Ad Code

Responsive Advertisement

दिवे काका आणि काकू

 

#काकूंची_सामानाची_यादी_आणि_जिना


©️ शीतल अजय दरंदळे 

दिवे काकूंना सवयच खास! सामानाची अर्धी यादी लिहून द्यायच्या आणि काका निघाले की  राहिलेल्या वस्तूंची यादी तोंडीच सांगायच्या. म्हणजे  कधी असं व्हायचं की केकच्या सामानाची यादी देताना मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, अंडी लिहून द्यायच्या आणि काका निघाले की दाराबाहेर येऊन काका जिन्यात पायऱ्या उतरताना सांगायच्या, "अहो ते व्हॅनिला एसेन्स मिळतो ना, तो पण बघा बरका  आणि बटर विसरु नका. वरून डेकोरेट करायला चेरी मिळाली तर बघा"

या गडबडीत दिवे काका एखाद दोन गोष्टी विसरतातच. मग घरी येऊन परत ऐका, "एवढं नीट सांगितलं, तरी नीट  आणलं नाही सामान, दिवे फक्त आडनाव , पण चालू नाहीत कधी"  

काय करणार दिवे काका? बिचारे एक दिवस आधीच सांगून ठेवायचे " अगं समानाची यादी नीट आठवून बनवून ठेव, जिन्यात जाताना काय सांगत राहतेस? अख्या सोसायटीला कळतं की आज काय मेनू आहे. खालचे पिंडे आणि चकणे दारात येऊन उभे राहतात आणि म्हणतात, दिवे आज केक का? दिवे आज चिकन बिर्याणी का?" आणि हसतात मला.."

काकू त्यांच्या या तक्रारीकडे चुकूनही लक्ष देत नाहीत. त्यांच्या लाडक्या utube चॅनल वर रेसिपी ऐकत त्या आपला मोर्चा किचन कडे वळवतात. काकांना माहीत असतं ही सुधारणार नाही.

परवा अशीच एक गंमत झाली. काकूंनी utube वर पास्ता रेसिपी बघितली. त्यांना त्या दिवशी संध्याकाळीच बनवायची होती. पण या वेळी काकांनी चारदा यादी नीट बघून घेतली. "अजून काही लागणार नाही ना गं , आताच सांगून ठेव. परत जिन्यात सांगू नकोस"

"असं का हो बोलता? एवढी काय मी विसर भोळी वाटले का? यावेळी नीट रेसिपी पहिली आहे. व्हाईट सॉस पास्ता..मला तर  आताच तोंडाला पाणी सुटतंय"

" म्हणजे फक्त पास्ता का जेवायला? थोडा आमटी भात पण लाव. पोट भरत नाही"

"इ ई ई, काही काय बोलता? याला कॉन्टिनेन्टल फूड म्हणतात याच्या सोबत कोणी आमटी भात खातं का? हे म्हणजे पनीर मसाला सोबत बाजरीची भाकरी खाण्या सारखं आहे" काकू तोंड अगदी वेडवाकड करत म्हणाल्या.

हे ऐकुन काकांनी आपल्या पोटाकडे केविलवाण्या नजरे ने पाहिलं. काकू ते पाहून म्हणाल्या, "लावते तुमच्यासाठी मुगाची खिचडी..एवढं काही लगेच पोटाकडे पाहायला नको"

काकांनी निःश्वास सोडत कागदावर लिहिलेली यादी खिशात टाकली. आणि हातात पिशवी घेऊन ते पायात चपला सरकवत दार उघडून बाहेर निघाले. 

"अगं निघालोय, यादी तपासली ना एकदा?" काकूंनी हा प्रश्न ऐकून दोन्ही हात कमरेवर ठेवले. त्यांचे मोठे वटारलेले डोळे पाहून काकांनी काही न बोलता दार ओढून घेतले.

२ जिने खाली  उतरतात न उतरतात तोच काकूंनी हाक दिलीच, "अहो मी काय म्हणते, garlic ब्रेड करूया मुगाची खिचडी पेक्षा पोटही भरेल. तेवढा ब्रेड घेऊन या येताना." 

दिवे काका क्षणभर थबकले. आज अजिबात काकू आवाज देणार नाही या अविर्भावात ते दुकानात जाणार होते. पण त्यांचा भ्रम खळकान फुटला. त्यात पिंडे आणि चकणे दारात येऊन खुसुखसू हसत म्हणाले, "काका कोका कोला किंवा thumps up पण चांगलं लागतं पास्ता सोबत तेपण आणू शकता"  दिवेंकाका डोळे वटारून त्यांच्या कडे बघत होते. शेवटी त्यांनी दार बंद केले आणि काका नेहमीप्रमाणे मनात सामानाच्या यादीची उजळणी करत दुकानाकडे निघाले..


😀🙂😀


©️ शीतल अजय दरंदळे

(असे गमतीचे किस्से जीवनात रंगत आणतात हो ना?)

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या