Ad Code

Responsive Advertisement

लाईफपार्टनर (भाग 6)

 #लाईफपार्टनर भाग 6


*******************************************


आज 2 महिने झाले होते स्वराच्या जाण्याला. सर्व विधी पार पडले होते. लहानग्या रोहनमुळे सर्वांना सावरणे गरजेचे होते. तिचे जाणे जरी अचानक नसले तरी एक पोकळी निर्माण झाली होती. पण पुढे चालत राहणे गरजेचे होते.

सुभाष स्वतःला परत कामात गुंतवून ठेवू लागला. हॉस्पिटलला तो नियमित जाऊ लागला. निमा सुभाषच्या बाबतीत अजून हळवी झाली. त्याची खूप काळजी घेऊ लागली. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवू लागली. त्याला हवी ती गोष्ट जागच्या जागी हवी हे पाहू लागली. फक्त गरज आहे म्हणून करण्यापेक्षा माणूस प्रेमात असल्यावर आपोआप त्याच्याकडून ते घडत जातं. रोजचं रुटीन सगळ्यांनी सेट केलं होतं.आईबाबा कोकणात गेले होते. काही दिवस तिथे राहून परत यायचा त्यांचा विचार होता. रोहनची शाळा सुरू झाली होती. निमाला नवीन नोकरी साठी interview call येणे सुरु झाले होते.

रोज रात्री रोहन निमाला गोष्ट ऐकवायला सांगत असे. तिची गोष्ट ऐकत ऐकतच तो झोपी जाई. सुभाषचं घरी येणं निश्चित नसे, तो कधी लवकर येई तर कधी त्याला खूप उशिर होत असे. निमा रोज त्यांच्यासोबत जेवण्यासाठी थांबत होती. सुभाष उशीर झाल्यास तिला जेवून घेण्यास सांगत पण तरीही ती थांबे.

रोहनची गोष्ट संपल्यावर निमा स्वतःच्या खोलीत झोपायला जात असे किंवा सुभाषची वाट पाहत बसे. आज सुभाष लवकर आल्यामुळे तिघांचं एकत्र जेवण होतं आणि निमाला घेऊन रोहन त्याच्या खोलीत येतो. सुभाषही मागोमाग येतो. रोजच्याप्रमाणे निमाची गोष्ट सुरू होते. रोहन मन लावून ऐकत असतो. डोळयात झोप आलेली असते. तरीही राजा आणि राक्षस यांची कथा रोहनला ऐकायची असते.रोज ती एकच गोष्ट त्याला ऐकायला आवडत होती. निमा ही फार सूंदर रंगवून सांगे. सुभाष गादीवर पडूनच त्यांची गोष्ट ऐकत काहीतरी वाचत होता.

गोष्ट सपंतच आली होती आणि रोहन झोपून गेला. निमाला हसू आले. सुभाष तिच्याकडे बघून म्हणतो

"तुझ्या गोष्टीत खूपच जादू आहे,तो किती शांत झोपतो बघ"

"भलतंच तुमचं काहीतरी! लहान मुलांना गोष्टी आवडतात , मलाही आवडतात ," निमा हसून बोलते.

"मलाही आवडेल गोष्ट ऐकायला मग! म्हणजे मला ही शांत झोप लागेल म्हणजे कधीतरी" सुभाषचा स्वर कातर होतो.

"तुम्ही अजून सावरला नाहीत ना? मला कळतंय" निमा सुभाषकडे बघून म्हणते.

"सावरणे म्हणजे काय नक्की? रुटीन चालू झालंय,त्याला सावरणे म्हटतात तर मी हो म्हणेन ! पण स्वराच्या असंख्य आठवणी मला पकडून ठेवतात. ती असती तर असं बोलली असती, ती असती तर असं वागली असती, हे सतत आठवत राहतं. मी हे कसं थांबवू? तिला मी कधीच नाही विसरू शकत"

"कधीच विसरू नका,विसरणे गरजेचे नाहीच. तिच्या आठवणीसोबत जगायला शिका, तिचं नसणं स्वीकारा.जितक्या आठवणीपासून दूर पळण्याचा प्रयत्न कराल तितक्या त्या तुमच्या मागे येतील. त्यापेक्षा ते आनंदाने स्वीकारा." निमा

"इतकं सहज समजवतेस,सोपं वाटतं ऐकल्यावर. असो प्रयत्न नक्की करतो. आता झोपतो" सुभाषने जांभई दिली.

"चला गुड नाईट! झोपा शांत"  निमा निघते. दिवे मालवून खोलीबाहेर येते. अचानक तिच्या अंगावर काहीतरी पडल्याचं तिला जाणवतं ती जोरात किंचाळते. सुभाष ते ऐकून पटकन बाहेर येतो. सुभाष दिवे लावून बघतो एक झुरळ पळत जातं.  निमा सुभाषला पाहून पटकन घट्ट मिठी मारते. निमाचे डोळे बंद असतात. सुभाष तिला हसून म्हणतो "अगं झुरळ होतं, किती घाबरलीस? गेलं ते आता" निमाला काहीच ऐकू येत नाही,ती मिठी अजून घट्ट करते. तिच्या सर्वांगावर शहारे येतात. सुभाषला काहीतरी वेगळं जाणवतं,तो अलगद तिला दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. तिचे श्वास त्याला स्पष्ट ऐकू येतात. निमा हळूहळू मिठी सैल करते,मंद हसत त्यांच्याकडे खूप प्रेमाने पाहते. सुभाष तिच्या नजरेत नजर गुंफतो. दोन्ही नजरा कैद होऊन जातात. निमा अजून जवळ जाऊन सुभाषच्या गालावर ओठ टेकवते. सुभाष इकदम शॉक लागल्यासारखा मागे होतो..

"निमा हे बरोबर नाही,हे चुकतंय" सुभाष

"मी काय चुकले? मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे,तुमच्या मनातल्या स्वराताई सकट"

"नाही,तुझ्या आयुष्याचा तू विचार कर,माझ्यासाठी तू असं आयुष्य पणाला लावू नकोस, you deserve better lifepartner" सुभाष

"माझं मनापासून प्रेम आहे तुमच्यावर,तुम्हाला काहीच जाणवत नाही का?"निमाच्या डोळ्यात अश्रू तरळतात.

"मी तसं पहिलच नाही कधी तुला. तू अजून लहान आहेस ..तुझं हे आकर्षण आहे..असा वेडेपणा करू नकोस" सुभाष

"मी तुम्हाला स्वीकारलय अगदी मनापासून..हे काही 2,4 दिवसापासून नाही. आधी पासूनच तुमचा मी आदर करते .आदर ही प्रेमाची एक पहिली पायरी आहे माझ्यासाठी. तुम्ही ही जीवन पुढे सुरू करावे ही ताईने ही इच्छा व्यक्त केली होती. आकर्षण आणि प्रेमात एक अस्पष्ट रेष असते,शरीराच्या पलीकडे .. तुम्ही जवळ असावं ही भावना असते,जी सर्वांत महत्वाची असते. स्त्री कधीही कोणाला स्वतःजवळ येऊ देत नाही जोपर्यंत तिला विश्वास नसतो. तुम्ही बरोबर असता तेव्हा मला खूप आधार वाटतो..तुमची साथ ही कायमस्वरूपी हवी ही अपेक्षा म्हणजे प्रेम नाही का?"

"मला शब्दांत पकडू नकोस,मी स्वराची जागा कधीच तुला देऊ शकत नाही. तू खूप चांगली आहेस,माझी सखी आहेस,मलाही तुझा आदर वाटतो. तू जितका आधार दिलास तो मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. खूप thankyou सर्वासाठी. पण सॉरी"

"नाही,सॉरी नका म्हणू..मी समजू शकते नक्कीच. पण मला मनापासून जे वाटलं ते सांगितलं,मन मोकळं झालं. प्रेम कधी लादता येत नाही ते आतून उमलावं लागतं. नाहीतर फक्त हक्क समजला जातो ..सहचर होत नाही , गुडनाईट" निमाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, ती चेहरा लपवत तिथून निघून जाते.

निमा धावत तिच्या खोलीच्या दिशेने जाताना सुभाष पाहतो. तो फक्त बघतच उभा राहतो.. आकाश जसं काळ्या ढगांनी भरून येतं तसं अगदी तिला भरून आलं होतं. कधीही कोसळणार होतं. खोलीत गेल्यावर ती दरवाजा घट्ट बंद करून घेते. गादीवर स्वतःला फेकते. तिच्या डोळ्यांत अश्रुधारा वाहू लागतात. ह्रदयाला लागलं होतं,मन दुखावलं होत..तिचं प्रेम स्वीकारलं गेलं नव्हतं. सारखे अश्रू दाटून येत होते.आधी खूप राग आला स्वतःचा की का सांगितलं आपण? पण नंतर ती शांत झाली. प्रेम हे जबरदस्तीने नव्हे..सहजतेने स्वीकारले गेले पाहिजे. नंतर तिने काही निर्धार केला.


क्रमशः

© शीतल अजय दरंदळे



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या