#लाईफपार्टनर भाग 8
*******************************************
राजा तिसरी खुर्ची ओढून त्या दोघांसोबत बसतो. निमा आणि राजाच्या गप्पा सुरू होतात. राजासाठी ही ऑर्डर केली जाते,त्याची कॉफी ही येते. सुभाषच बोलणं अर्धवट राहिल्यामुळे त्याची जरा चिडचिडच होते. तो कधी निघून जाईल याची वाट सुभाष बघत बसतो.
त्यांच्या बऱ्याच वेळा गप्पा होतात. सुभाष सारखा घडाळ्याकडे बघत असतो. निमा सुभाषच्या चेहऱ्याकडे बघते आणि विचारते "उशीर होतोय का , हॉस्पिटलला जायचय का?"
सुभाष - हो निघुयात का जरा,वेळ होतोय.
निमा - राजा आपण बोलू नंतर निघते आता.
राजा - अरे थांब ना यार,आज इतक्या दिवसानी लकिली भेटलोय! तुझा फोन नंबर ही नव्हता माझ्याकडे..तू इकडे शहरात आलीस आणि सगळेच कॉन्टॅक्ट तुटले. अख्खा ग्रुपचा नंबर आहे माझ्याकडे तुझा सोडून.
निमा- हो अर्रे,जरा अचानक निघाले होते तेव्हा मी. घे माझा नंबर आता.96487××××× .
राजा नंबर सेव्ह करून घेतो आणि स्वतःचा नंबर ही देतो.
निमा - चल निघते मी,आहेस ना तू आता काही दिवस इथे,भेटूच की परत.
राजा(राजा बारीक चेहरा करून)- खरंच निघतेस मला सोडून???
सुभाष पुढे निघतोही.निमा त्याच्यामागे निघते..राजा ला हाताने बाय करते
निमा- बोलू नंतर चल बाय.
सुभाष आणि निमा गाडीतून निघतात.
निमा- तुम्ही सोडा मला कोपऱ्यावर, हॉस्पिटलला जाऊ शकता तुम्ही.
सुभाष(त्रासिक आवाजात) - मी कॅन्सल केल्या होत्या अपॉइंटमेंट,तो कोण ग मित्र? असा कसा? अगदी बसूनच राहिला.
निमा- अहो तो राजा असाच आहे! मोकळ्या आणि बिनधास्त स्वभावाचा पहिल्यापासूनच. काहीही बोलतो. पण स्वच्छ मनाचा आहे,अगदी साधा.
सुभाष- हम्मम
ते घरी पोहोचतात. निमा आवरून स्वयंपाकाची तयारी पाहते. सुधाबाईची तयारी झालीच असते. निमा भराभर राहिलेली जेवणाची तयारी करते. इतक्याच रोहन धावत येतो.तिच्या जवळ येऊन म्हणतो भूक लागल्याचं सांगतो. निमा त्याला जवळ घेऊन पापी घेते आणि त्याला जेवायला वाढते. त्याचं खाऊन झालं की रोजच्यासारखं सुभाष आणि स्वतःच पान वाढून घेते. सुभाष जेवायला येतात. दोघे सुरू करतात मध्येच निमाचा फोन वाजतो. सुभाष बघत असतो पूर्ण जेवताना निमा फोनवर बघत असते. सुभाष विचारतो, " निमा,सारखं फोन का बघतेय आज?काही महत्वाचं आहे का?" निमा फोनवरून लक्ष न हटवता म्हणते "राजा ने ग्रुप मध्ये ऍड केलय मला,सगळे नुसते कल्ला करतायेत ,राजा म्हणजे ग्रेट आहे एकदम"
सुभाषला जे नाव नसतं ऐकायचं तेच नेमकं तेच परत ऐकायला मिळतं " राजा" . तो भराभर आवरून झोपायला खोलीत निघून जातो. निमाचा फोन चालूच असतो.
दुसऱ्या दिवशी सुभाष हॉस्पिटलला सकाळीच निघून जातो. दुपारी जेवायला परत येणार असल्याचे रामुकाकांना सांगतो. निमा रोहनची तयारी करून त्याला शाळेत सोडून येते.
दुपारी उशिरा सुभाष येतो तेव्हा निमा कॉल वर असते. सुभाष तिला बघतो आणि रामुकाकांना जेवण खोलीत घेऊन यायला सांगतो. निमाचा फोन बराच वेळेनंतर संपतो आणि ती खूप आनंदात असते,निक्सन कंपनी चा कॉल येतो तिचे selection झाले असते. तिचे काही डिटेल्स मागवले असतात. ऑफरचा मेल पाठवलेला असतो.निमा मेल चेक करते आणि मनासारखी ऑफर मिळाल्यामुळे अजून आनंदी होते. तिला ही बातमी कधी कोणाला सांगतेय असं होतं. सुभाष जेवण करून बाहेर येतो निमा उडया मारतच त्याच्याकडे जाते. तिला ऑफर ची बातमी आधी सुभाषलाच सांगायची असते.
"सुभाष,आता कॉल आला होता..' निमाचं बोलणं अर्धवट तोडत सुभाष म्हणतो.
"निमा मला माहित आहेच कोणाचा फोन आला असेल! तुझा आनंदी चेहराच ते सांगतोय..मला खूप अर्जंट जायचंय,emergency केस आलीये,चल बाय" सुभाष निघून जातो.
संध्याकाळी बेल वाजते! निमा छान तयार होऊन बसलेली असते. ती धावत दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडल्यावर बघते तर इतका मोठा लाल गुलाबाचा गुच्छ त्यावर 'अभिनंदन' लिहिले असते.
" congratulations dear निमू"
"राजा!!?"
निमा आश्चर्याने त्याच्याकडे बघते आणि उत्साहात विचारते "तू कसा इथे?"
"तुझ्या नवीन जॉब बद्दल कळालं आणि म्हणूनच आलो" राजा
"Thankyou so much" ती फुलांचा गुच्छ हातात घेते. त्याचा सुगन्ध सगळीकडे पसरतो.
सुभाष तितक्यात येतो. राजाला बघून त्याला आश्चर्य वाटते. निमाच्या हातातला फुलांचा गुच्छ बघून तो विचारतो.
'निमा, हे काय तुझा वाढदिवस आहे काय?"
"नो डॉक्टर,तिला निक्सन ची ऑफर आलीये,selection झालंय तिचं' राजा आनंदात सांगितलं.
"ओह congrats निमा,मला माहीतच नव्हतं" तिच्याकडे कुत्सित हसून सुभाष म्हणतो आणि राजाला जेवून जा असं सांगतो. सुभाष त्याच्या खोलीकडे जातो आणि धाडकन दार आपटतो.
निमाच्या नजरेतून सुभाषला आलेला राग सुटत नाही.
रोहन आणि राजाची लगेच मैत्री होते. दोघे बराच वेळ खेळत असतात. निमा सगळी जेवणाची तयारी झाल्यावर सुभाषच्या बोलवायला त्याच्या खोलीत येते. सुभाष भूक नसल्याचे कळवतो आणि तुम्ही जेवून घ्या निमाला सांगतो. निमा काही न बोलता जाते.
राजा जेवण करून निघतो. निमा त्याला थँक्स म्हणते. रोहन ही राजाला परत यायला सांगतो. राजा त्याला प्रॉमिस करून निरोप घेतो.
रोहन ला गोष्ट सांगून झोपवायला निमा सुभाषच्या खोलीत घेऊन येते. रोहन सांगतो,राजा काका खूप चागला आहे,परत बोलावशील का त्याला?निमा हो सांगते. रोहन खूप लवकर झोपून जातो. सुभाष अंथरुणात पडून असतो. निमा सुभाषला जेवणाची आठवण करून देते
" मला भूक नाहीये,तुम्ही जेवलात ना सगळे? मग झोप आता,गुड night" सुभाष तिच्याकडे न पाहता बोलतो.
"मी पानं वाढायला घेतेय,भूक लागलीये मला" निमा सुस्कारा सोडून म्हणते.
सुभाष उठून उभा राहतो " म्हणजे तू जेवली नाहीस अजून?"
निमा काही न बोलता बाहेर निघून येते. सुभाष तिच्यामागे जातो.ती दोघांची पानं करते आणि पाणी आणायला किचनमध्ये जाते. सुभाष तिचा रस्ता आडवतो.
तिला म्हणतो"मला वाटलं,तू आणि राजा जेवला असाल" निमा त्याच्या डोळ्यात बघते..तिच्या डोळ्यांत टचकन पाणी येतं.
ती काही न बोलता त्याच्या डाव्या बाजूने निघते,तो डाव्या बाजूला सरकतो,ती उजवीकडे जाते,तो उजवीकडे थांबतो आणि वाट आडवतो.
निमा शेवटी थांबून त्याच्याकडे रागाने पाहते
"सॉरी निमा खरंच सॉरी! तू माझ्याबरोबर रोज जेवतेस,माहितेय मला. पण तू मला नवीन नोकरीचं सांगितलं नाहीस..त्या राजा कडून मला कळतं तो फुल पण आणतो. आणि मला तू काहीच सांगितलंच नाहीस म्हणून रागावलो होतो मी" सुभाष
निमा " तुम्हाला मी दुपारी सांगत होते,तुम्ही माझं बोलणं तोडून लगेच निघून गेलात"
"म्हणजे तेव्हा कंपनीचा फोन होता???मला वाटलं रा...."
निमा अजून चिडून मान नकारार्थी हलवते आणि त्याला मागे ढकलत जेवायला बसते. सुभाष निमूट जेवायला बसतो. तिच्या रागाला स्वतः जबाबदार झाल्याने तो स्वतःवरच चिडतो.
जेवण आटपल्यावर निमा उठते,हात धुऊन टेबल आवरायला घेते. सुभाष तिचा हात धरतो. ती हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करते आणि अजून घाईघाईने आवरायला घेते.
सुभाष तिला जवळ ओढतो,तिच्याकडे बघून म्हणतो " तू अशी चिडलेली मी कधीच पहिली नाही,पण तुझा राग असा असेल तर मी रोज अशीच पाहीन तुला,स्वतःला आरश्यात बघ नाकाचा शेंडा कसला लालबुंद झालाय"
निमा खरंच आरश्यात बघते,सुभाष जोरात हसू लागतो. निमा स्वतःला त्याच्याकडून सोडवत बाहेर हॉल मध्ये येऊन बसते.
सुभाष मागोमाग येतो.
"I am really sorry Nima,मला असं का होतंय माझं मलाच कळत नाहीये" सुभाष तिच्या नजरेला नजर मिळवून म्हणतो
"तुम्हीच इलाज करा काहीतरी" निमा
"शरीराची स्पदनं कळतात मला हात लावून,पण मनातल्या भावना कशा ओळखतात? डॉ असून मला अजून समजलेले नाही,तूच यांच्यात एक्स्पर्ट आहेस तूच सांग ना"
" मला तुमचं राजासोबतच वागणं अजिबात आवडलं नाही,किती राग करता त्याचा..त्याने काय बिघडवलंय तुमचं?" निमा लटक्या रागात सांगते.
"बरं,मला कळलंय चुकलंय माझं,मी असं वागलं नाही पाहिजे,मी स्वतः माफी मागेन त्याची,पण तू pls चिडू नकोस" सुभाष काकुळतीला येऊन बोलतो.
निमा त्याच्याकडे बघते तिला हसूच येत. ती उठून उभी राहते आणि हसून विचारते कॉफी पिऊयात? सुभाष तिच्या हसऱयां चेहऱ्याकडे पाहतो आणि त्याला एकदम हायसं वाटतं
" आज कॉफी नाही मी आईस्क्रिम आणतो पटकन जाऊन ,तुझ्या नवीन जॉब बद्दल" सुभाष पटकन बाहेर जातो.आणि आइस्क्रिम आणतो.
निमाचा रुसवा आईस्क्रिम सारखा विरघळून जातो.
क्रमशः
© शीतल अजय दरंदळे


0 टिप्पण्या
No spam messages please