Ad Code

Responsive Advertisement

व्ही वैद्यनाथन

 जगात पैशापेक्षा जास्त कशालाही महत्व नाही असे मानणारे कितीतरी जण आहेत. त्यात गडगंज श्रीमंत असले तरी सगळ्यांना अजून पैसे कमवायचे असतातच. पण आज आम्ही अश्या माणसाची कहाणी सांगणार आहोत ज्याने श्रीमंत असूनही अनेकांची मदत केली आहे. IDFC FIRST बँकेचे MD आणि CEO व्ही वैद्यनाथन हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सगळीकडे त्यांचे खूप कौतुक होत आहे . कारण त्यांनी तब्बल ३.९५ कोटी रुपये किमतीचे ९ लाख शेअर्स आपल्या घर कामगारांना भेट म्हणून दिले आहेत. 


 हे कर्मचारी म्हणजे वैद्यनाथन यांचे ट्रेनर रमेश बाबू यांना ३ लाख शेअर्स, हाऊस हेल्पर प्रांजल नार्वेकर आणि ड्रायव्हर एसी यांना २-२ लाख शेअर्स. मुनापर आणि कार्यालयातील सहाय्यक कर्मचारी दीपक पाथरे आणि हाऊस हेल्पर संतोष जोगळे यांना प्रत्येकी १ लाख शेअर्स दिले आहेत. वैद्यनाथन यांनी ही शेयरची रक्कम या लोकांना घर खरेदी करण्यासाठी दिली आहे. या सर्व जणांना मोठ्या शहरात स्वतःचे घर घेणे शक्य नाही म्हणून वैद्यनाथन यांनी हा निर्णय घेतला. आणि हे काम त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केले नसून अशी मदत करण्यामागे त्यांचा संघर्ष दडलेला आहे. 



वैद्यनाथन आज एका बँकेचे एमडी आणि सीईओ आहेत, पण सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी अनेक अडचणीचा सामना केला आहे. वैद्यनाथन हे चेन्नईतील एका सामान्य कुटुंबातील आहेत. सरकारी शाळांमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रांचीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. वैद्यनाथन यांना नंतर रांचीला जावे लागणार होते, परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे रेल्वेचे भाडेही नव्हते. आपल्या शाळेतील एका शिक्षकाकडून ५०० रुपये घेऊन ते रांचीला येऊ शकले. त्या शिक्षकांनी जी मदत केली त्याचीही परतफेड वैद्यनाथन यांनी केली. ते शिक्षक कुठे आहेत याची माहिती त्यांना नव्हती, पण त्यांनी ते शोधून काढले आणि धन्यवाद म्हणून त्यांना एक लाख शेअर्स भेट दिले. वैद्यनाथन यांनी अनेकवेळा गरजूंना मदत केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या कामगारांना ४,३०,००० शेअर्स भेट दिले होते.तर रुक्मणी सोशल वेलफेअर ट्रस्टला २ लाख शेअर्स सामाजिक उपक्रमांसाठी दान केले होते.


व्ही वैद्यनाथन यांच्याकडे ३१ डिसेंबर २१ पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आकडेवारीनुसार IDFC फर्स्ट बँकेचे २.४४ कोटी शेअर्स आहेत. जे बँकेच्या एकूण इक्विटी शेअरहोल्डिंगच्या ०.३९ टक्के आहे. तर मार्च २०१९ मध्ये त्यांच्याकडे बँकेचे ५.६८ कोटी शेअर्स होते. आता जे ३.९५ कोटी किमतीचे शेयर ते भेट देऊ इच्छितात त्याची किंमत इतकी आहे कारण सोमवारी बीएसईवर बँकेचा शेअर ४३.९० रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे ९ लाख शेअर्सची किंमत सुमारे ३.९५ कोटी रुपये काढण्यात आली.


वैद्यनाथन हे एक बुद्धिमान आणि दानशूर आहेतच, पण ते एक चांगले खेळाडू आणि कलाकार देखील आहेत. वैद्यनाथन यांनी आतापर्यंत ८ पूर्ण मॅरेथॉन आणि २२ हाफ मॅरेथॉन धावल्या आहेत. तसेच त्यांना गाण्याचीही आवड आहे. ते गाताना गिटारही चांगली वाजवतात. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गायकीतूनही गरजूंसाठी निधीही उभारला आहे.


व्ही वैद्यनाथन यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या वागणुकीने एक आदर्श उदाहरणच सर्वांसमोर ठेवले आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही.


शीतल दरंदळे


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या