Ad Code

Responsive Advertisement

ओदिशाचा लखोबा लोखंडे

 

 १० राज्यांतल्या २७ महिलांशी लग्न करुन फसवणारा ओदिशाचा लखोबा लोखंडे!! यात वकील, डॉक्टर्स आणि सरकारी अधिकाऱी स्त्रियाही आहेत!


वयाच्या ६६ व्या वर्षी हा पठ्ठ्या लग्न करतोय, तेही दुसऱ्या-तिसऱ्यांदा नाही, तर चक्क २७ व्यांदा!! आणि तेही प्रेमासाठी नाही, तर फक्त पैसे लुबाडण्यासाठी!! या आधुनिक लखोबा लोखंडेचा कारनामा वाचला तर अनेकांना चीड येईल. हा आहे ओडीसाचा रमेश कुमार स्वेन.. या पठ्ठ्याने गेल्या चार वर्षांत खोट्या बहाण्याने दहा वेगवेगळ्या राज्यातील २७ महिलांशी लग्न केले आणि महिलांना चांगलेच गंडवले. याला पोलिसांनी नुकतीच अटक तर केली आहे. पण या वयात याने केलेले कारनामे वाचून पोलिसही हैराण झाले आहेत.


रमेश कुमार स्वेन याचे १९८२ साली लग्न झाले होते. त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्याचे मुलगे चांगले डॉक्टर आहेत. पण घरातल्यांशी पटत नसल्याने तो वेगळा राहतो. रिकाम्या वेळेत एकट्या महिलांशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे हा त्याचा धंदा. हेच करत २००२ मध्ये त्याने झारखंडमधल्या एका डॉक्टरशी लग्न केले. तिलाही याने फसवले. ती घाबरून गप्प राहिली. या लग्नापासूनही स्वेनला दोन मुले आहेत. याचे शिक्षण फक्त इयत्ता दहावी, पण बायकांना तो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा उपमहासंचालक डॉक्टर आहे म्हणून सांगत असे. लाल दिव्याच्या गाडीसोबत काढलेले फोटो पाठवत असे. त्यासाठी खोटी कागदपत्रेही सादर करत असे. त्यामुळे त्याच्यावर सहज विश्वास बसे. तसेच हा त्याच बायकांना हेरत असे ज्या एकट्या आहेत, साधारण वयाची ४० शी पार केलेली, घटस्फोटीत किंवा घरातल्यांपासून दूर राहणाऱ्या आहेत.


विशेष म्हणजे या सर्व स्त्रिया उच्चशिक्षित होत्या. त्यात काही डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि सरकारी अधिकारी देखील आहेत. या सगळ्यांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. दोन-तीन महिन्यांत त्याने सहा स्त्रियांशी लग्न केले. काही स्त्रियांना फसवणूक झाल्याचे कळूनदेखील लाजेखातर त्या गप्प बसल्या आणि त्यामुळेच याचे फावले.


भुवनेश्वर पोलिसांना त्याच्या सर्व पीडितांपर्यंत पोहोचण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागली. पोलिसांनी स्वेनने फसवलेल्या ९० महिलांशी संपर्क साधला आहे. मे २०२१मध्ये, भुवनेश्वर आणि कटकच्या आयुक्तालय पोलिसांकडे ४८ वर्षीय नवी दिल्लीतल्या शाळेतील शिक्षिकेचा कॉल आला. तिने तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली की तिच्या पतीने इतर महिलांसोबत अनेक विवाह केले होते आणि तिची फसवणूक केली होती. तिचे १३ लाख रुपयेही घेऊन तो पळला होता. रमेश तेव्हापासून पोलीसांच्या रडारवर होता. पोलिसांकडे स्वेनचा फोन नंबर आणि अनेक निवासी पत्ते होते. तपास पथकाने त्याचा फोन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो गुवाहाटी येथे राहत होता आणि अधूनमधून पारादीपला भेट देत होता.

पोलिसांनी लक्ष ठेवले. पण तो एका ठिकाणी तो कधी थांबला नाही. नव्या ठिकाणी त्याची आणखी एक बायको सापडायची. १४ फेब्रुवारीला तो भुवनेश्‍वरला येणार ही खात्रीची माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर शनी मंदिरात जात असताना पोलिसांनी त्याला पकडले.


पोलिसांनी त्याला बोलते केले, त्याचे फोन तपासले तेव्हा त्याची matrimony साईट वरची माहिती दिसली. २०१८ नंतर त्याने पंचवीस विवाह केले होते. वेगवेगळ्या राज्यात तो फिरत असे. उच्चस्तरीय गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये त्याने तीन सदनिका भाड्याने घेतल्या होत्या. त्याने विवाह केलेल्या बहुतेक महिलांना तो या अपार्टमेंटमध्ये आणत होता. तिथल्या मोलकरीणीचीही पोलिसांनी चौकशी केली. त्याने ओडिशात लग्न केलेल्या पाच महिलांपैकी तीन शिक्षिका होत्या. त्यातली एक विधवा होती आणि तिला मोठी मुलगी होती. तिने तपासाचा भाग होण्यास नकार दिला. एकीने सांगितले की, “ भुवनेश्वरला असताना मला त्याच्या एका मोलकरणीकडून समजले की त्याला आधीच दोन बायका आहेत. मी त्याला विचारल्यावर तो मला टाळू लागला. पण मी एकटीच राहत असल्याने मी त्याची पार्श्वभूमी तपासली नाही”


एका ठराविक वयानंतर एकट्या स्त्रियांच्या भावनिक गरजा असतात, तेव्हा कोणी बरोबर समजून घ्यावे असे वाटते. त्यांना एकटेपणा हा सामाजिक जीवनात एक कलंक असल्याचे वाटते. आणि याच वेळी रमेशसारखे पुरुष येऊन त्यांचा गैरफायदा घेतात. पण जेव्हा फसवणूक होते तेव्हा या लाजेखातर पुढे येत नाही आणि त्यामुळे अजून स्त्रिया फसतात.


रमेशने यापूर्वीही केरळमधील १३ बँकांना १२८ बनावट क्रेडिट कार्ड वापरून १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच त्याने हैदराबादमधील लोकांना त्यांच्या मुलांना जागा देण्याचे आश्वासन देऊन २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप देखील आहे.


शीतल दरंदळे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या