्पना अशी आहे की सूर्यप्रकाश कधीही संपत नाही. म्हणजे हा प्रकाश जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात पोचत राहतो. त्यामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. इंटरनॅशनल सोलार अलायन्स (ISA) नुसार, OSOWOG एक ग्रीड बनवेल आणि त्याला काही प्रादेशिक सीमा नसतील.
हे ग्रिड जगभरातून एकत्रित केलेली सौरऊर्जा वेगवेगळ्या लोड सेंटर्सवर प्रसारित करेल. हे ग्रीड तीन टप्प्यात बांधले जातील. पहिल्या टप्प्यात भारतीय ग्रीड्स मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील ग्रिडशी जोडले जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते आफ्रिकन पॉवर पूलशी जोडले जातील. तिसर्या टप्प्यात, पॉवर ट्रान्समिशन ग्रीड जागतिक स्तरावर जोडले जाईल. या ग्रीडद्वारे जगभरातील देश आपापसात सौर आणि इतर अक्षय्य ऊर्जा शेअर करतील. सर्वाधिक मागणीच्या वेळी वीजेच्या गरजा पूर्ण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. OSOWOG द्वारे १४० देश या समान ग्रीडशी जोडले जातील.
सूर्याकडून केवळ एका तासात मिळणारी ऊर्जा जर आपण पूर्णपणे मिळवू शकलो, तर ती अखिल विश्वातील मानवजातीला वर्षभरासाठी पुरेल असे मानले जाते. त्या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर केला तर ऊर्जेचे संकट टळू शकेल, तसेच नैसर्गिक ऊर्जा वापरल्याने पर्यावरण रक्षणासाठी ही मदत होऊ शकेल.
Green-Grid प्रकल्पातील काही आव्हाने देखील आहेत. मुख्य आव्हान म्हणजे मोठ्या भौगोलिक प्रदेशावर एक स्थिर ग्रिड राखणे. विशेषतः ज्या प्रदेशात लोकसंख्या खूप जास्त तिथे विजेचा वापर ही जास्त असतो, त्यामुळे या अशा ठिकाणी ऊर्जेची मागणी अचानक वाढते. ही मागणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये कधी अत्युच्च पातळीवर जाते, तर कधी अचानक ढासळते. आणि कोणत्याही ग्रीडला कामकाज करण्यासाठी एका स्थिर भाराची किंवा कमीत कमी पातळीच्या ऊर्जा प्रवाहाची गरज असते. त्यामुळे अश्या वेळी वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात ग्रीड स्थिर ठेवणे आव्हानात्मक आहे.
तरीही अनेक तज्ञ यावर काम करत आहेत. या उपक्रमाचे नेतृत्व ISA, भारत सरकार आणि जागतिक बँक करत आहे. या तिघांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
हवामान बदलाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने हा प्रकल्प गेम चेंजर म्हटला जात आहे. भविष्यात कदाचित कोळसा पूर्णपणे संपून जाईल पण सौरऊर्जा कायम राहणार आहे. या विचारावर आधारित हा प्रकल्प यशस्वी होवो हीच सदिच्छा करूयात.
शीतल दरंदळे

0 टिप्पण्या
No spam messages please