Ad Code

Responsive Advertisement

कथा-जन्म_मृत्यु

 कथा-जन्म_मृत्यु

********

"आईss ....बाबा देवाच्या घरून आला की मी त्याला एक नवीन विमान मागणार आहे" चिनुच्या या बोलण्याने आजीच्या ह्रदयात चर्र झालं. घरात अगदी शांतता पसरली. तसाही घरातला माणसांचा आवाज जवळजवळ बंदच झाला होता. घरात आवाज फक्त लहानग्या चीनुचा आणि बाकी सर्व निर्जीव वस्तूंचा.. भांड्यांच्या, सोडलेल्या नळाचा , दरवाज्याचा, चालताना पावलांचा...कोणीच बोलत नव्हतं..चीनुचे म्हणजे चिन्मयचे बाबा दुसऱ्या लाटेत गेले. आणि होत्याचं नव्हतं झालं.. 


रोहित, रमा आणि चिन्मय त्रिकोणी गोड मध्यमवर्गीय कुटुंब. रोहित बँकेत होता तर रमा चिन्मयच्या जन्मानंतर गृहिणी झाली. रोहितची आई आशा याही त्यांच्यासोबत राहत होत्या. रोहित अवघ्या ३४ वयाचा..एकुलता एक कमावता..असा अचानक निघून गेल्याने घरावर शोककळा पसरली होती. नव्या घरात २ महिन्यापूर्वीच शिफ्ट झाले होते. चिन्मयला नव्या शाळेसाठी प्रवेशाची गडबड चालू होती. आणि अचानक रोहितला ताप आला आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली, चार पाच दिवसांत त्रास वाढू लागला. हॉस्पिटलला कशीबशी जागा मिळाली. पुढचे ८ दिवस तो झुंजला. सगळे प्रयत्न केले पण ९व्या दिवशी रोहितने शेवटचा श्वास घेतला.. रमाला असा काही धक्का बसला की ती जणू दगड झाली. श्वास रोहितने सोडला पण गुदमरली रमा. एक अश्रू तिने गाळला नाही.. मन घट्ट करायचे होते पण तिने स्वतःच्या भावना थांबवल्या. ना हसायची, ना रडायची, ना काही बोलायची रमाचा तो जिवंतपणा संपला. आज २ महिने होऊन गेले या घटनेला , पण काही बदल नाही. चिनूशी पण ती तेवढ्यापुरती बोलायची..चिनू मग आजीकडे म्हणजे आशाताईकडे जायचा. आईची तक्रार करायचा. आशाताई त्याला समजवायच्या, जवळ घ्यायच्या, कधी कधी त्यांनाही रडू यायचं. त्या स्वतःला कोसायच्या, " माझ्या लेकाला नेण्याऐवजी मला का नाही नेलं देवाने?" रमाशी खूप बोलायचा प्रयत्न करायच्या..पण रमामध्ये काही बदल नाही. शेवटी त्याही थकल्या आणि शांत झाल्या.

आजी चीनुला खेळत बसवायच्या..रमा आपल्या खोलीत बसायची. गप्प बसून काम करायची. खोलीत आली की रोहितचं जॅकेट घेऊन बसायची. रोहितला तिने वाढदिवसाला भेट म्हणून दिलं होतं. त्यालाही खूप आवडायचं ते घालायला. खूप हँडसम दिसायचा तो. रमा त्याला म्हणायची, "अजूनही कॉलेजला गेलास तर मुली वळून बघतील तुझ्याकडे" रोहित खूप हसायचा आणि म्हणायचा, "रमा तू आहेस ना , आता मला कोणी नको..तू माझं सर्वस्व आहेस"..खूप प्रेमात असायची जोडी..एकमेकांना अगदी पूरक..चिन्मयच्या जन्मावेळी रमाचा त्रास पाहून रोहित म्हणायचा, " देवाने बाळाचा त्रास अर्धा अर्धा वाटून द्यायला हवा होता, तुला एकटीला किती त्रास होतोय आणि मी काहीच करू शकत नाही" रमाला वाटायचं इतका भावनाशील नवरा कोणाला मिळतो? खरंच मी किती भाग्यवान!

पण या भाग्यानेच दगा दिल्यासारखं झालं होतं. जन्मोजन्मीचा जोडीदार असा अर्ध्यावर सोडून गेला होता. रमा कोमेजून गेली होती. त्याच्या आठवणीत ती सतत असायची. रोज तो आहे असे समजून चालायची. त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायची, त्याची वाट पाहायची, तो आला नाही की ताट झाकून बसून रहायची..स्वतः ही कधीकधी खायची नाही. आशाताईंना रमाचा तो त्रास बघवत नसे. हिने परिस्थिती स्वीकारून पुढे जावं असं वाटे. चिनूसाठी तरी उभं रहावं. थोड्या दिवसांत परिस्थिती सुधारेल असे वाटलं पण हळूहळू दिवस सरत होते आणि रमा अजूनही भूतकाळात, कोणाशी बोलणे नाही आणि ऐकणेही नाही.. 

त्यादिवशी सकाळीच अचानक रमाची मावशी घरी आली. चिनुला ताप आला होता तो आजीच्या मांडीवर झोपला होता. रमाने दार उघडले, मावशी आत आली आणि रमाकडे पाहून तिला एकदम रडू आलं. रमा तिच्याकडे तटस्थपणे पाहत होती. मावशीला पाणी देऊन ती आतल्या खोलीत निघून गेली. मावशीला कसतरी झालं. ती आशाताईंना म्हणाली,

" आशाताई, रमा अजूनही धक्क्यातून सावरली नाही का हो? माझा फोनही उचलत नाही..शेवटी तिला भेटायला आले..काय अवस्था करून घेतली आहे पोरीने?"

आशाताईंना एकदम भरून आलं, "काय सांगू अहो? आज चिनू ला ताप आलाय, पण रमा औषध पाणी करून गेली, त्याला जवळही नाही घेतलं. नाहीतर रमाची काय धांदल उडायची? चिनूला शिंक जरी आली तरी ती किती काळजी घ्यायची...आता नीट खात नाही, पीत नाही..सुकून गेलीय..मीही मुलगा गमावला आहे.. कसं व्हायचं हो असं ? मलाही तिची खूप काळजी वाटतेय , माझ्याशी धड बोलतही नाही..तुम्ही बोलून बघा एकदा"

"आशाताई, काळजी करू नका..मी बघते..तिची आई गेली तेव्हा मीच होते तिच्याबरोबर..अशीच आहे ती" मावशीनं चिनुच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि त्याची पापी घेतली. रात्रीची जेवण आटपून चिनू आणि आशाताई झोपायला त्यांच्या खोलीत गेल्या. रमा आवराआवरी करून झोपायला जाणार इतक्यात मावशीने तिला हाक मारली.

"रमा ..बस इकडे..मावशीशी एक शब्दही बोलणार नाहीस का ग?"

 रमा फक्त खाली मान घालून बसली. मावशीने तिच्या डोक्यावरून, पाठीवरून मायेने हात फिरवला. रमाला कल्पना आली असावी, तिला टाळायचे होते म्हणून ती उठली आणि मावशीसाठी अंथरूण पांघरूण टाकू लागली. मावशीने तिला हात धरून बसवलं आणि म्हणाली, " घराचा हफ्ता भरला का ग? " एकदम अनपेक्षित प्रश्नाने रमा गोंधळून गेली. 

"चिनूच्या शाळेचं काय झालं? त्याचे कुठल्या शाळेत नाव घालणार आहेस? सासूबाईंना डोळ्याने कमी दिसतंय का, चालताना अडखळत होत्या मगाशी, बँकेत FD पाहिल्यास का?" मावशीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.. रमाला काहीच कळेना..मावशीचे प्रश्न संपत नव्हते..शेवटी रमा ओरडुन म्हणाली, " मावशी बास, तू काय विचारतेस हे? रोहित बघतो हे सगळं"

"पण आता रोहित गेल्यावर? रोहित जगात नाहीये रमा, तो नाहीये"

रमाने कानावर हात ठेवले. मावशीने तिला उठवले. "रमा , खूप चूक झालंय हे, असं घडायला नको होतं.. पण आता स्वतःला हळूहळू सावर" रमा मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली, तिचे शरीर थरथरत होतं. मावशीने तिला जवळ ओढलं. रमा मागे सरत होती, पण मावशीने तिला कुशीत घेतलं.

"मावशी मी सहन नाही करू शकत हे, तू असं बोलू नकोस ग" रमा कातर आवाजात बोलली.

" रमा बाळा, मलाही आवडत नाहीये तुझ्याशी असं बोलायला. पण आता वेळ आली आहे, पुढे व्हायची. जगणं कोणाला चुकलय का? जाणारा जातो पण मागे राहणाऱ्याला सर्व सोसत उभं रहावं लागतं. खंबीरपणे..इतकं सोपं नसतं ते मलाही माहितेय...पण पोरी आयुष्याची दोरी ज्याची त्याची वेगळी असते..तुझी आई गेल्यावर तू ९ वर्षांची होतीस, तेव्हा अशीच माझ्याजवळ आली होतीस..त्यावेळी तुझे अण्णाही एकटे होते ना? पण तिसऱ्या दिवशी कामाला गेले.. त्यांचं दुःख त्यांनी काळजात कायमचं दाबून टाकलं.. पुरुष माणूस म्हणून त्यांना काय काळीज नसतं का? पण तुझ्यासाठी उभे राहिले. तुला एवढं शिक्षण दिलं. लग्न लावून दिलं..सगळी कर्तव्य पार पाडली..त्यांना त्रास नसेल का झाला बायको जाण्याचा? ते आज असायला हवे होते.." 

रमाचे डोळे भरून आले. तिला आठवलं.. तीन वर्षांपर्वी अण्णा गेले. अण्णा आई बाप दोन्ही होते तिच्यासाठी.. किती जीव होता त्यांचा रमावर..तिच्या मैत्रिणीही म्हणायच्या तुझ्या अण्णा सारखी माया आमचे कोणाचेच वडिल करत नसतील रमे, भाग्यवान तू!

"मावशी मी कशी भाग्यवान ग? आई नाही, अण्णा नाही आणि आता रोहित???" रमाला पुढे बोलवेना..तिने इतके दिवस दाबून ठेवलेले अश्रू आजबबांध तोडून बाहेर पडले होते. तिने डोक्याला हात लावला. तिचा रडण्याचा आवाजाने आशा ताईही उठल्या आणि बाहेर आल्या. मावशीने रमाला खूप वेळ रडू दिले.

"रमा , आई नाही असं कसं म्हणतेस ग ? या तुझ्या सासुबाई बघ..इतके महिने स्वतःचा मुलगा गमावूनही तुझ्या काळजीत आहेत. चिनुकडे त्याच लक्ष देत आहेत. त्यांचे अश्रू कोण पुसणार?.. चिनुला ताप आहे तर झोपल्या नाहीत त्या अजून" रमाने सासू बाईंकडे पाहिले,ती आई म्हणत धावत त्यांच्या मिठीत गेली. आशाताईंचे आणि रमेचे अश्रू जणू एक होऊन वाहत होते. थोड्यावेळात दोघी शांत झाल्या. रमा धावत आतल्या खोलीत गेली चिनूला अलगद जवळ घेऊन त्याचे मुके घेऊ लागली..चिनू शांत झोपला होता..त्याचा ताप बराचसा उतरला होता..

रमा बाहेर येऊन मावशी आणि सासू बाईना म्हणाली, " आई एक क्षण वाटलं सर्व संपवावं.. रोहितशिवाय आयुष्याची कधी कल्पनाही केली नाही..असे अर्धावट आयुष्य असण्यापेक्षा नसलेलं काय वाईट? पण आज वाटतं य खूप स्वार्थी विचार केला का मी? रोहित आणि माझ्या प्रेमाचा अंश चिन्मय कधीपासून माझी वाट पाहत होता.. त्याला किती प्रश्न पडत असतील..आई तुम्हीही खूप भोगलत.. पण यापुढे नाही.. रोहित आणि माझी स्वप्नं आता मी पुढे नेणार.. चिनूला शिकवून मोठं करायचं..याहूनही मोठं घर घ्यायचं. पूर्ण देश फिरायचा, खूप पुस्तकं वाचायची.. रोहित नेहमी म्हणायचा, आजचा प्रत्येक दिवस जगायला हवा... रोहित आता माझ्यासोबत नाही पण त्याच्यासोबत जगलेला प्रत्येक आनंदाचा क्षण मला बळ देईन.. पुढच्या जन्मात आम्ही कदाचित परत भेटू..जगात भाग्यवान म्हणून कोणीच जन्मायला येत नसतं, पण हा जन्म कसा भाग्याचा करायचा हे आपण ठरवू शकतो. " रमा उठून उभी राहिली. तिने रोहितच्या फोटोला नमस्कार करून दिवा लावला. तिचा निर्धार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.. मावशी आणि सासुबाई जणू नव्याने जन्मलेल्या रमेला पाहत होत्या. 


©️शीतल अजय दरंदळे


(कथा आवडल्यास नक्की शेयर करावी🙏)


Marathi Katha, मराठी कथा


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

No spam messages please