Ad Code

Responsive Advertisement

तरंगत्या शाळा बांगलादेश

 पुराखाली गेलेल्या गावातल्या मुलांचा आधार बनलेल्या बांग्ला देशातल्या तरंगत्या शाळा!!


तरंगत्या मार्केटबद्दल ऐकलं असेल. पन तरंगती शाळा ही कल्पना कधी ऐकलीय का? बोटीतून शाळेत जाणारी मुले तुम्ही ऐकले असेल. पण चक्क शाळाच बोटीतून मुलांपर्यंत पोहोचते हे ऐकले नसेल ना? बांगलादेशात पाऊस आणि पुरामुळे स्थानिक गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण होते. त्यामुळे सरकारी शाळा एकतर बंद होतात किंवा त्यांच्याकडे जाणारे सर्व मार्ग पाण्याखाली जातात. यातून मार्ग काढण्यासाठीच फ्लोटिंग स्कूल ही संकल्पना राबवली जाते. आज याच विषयी आपण जाणून घेऊयात.


प्रत्येक पावसाळ्यात पश्चिम बांगलादेशातील काही जिल्हे पाण्याखाली जातात. तिथलेच नाटोर हे गाव. तिथे वाढत्या पाणीपातळीमुळे तसेच पुरामुळे दरवेळेस शाळेत जाणाऱ्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाऊस कमी झाला तर चिखल पण खूप मोठ्या प्रमाणात साचतो. त्यामुळे त्यातून चालत जाणे अशक्य होते. याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. हेच पाहून मोहम्मद रेझवान, शिधुलाई स्वनिर्वार संस्थेचे प्रमुख यांनी ही संकल्पना आणली. आधी त्यांच्या संकल्पनेला निधी देण्यास कोणी तयार नव्हते. पण २००५ मध्ये त्यांना $५००० चा ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रेनकडून पहिला निधी मिळाला. त्यांना लेव्ही स्ट्रॉस फाउंडेशनकडून एक मिलियन डॉलर्स आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आणखी एक मिलियन डॉलर्स मिळाले.


निधी मिळण्याआधी त्यांनी एक बोट बनवली आणि सध्या तिथे २२ पेक्षा अधिक तरंगत्या शाळा आहेत. या तरंगत्या शाळा ठराविक मार्गाने मुलांना उचलतात आणि दिवसभराच्या अभ्यासानंतर संध्याकाळी परत सोडतात. प्रत्येक बोटीला तीन शिफ्ट असून प्रत्येक शिफ्टमध्ये ३० विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना मोफत शिकवले जाते आणि त्यांना स्टेशनरी आणि अभ्यास साहित्यही दिले जाते. तरंगत्या शाळांमधील सर्व शिक्षक शेजारच्या गावातून आलेले आहेत. त्यांना या शाळेत अर्ज करण्यासाठी किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या शाळेत १ ली ते ४ थीचे वर्ग चालतात. पहिली ते चौथीपर्यंत शिकवले जाणारे सर्व विषय मुले येथे शिकतात. इथे लहान मॉडेल डेस्क, लायब्ररी आणि फळे आहेतच. शिवाय येथे मुलांना खेळायला घसरगुंडी, झोके, मंकी बार आणि सी-सॉ देखील आहेत. मुले ही शाळा कधीही चुकवत नाहीत. या शाळेत लहान मुले लॅपटॉप-कॉम्प्युटर वापरायलाही शिकतात. हे सर्व बोटींच्या वर असलेल्या सौर पॅनेलद्वारे चालवले जातात. विशेष म्हणजे एकदा शाळा संपली की रात्री इथे प्रौढ लोक शेतीसाठी तीव्र हवामानातली नवीन तंत्रे शिकण्यासाठी जहाजावर येतात. तसेच इथे वाचनालयात पेपर आणि पुस्तकेही वाचतात.


रेझ्वान यांना त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे हे मॉड्यूल आता भारत, पाकिस्तान आणि फिलीपिन्ससह सात देशांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून तयार केले जात आहे. यामुळे पुराखाली जाणाऱ्या मोठ्या प्रदेशांना याचा फायदा होईल. ढाका युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार तिथे दररोज सुमारे २,००० लोक ढाका येथे स्थलांतर करतात. यातले ७० टक्क्यांहून अधिक लोक हवामान बदलामुळे स्थलांतर करतात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून अश्या सुधारणा जर प्रत्येक बाधित ठिकाणी करता आल्या तर कदाचित त्यांना घर सोडावे लागणार नाही आणि त्यांच्या मुलांचे शिक्षणही थांबणार नाही


शीतल दरंदळे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या