#लाईफपार्टनर भाग 11(अंतिम)
**************************
सुभाषला सकाळी जाग येते ती पक्षांच्या किलबिलाटानेच. खिडकीतून उन्हाचं कवडस फरशीशी खेळत असतं. तो चूळ भरून अंगणात येतो. आईची सकाळची नाष्टयाची घावणाची तयारी सुरू असते. .सगळीकडे त्याचा सुगन्ध पसरला असतो. बाबा पेपर वाचत झोपाळ्यावर बसले असतात. सुभाषची नजर निमाला शोधत असते.
तेवढ्यात रोहनचा आवाज येतो "मम्मा....."
सुभाष धावतच रोहनच्या आवाजाच्या दिशेने जातो. त्याला अंगणाच्या मागच्या बाजूला असलेल्या खांबाच्या जवळ निमा उभी दिसते पाठमोरी. नुकतीच न्हाऊन आलेली,साडी नेसलेली,पदर कंबरेला खोचून ओले केस झटकत उभी असते.
रोहन तिला मागून घट्ट मिठी मारतो "मम्मा तू आलीस?"
निमा त्याच्याकडे बघून म्हणते "रोहन अरे मी मावशी आहे,आज तुझ्या मम्माची साडी नेसलीय ना!"
"मग तूच होना माझी मम्मा!! मला तू पण खूप आवडते मम्मासारखी "निमाला हसू येतं,ती त्याचा मुका घेते. रोहन तिथून पळून जातो.
सुभाष हे बघत खांबाच्या मागे येतो.निमा तिथेच जवळ टॉवेलने खांद्याच्या एका बाजूने पुढे केलेले ओले केस झटकत उभी असते. सुभाष तिथलं एक गुलाबाचं फुल तोडून तिच्या ओल्या झालेल्या मानेवर फिरवतो,मानेवरून पाठीवर कबरेपर्यत तो फुल हळुवार फिरवतो,निमा शहारते..
ती दबक्या आवाजात म्हणते "सुभाष काय करताय? कोणी बघेल ना. इथून जा"
सुभाष(अगदी हळू आवाजात) -" साडीत किती सुंदर दिसत आहेस तू, या गुलाबाच्या फुलाला ही दूर राहवत नाहीये...पहाटे दवबिंदू जसे पानावर ओघळतात, तसे पाणी तुझ्या केसांतून मानेवर ओघळलय. आणि मी काहीच करत नाहीये,मी फक्त पाहतोय...""
निमा लाजून चुर होते. झटकलेले केस परत मागे बांधते,पदर सावरते आणि सुभाषचे फुल हातात ओढून घेते.
सुभाष - ए माझं फुल का घेतलंस? मला वास घ्यायचाय.
निमा- असुदे! तुम्ही जा बरं आवरून घ्या.
सुभाष - जातो पण आधी सांग,तू काल रात्री माझं बोलणं का नाही ऐकलस?मला बोलायच तुझ्याशी"
निमा - "मला आई हाक मारतायेत बहुतेक,मी जाते" निमा पटकन निघून जाते. पाठशिवीचा खेळ रंगत राहतो.
सकाळचा नाश्ता,मग स्वयंपाकाची तयारी,मग जेवण निमा कामातच असते. सुभाष दुपारी हॉस्पिटलमध्ये फोन आणि ई-मेल पाहण्यात ,कामात बुडून जातो.
दुपार नंतरचा चहा निमा सुभाषला द्यायला येते. सुभाष कप घेतो आणि तिचा जाताना रस्ता आडवतो,ती मागे सरकते, सरकत सरकत भिंतीला पाठ टेकते.सुभाष अगदी तिच्या जवळ येऊन हातांचं रिंगण तिच्याभोवती घालतो.
"बरी सापडलीस,आता जायचं नाही ,माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे"
"अहो! हे काय चाललंय?काय सांगायचंय? बोला पटकन,अजून सगळ्यांना चहा द्यायचाय"
"असं पटकन पटकन काय करतेस?,बरं ऐक" सुभाष दिर्घश्वास घेतो..
इतक्यात रोहन आवाज देतो सुभाषला, दोनदा तीनदा हाका मारतो. सुभाष ओरडून त्याच्या हाकेला "आलो" म्हणतो.
सुभाषचा त्रासिक चेहरा पाहून निमा हसू लागते. सुभाष तिला म्हणतो " मी आज सांगणारच आहे,तू तयार रहा,आता अशी आयडिया लढवतो की तुला "नाही" म्हणताच येणार नाही. सुभाष रोहन कडे निघून जातो.
संध्याकाळ होत आली असते,सगळे अंगणात बसलेले असतात.
सुभाष बाबांना म्हणतो "बाबा निमाला समुद्र पाहायचा म्हणत होती,तिला जरा फिरवून आणू का?"
आई - अरे जा की,पहिल्यांदा पोर आलीये..समुद्रकिनाऱ्यावर नेल्याशिवाय कोकण कसं पूर्ण होईल? जा घेऊन.
सुभाष निमाकडे बघून सूचक हसतो. निमा पाठशीवीच्या खेळात हार मान्य करते आणि तयार होते. साधीशी क्लिप लावून ती केस मोकळे सोडते. पर्स मध्ये होता तेवढा हलकासा मेकअप करते. इकडे येताना घाईच असल्याने काही जास्त करता येत नाही. फ्रेश होऊन ती निघते.सुभाष वाट पाहतच असतो. निमाच्या मनात प्रचंड हुरहूर असते. ती प्रेमाच्या वाटेवर सुभाषसोबत निघते.
दोघे गाडीतून समुद्रकिनारी येतात. तिथून चालतच किनाऱ्यावर येतात. निमा समुद्राचं अथांग रूप पाहून जणू संमोहित होते. निळ्या रंगाच्या छटा दूरवर पसरल्या असतात. थंड हवेवर दूरवर डोलणारी नारळाची झाडं,नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली मऊमऊ पांढरीशुभ्र वाळू,पाण्यातून उड्या मारून येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसाळलेल्या लाटा.
निमा धावतच चपला फेकून देते आणि पाण्यात पाय टाकते. पायाला खालून मऊमऊ वाळू गुदगुल्या करत असते. ती पायाने हलकेच सुभाषवर पाणी उडवते. सुभाषही पाण्यात शिरतो. दोघांच्या पायांवर थंडगार सुमुद्राच्या लाटा येऊन भिजवून जात असतात. लाटा जशा पुढे जातात यांच्या पावलांचे ठसे वाळूत घट्ट होत जातात. निमा सुभाषचा हात घट्ट धरून उभी असते.
किनाऱ्यावर फारशी कोणाची गर्दी नसतेच. बराच वेळ लाटांशी खेळल्यावर ती सुभाष जवळ येऊन बसते. एका खडकावर सुभाष बसलेला असतो. सूर्यास्त व्हायला अवकाश असतो. क्षितिजापर्यंत सूर्याची लालसर छटा रंगवल्याप्रमाणे पसरली असते. आणि समोर बुडायला तयार असणारा सूर्याचा नारंगी लालसर गोळा.
सुभाष- कसं वाटतंय निमा?
निमा - ही माझ्या जीवनातली सर्वात सुंदर संध्याकाळ आहे. माझ्याकडे शब्द नाहीत सांगायला. अस वाटतंय इथून कुठेच जाऊ नये.
सुभाष- नकोच जाऊयात मग .एक विचारू?
निमा- बोला ना
सुभाष(निमाचे हात हातात घेऊन,तिच्या नजरेला नजर)- माझी लाईफपार्टनर होशील? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारच करू शकत नाही. I love you so much ..
तिच्या दोन्ही हाताचं तो चुंबन घेतो.
निमा हात सोडवून घेऊन,दोन्ही ओंजळीने आपला चेहरा झाकून घेते.
सुभाष- बोल ना! मला ऐकायचं आहे.
निमा हात बाजूला करते..तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले असतात.
निमा- सुभाष तुम्हाला मी त्या रात्रीच माझ्या प्रेमाबद्दल सांगितले आहे..माझेही फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. मी मनातून केव्हाच तुम्हाला लाईफपार्टनर म्हणून वरलं आहे.
सुभाष तिला आवेगाने मिठीत घेतो. दोघे एकमेकांच्या मिठीत जणू विरघळून जातात. सूर्यास्त व्हायला लागतो.निमा सुभाषच्या हातात हात घालून आणि डोके खांदयावर ठेवून सूर्यास्त पाहते.
सुभाष- त्या रात्री मी तुला नकार दिला ते खूप चुकीचे वागलो गं ,तुला खूप दुखावलं ना मी?
निमा- खोटं नाही सांगत, मला खूप त्रास झाला त्या रात्री. पण नंतर विचार केला आणि वाटलं नातं लादलं जाणं पाप आहे. प्रेम हे दोघांच्यात आपोआप उमलावं लागतं. तेव्हा तो सहवास सुखाचा असतो. एकमेकांच्या सोबतीनं वाढणं ,जबरदस्ती न करता. वेळ द्यावाच लागतो. प्रेम ही काही डिश नाही ,की हे टाका,ते टाका की तयार. मन जुळावी लागतात,जुळवून घ्यावी लागतात तेव्हाच खरं मनोमिलन होतं. कधी कधी नकारही येतो पण तो पचवावा लागतो. ज्याच्यावर प्रेम केलंय त्याचाच राग केला तर कसलं प्रेम? मी ठरवलं होतं..तुम्हाला जाणवलं तर ठीक आहे नाहीतर मी माझ्या आयुष्याचा मार्ग आखणार. म्हणूनच नवीन घर बघत होते.
सुभाष- तुझ्या जाण्याचाच मला खूप त्रास व्हायला लागला. पण आता नाही जाणार ना?
निमा- नाही! पण आईबाबांना सांगायला हवे ना, त्यांची परवानगी घ्यायला हवी.
सुभाष हसतो, "अग ते तर एका पायावर तयार होतील. तुझं खूप कोतुक वाटत त्यांना"
सुभाष तिला अजून जवळ ओढतो,तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात निमा स्वतःला सोडवून म्हणते "इथे नको,बराच अंधार व्हायला लागलाय,घरी वाट पाहत असतील.
दोघे उठतात आणि निघतात.
घरी पोचल्यावर सुभाष ही बातमी आईबाबांना सांगतो. सगळीकडे आनंदीआनंद होतो. आई म्हणते एवढी गोड मुलगी तर तुला शोधूनही सापडणार नाही. दोघेही आई बाबांच्या पाया पडतात. रोहन तर उड्या मारायला लागतो.निमा कायम त्यांच्यासोबत राहणार म्हणून. सुभाषची आई सांगते, उद्या सकाळीच आपण गणपती मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ आणि गुरुजींशी बोलून पुढचही ठरवूयात.
सुभाष निमाची नजरानजर होते. कुटंब आता सर्वार्थाने पूर्ण झालं होतं.
अँड दे लिव्ह हॅपीली फॉरेव्हर...☺♥❤♥😍
*********समाप्त*******
(वाचकहो, कशी वाटली कथा??? नक्की कंमेंट मध्ये लिहा..कथेच्या पहिल्या भागापासून तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलेत.मनापासून धन्यवाद😊🙏❤)
© शीतल अजय दरंदळे


0 टिप्पण्या
No spam messages please