लाईफपार्टनर भाग 4
********************************************
सुभाषचे आई बाबा येऊन एक महिना होऊन गेला होता. आईबाबा आणि निमाची छान गट्टी जमली होती. निमाचे खूप कौतुक वाटत होते दोघांनाही. घरात नोकरचाकर असूनही निमा जातीने लक्ष घालत होती सगळीकडे. कामात खूप चपळ आणि मनापासून करत होती. स्वराला सासूबाईंच्या हातचे नवनवीन पदार्थ चाखायला मिळत होते. पण तिची प्रकृती ढासळत होती.
काही दिवसांनी अजून 2 केमो झाल्या. स्वराचे पूर्ण रुपरंगच पालटलं. रोहन दचकू लागला तिच्याकडे बघून. हे पाहून सुभाष आणि आईबाबा यांनी ठरवलं की रोहनला या वातावरणापासून थोडं दूर न्यायला हवं! त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. शेवटी आईबाबा आणि रोहन कोकणला जायला निघाले. स्वरा खूप हळवी झाली तिला रोहन पासून दूर जायचे नव्हते. पण सुभाषने तिला समजावले ,थोड्या दिवस राहूदे त्याला. तो परत येईल. रोहन तिला मिठी मारून निघाला. स्वराचे डोळे पाणावले.
तिघे गेल्यावर घर अगदी रिकामं झालं..स्वराला निमाची सोबत होती. पण स्वरा आता अबोल झाली होती. तिला होणारा त्रासही सांगत नव्हती. ताईला पाहून निमाला कसंतरी व्हायचं..तिला बोलतं करायला निमा तिच्याशी बोलू लागली.
निमा- ताई का गं इतकी शांत झालीस? रोहनची खूप आठवण येतेय का?
स्वरा- आठवणींनी मला त्रास होत नाही. पण आता खूप कमी वेळ राहिलाय असं जाणवतंय.
निमा- नको असं बोलूस.
स्वरा- म्हणूनच शांत होते गं! मला आतून जाणवतंय आता. खूप काळजी वाटतेय मला रोहनची आणि सुभाषची. त्यांचं कसं होईल मी नसेन तेव्हा?
निमा- ताई???
स्वरा- थांब बोलुदे! सत्य स्वीकारणे गरजेचे आहे..सगळ्यांना माहिती आहे मग का खोटी आशा ठेवायची? मी गेल्यावर सुभाष अगदी एकटा होईल.कितीही म्हणलं तरी एकट्याने निभावणं शक्य नाही,मी ओळखते त्याला. रोहनला थोडं काही झालं तरी त्याचा जीव कासावीस होतो.. डॉक्टर असूनही तो खूप इमोशनल आहे. मी नसल्यावर त्याने थांबायला नको, पुढे आयुष्य नव्याने सुरू करावं असं वाटतं..
निमा - म्हणजे?
स्वरा- त्याला साथ देणारी लाईफ पार्टनर परत मिळायला हवी. जी त्याला साथ देईल,समजून घेईल. त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी, त्याला सावरणारी ,अजून खूप आयुष्य पुढं पडलंय. रोहनही खूप लहान आहे. त्याला माया देणारी कोणीतरी..
निमा- ताई असा का विचार करतेस? तुझ्याशिवाय कोण असेल त्यांची जोडीदार,या अवस्थेतही असा विचार करतेस? इतका पुढारलेला विचार? स्वतःच्या मृत्यूला इतक्या सहज कशी बघू शकतेस? इतकं तटस्थ??
स्वरा- निमू,अगं जन्म मृत्यू या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या लिहिलेल्याच आहेत ना! साधारणपणे मृत्यू कधी यावा याची वेळ आपणच आपल्यासाठी ठरवतो. पण इथे गडबड अशी झालीं की माझी वेळ चुकली. इतकच! पण मीही ठरवलंय जरी वेळ चुकली तरी मी हसत त्याला सामोरे जायचा प्रयत्न करीन. म्हणजे इथे तरी विजय माझा होईल. जितकी घाबरेंल तितका तो लांबेल आणि त्रासदायक होईल. खूप लांबचा प्रवास करायचाय त्याआधी थोडी तयारी नको करायला का?
निमा पटकन तिच्या जवळ येते,तिच्या तोंडावर हात ठेवते आणि रडू लागते."ताई बास गं, नाही ऐकवत मला."
स्वरा- ए वेडाबाई! अशी कशी गं तू? माझी साथ द्यायला आलीस ना? पाठराखण म्हणूनही आली होतीस. मग आता नको का द्यायला? डोळे पूस बरं लगेच....मला मदत करशील ना सुभाषची नवी लाईफपार्टनर शोधायला?
तेवढ्यात दार वाजले,बराच वेळ वाजते मग स्वरा उठली , तिने दार उघडले समोर सुभाष....निमाच्या डोक्यात स्वराचे शब्द फिरत होते,त्याला साथ देणारी,समजून घेणारी. लाईफ पार्टनर....
ती क्षणभर बघतच राहिली,लाईफपार्टनर यांना समजून घेणारी? साथ देणारी?यांच्यावर मनापासून प्रेम करणारी...
सुभाष - निमा,अगं कुठे लक्ष आहे तुझं??मला आत येऊदे
निमा- सॉरी,या ना.
सुभाष - तुझे डोळे का सुजलेत? बरी आहेस ना? रडलीस ?
निमा- छे! खूप झोप झाली आज,म्हणून सुजले असतील. सरबत करू ?
सुभाष - वा! आज कॉफी नाही म्हणालीस?
निमा- तुम्हाला आवडत नाही ना? मग आता सरबत चालेल मलाही..
सुभाष- इतर कोणासाठी अशी स्वतःची आवड बदलू नये!
निमा- पण बदलावी वाटत असेल तर?
सुभाष हसला. निमाने स्वतःला टपली मारून घेतली असं का बोलले मी???ती पटकन आत गेली सरबत आणायला.
सुभाष स्वराची चौकशी करायला खोलीत गेला. त्याने आत जाऊन तिला हात लावून तपासले. स्वराने विचारले " काय बघतोस?बरी आहे आता मी"
सुभाष तिच्याकडे पाहतो आणि हसतो , "काही खाल्लंस का? सरबत पिऊयात का? " स्वरा नको म्हणते.
"बरं पड आता" सुभाष तिच्या अंगावर पांघरूण टाकतो.
सुभाष फ्रेश होऊन बाहेर येतो. निमा सरबतचे ग्लास घेऊन सुभाषची वाट पाहत असते. सुभाष हातात ग्लास घेऊन tv वर बातम्या पाहत बसतो.
दोघे सरबत पितात. निमा सुभाषचं निरीक्षण करत असते. सुभाष एकदम बघतो तर ती गडबडते
सुभाष- निमा काय झालं? हा ग्लास घे,आज काही नवीन बोलत नाहीस.
निमा- आज CV नौकरीच्या वेबसाईट वर अपडेट केला. आता बघू कॉल्स आले तर. या शहरातच बघतेय.
सुभाष- छान! आता शोधायला सुरुवात केलीस तर कुठे २,४ महिन्यात मिळेल. करियर महत्वाचं.. इथेच बघ.
निमा एकदम चमकली, इथेच बघ, यांना काय म्हणायचंय?!!?ती पटकन आत गेली.तिच्या हृदयाची धडधड थांबत नव्हती. हे काय होतंय कालपासून,असं का वाटतंय त्यांच्याबद्दल? या भावना चुकीच्या आहेत का? काय करू मी कसं थांबवू?
सुभाष आत ग्लास ठेवून गेले,निमा तशीच उभी. सुभाषचा फोन वाजला. कोकणातून विडिओ कॉल आला होता रोहनचा. सुभाष आणि रोहनच्या गप्पा सुरु झाल्या. रोहन समुद्रकिनाऱ्यावर गेला होता आजीसोबत तिथल्या गमती सांगत होता..तिथला वाडा कसा मोठा आहे,इथे आजी कशी छान नारळाच्या वड्या करते,मोदक करते ,इथले मित्र किती नवीन खेळ खेळतात हे तो सांगत होता. एकंदर रोहन खुश दिसत होता,रमला होता. त्याने निमा मावशीशी बोलायचंय सांगितलं. सुभाष ने निमाला हाक मारली. निमाचे काही उत्तर येईना! मग सुभाष उठून स्वयंपाक खोलीत जातो आणि तिला हात धरून बाहेर आणतो. निमाला काहीच समजत नाही. ती हाताकडे बघतच राहते. सुभाष तिला फोनच्या फ्रेम मध्ये आणतो, तेव्हा तिला कळतं की रोहनचा फोन आलाय..त्यांच्या बऱ्याच गप्पा होतात. सुभाषचे आईवडीलही येतात,स्वराबद्दलही चौकशी होते. सुभाष त्यांना इकडचं सगळं ठीक असल्याचं सांगतो. गप्पा संपल्यावर फोन बंद होतो.
सुभाष- रोहन तिकडे आनंदात वाटला,रमलेला दिसतोय!
निमा-हो ना, आपली आवडती माणसं आजूबाजूला असली की कोणीही लगेच रमतं.
सुभाष- आजी आजोबाचा खूप लळा आहे त्याला. मी कितीदा म्हणतो आईबाबांना की इकडेच येऊन रहा.पण त्यांना कोकण सोडवत नाही. आम्ही तिघे वर्षातून चार ,सहा वेळा घरी जायचो. स्वरालाही खूप आवडायच तिकडे. तिथलं मोकळं वातावरण,तिथली माणसं,तिथलं राहणीमान,निसर्गाच्या सानिध्यात..
निमा-खरंय,कोकणात फार छान असतं ना? मी कधी अजून गेले नाही. जायचंय कधीतरी.
सुभाष- अनुभवलं पाहिजे! कधी संधी मिळाली तर तुला ही नेऊ बरोबर. एकदा बघ कोकण, तू प्रेमातच पडशील.
सुभाष जातो. निमा एकदम गोरिमोरी होते. प्रेमात तर पडलेच आहे!. मगाशी व्हिडीओ कॉलमध्ये फोनच्या फ्रेम मध्ये पहिल्यादा त्यांच्यासोबत जोडली गेले. पहिल्यांदा मी आणि ते एकत्र...छे छे हे पाप आहे,चूक आहे,. मी सावरायला हवं ..
कसे जुळले बंध मनाचे
ना कळले ही माझ्या मनाला;
का फक्त हे फसवे भास सारे
गुंतवत चालले या वेड्या हृदयाला......
© शीतल दरंदळे
क्रमशः


0 टिप्पण्या
No spam messages please