लाईफपार्टनर (भाग 2)
घरी आल्यावर रोहन लगेच स्वराकडे पळाला. त्याने बागेतली सगळी गंमत स्वराला सांगितली. स्वराला रोहनचा आनंदी चेहरा पाहून खूप आनंद झाला. निमा स्वयंपाक घरात रामुनकाकांनी कशी तयारी केली हे पाहू लागली.सुभाषला एक दोन कॉल होते. तो त्यात व्यस्त झाला.
रात्री जेवताना आज स्वराही खुलली होती. ती सुभाषला म्हणाली,
"आज बागेत खूप मज्जा केली ना कोणीतरी" रोहन खुश होऊन ओरडला.
सुभाषने स्वराला जेवायच्या आधीची औषधे आणून दिली व सर्वांचे एकत्र जेवण झाले. स्वराला झोपवल्यावर सुभाष काही काम करत हॉल मध्येच बसला. रोहनला झोपवून निमा स्वयंपाकघरात आवराआवर करू लागली.
सुभाषने पाहिलं तो स्वयंपाकघरात गेला " निमा तू का आवरतेस हे सगळं? रामुकाका आवरतील की"
निमा- " हो ते आवरतीलच. पण मी एकदा बघून घेते सगळं, तुम्हाला कॉफी करू का?"
सुभाष- " खरं तर त्यासाठीच आलो होतो मी इथे,थँक्स ! मी बनवतो"
निमा -" मी इतकीही वाईट नाही बनवत डॉक्टर,बघा एकदा पिऊन"
सुभाष -" नो नो ,मला तसं नव्हतं म्हणायचं. बनव दोन कप, तुही पी!"
निमा कॉफी मग्स घेऊन बाहेर आली.
सुभाष-" कॉफी अगदी मस्त झालीये थँक्स"
निमा- "थँक्स कशाबद्दल?"
सुभाष -" नाही , actually thanks मला तुला बोलायचे होते. बागेत तुझ्याशी बोलल्यानंतर मला जरा मोकळे वाटले. As a doctor मी किती patients ला अशी वेळ आली की समजावतो,धीर देतो,माझ्या शब्दांचीच अनेक रुग्ण आणि त्यांच्या जवळच्याना धीर येतो पण आता माझ्या स्वतःवर अशी वेळ आलीये तर मी सपशेल अपयशी ठरतोय"
निमा- " कारण आता तुम्ही फक्त डॉक्टर नाही आहात एक पती आहात ज्याचे आपल्या बायकोवर खूप प्रेम आहे. तुम्ही या patient बरोबर मनाने जोडले गेले आहात. तिच्या वेदना तुम्हाला जाणवतात,जे सगळ्यांसोबत होत नसावे. एक रुग्ण म्हणून वाईट नक्कीच वाटते,पण जेव्हा तिथे आपली बायकोच येते. तेव्हा डॉक्टर जाऊन तिथे लगेच जोडीदार उभा राहतो आणि हे अपयश म्हणता येत नाही "
सुभाष -"प्रत्येक बाजू तू किती सहज समजून घेऊ शकतेस निमा! तू खरंच अगदी योग्य वेळेत इथे आलीस असं वाटतंय"
निमा-" समजावून सांगणाऱ्या पेक्षा समजून घेणारा हा जास्त महत्वाचा वाटतो. कधी कधी फक्त आपली बाजू ऐकली तरी बरं वाटतं प्रत्येकाला. चला निघते! ताईला काही लागलं तर हाक मारेल ती गुड night"
सुभाष -" हो good night"
निमा स्वराच्या खोलीत झोपायची स्वराचा जरा काही आवाज झाला की जागी व्हायची. सुभाषने नर्स ठेवायचं असं सुचवलं होतं,पण निमाने हट्टाने जबाबदारी घेतली होती. इतर वेळेला रामुकाका व सुधाबाईं होत्याच काही मदतीला लागले तर. रोहन रोज सुभाष शेजारी झोपायचा. पण दिवसभर निमा मावशी सोबत असे. इतके प्रश्न विचारायचा पण निमा न कंटाळता उत्तर देत असे. निमा आता घरातली जणू अविभाज्य घटक बनली होती.
सकाळी आवरल्यावर निमा स्वराच्या खोलीत तिला सूप घेऊन आली.
"ताई सूप घे ना"
"नको गं निमू , चव नाही तोंडाला.भूकही नाही" स्वरा
"अगं आजची वेगळी रेसिपी आहे,तुला आवडेल"
"तू ऐकणार आहे का? दे मला, सुभाष गेला हॉस्पिटल मध्ये?"
"हो ताई. ते सकाळीच गेले,रोहन अजून झोपलाय.उठवते थोड्यावेळाने"
"निमू,तुझी किती दगदग होते माझ्यामुळे, तू खूप करतेस माझ्यासाठी,आम्हा सर्वांसाठी."
"तुझं माझं कधी झालं ग ताई,मला शाळेत असताना ताप आला होता,तेव्हा तू स्वतःची शाळा बुडवून माझ्यशेजारी बसली होतीस चार दिवस, आठवतय का? जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत तुला चैन नव्हतं,सारखी कपाळाला हात ठेवून बघायचीस"
"अगं ते आजारपण छोटं होत,तात्पुरतं होतं. आणि आज हे माझं दुखणं मी संपल्यावरच संपणार"
"ताई काही नाही होणार ग तुला,तू हवी आहेस सर्वांना, जास्त विचार करू नको,सूप संपलं ना आराम कर आता,मी थोड्यावेळात वर्तमान पत्र घेऊन येते वाचायला"
निमा सुपचं बाउल घेते आणि बाहेर येते.रोहन उठलेला असतो,त्याचं दूध,अंघोळ ,खाण पिणे निमा करते.
संध्याकाळी रोहन निमाकडे धावत येतो. निमाला त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह दिसते,तशी ती त्याच्याजवळ येऊन बसते
रोहन " मावशी आई कधी उठणार ,सारखी झोपत असते,मला नाहीं आवडत ती अशी"
निमा " बाबा देतोय ना औषध तेव्हा ती लवकर बरी होईल बर का, आणि आपण बाप्पाची प्रार्थना म्हणूया का? म्हणजे अजून तिला शक्ती मिळेल" निमा आणि रोहन डोळे मिटून गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात करतात.
इतक्यात बाहेरून सुभाष येतो,त्या दोघांना प्रार्थना करत असताना पाहतो आणि हळूच त्यांच्यामागे येऊन तो ही डोळे मिटून उभा राहतो. रोहन सुभाषला बघतो आणि एकदम आनंदाने मिठीच मारतो.
सुभाष - "आज मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे रोहन,बघ माझ्या बॅगेत काय आहे ते?" रोहन पळत जाऊन बघतो त्याच्यासाठी नवीन रिमोटची कार आणलेली असते. रोहन ते पाहून आनंदाने उड्या मारायला लागतो आणि गाडी घेऊन धूम ठोकतो.
सुभाष निमाला विचारतो,"स्वरा"
निमा "ताई बरी आहे,आताच पुस्तक वाचताना डुलकी लागलीये"
सुभाष "बरं,तू चहा घेतलास?"
निमा "मी कॉफीच घेते. करू तुमच्यासाठी?"
सुभाष "निकोटिन हे रोज चांगलं नाही तब्येतीसाठी,पण आज घेईन म्हणतो,कर"
निमा कॉफी मग घेऊन टेबलवर ठेवते.
सुभाष - "स्वरा ची पुढची ट्रीटमेंट आता सुरू करावी लागेल,केमोथेरपी"
निमा(काळजीने) - "कधी करायची आहे?तिला त्रास होईल का हो खूप? मी ऐकलंय खूप त्रास होतो त्याने"
सुभाष - " आता ऍडव्हान्स असते,स्टेप बाय स्टेप द्यायची आहे,पहिले 4 डोस सौम्य असतात,ती कशी रिस्पॉन्ड करते पहायचे,पण तिला आता त्रास होणार नाही. उद्याच ऍडमिट करतो,2,3 दिवस जातील"
निमा शांतपणे विचार करत बसते,तिचे टेन्शन स्पष्ट पणे तिच्या चेहऱ्यावर दिसते.
सुभाष - "निमा are you alright? तू च मला सांगितलंस की खंबीर हो,आणि आता तू?"
निमा - "तसं नाही अहो, कधी कधी समोरच्याला धीर देताना माणूस स्वतःचे खचलेले मन लपवू पाहतो,आणि मग एकटाच कुढत राहतो पण आपण घाबरून चालणार नाही,"
सुभाष - "निमा स्वराला सर्व कल्पना द्यायची आहे आता,येतेस माझ्यासोबत?'
निमा -"हो हो,चला"
सुभाष स्वराला ट्रीटमेंट ची कल्पना देतात,निमा फक्त उभी राहून ऐकत असते. स्वरा सर्व ऐकल्यानंतर शांतपणे म्हणते
स्वरा - "सुभाष,हे सर्व कशाला?,मी वाचणार नाहींये रे'
सुभाष- "स्वरा तू हवी आहेस गं मला,असं नको म्हणूस. मी सगळे प्रयत्न करणार आहे.त्या देवाशी लढायला ही कमी पडणार नाही. तू साथ दे,मनातून विचार कर की मी बरी होईल. नक्की बरी होईल. आपण या संकटातून ही बाहेर पडू"
स्वरा हसते," हो रे चुकलं माझं! माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,एकत्र लढूयात. मी तयार आहे" सुभाष स्वराचा हात हातात घेऊन तिच्याजवळ बसून राहतो. निमाच्या डोळ्यात पाणी येतं ती खोलीच्या बाहेर पडते.
सुभाष थोडयावेळाने बाहेर येतो. स्वराला औषधांचा डोस दिल्यामुळे तिला झोप लागली असते.
निमा अंधारातच बसलेली असते. सुभाष दिवे लावतो.
सुभाष- "निमा,अशी निघून का आलीस? आणि अंधारात बसलीस"
निमा - "ताईला भाग्यवान म्हणू का दुर्दैवी?इतका प्रेम करणारा लाईफपार्टनर मिळालाय,पण त्या पार्टनर ला एकटा ठेवून तिचं लाईफ च आता देव हिरावून घेतोय? ही कसली नियतीची क्रूरचेष्टा?"
सुभाष - "लाईफपार्टनर म्हणजे काय? जन्मसोबती? जितकी नशिबात आहे तितकी सोबत"
निमा - "पण अशी सूंदर सोबत असेल तर आयुष्य पूर्ण जगता आलं पाहिजे होतं ताई ला..
कितीजण नवरा बायको म्हणून आयुष्य काढताना दिसतात,पण त्यात सवयीचा भाग इतका असतो की एकमेकांची सवय लागणे म्हणजे प्रेम एवढंच समजतात. पण खरं तर सवय वेगळी आणि साथ वेगळी. सवय ही स्वीकारावी लागते आणि साथ ही आपोआप लाभते काही वेगळे प्रयत्न न करता."
सुभाष - "फक्त सहाच वर्ष झाली गं आम्हाला एकत्र येऊन. तुला तर माहितीच आहे आमचे अरेंज मॅरेज. बघातक्षणी मी पसंत केली तिला. एक दोनदा भेटलो पण हिच आपली लाईफ पार्टनर हे लगेच जाणवलं. दोघांचीही पसंती होतीच. लग्नही निर्विघ्नपणे पार पडले. माझ्या डॉक्टरी पेशामुळे खूपदा वेळ देता यायचा नाही पण तिने कधी तक्रार नाही केली.ननेहमी मला कीतीही रात्री उशिरा होउदे जेवणासाठी तिला कायम थांबण्याची सवय.बएकत्र जेवलो तर अन्न अंगी लागतं म्हणे, पण आता हे सगळं....."
निमा - "अय्या तुम्ही जेवलाच नाही ना,ताई ओरडेल हा मला..उद्यासाठी तिची बॅग भरते मी आता. तुम्ही तोपर्यंत जेऊन घ्या"
सुभाष - "निमा, तू जेवलीस?जेवतेस माझ्यासोबत?"
निमा थेट सुभाषच्या डोळ्यांत पाहते क्षणभर! रामुकाकाना दोन ताट वाढायला सांगते. दोघे काही न बोलता जेवतात.
© शीतल दरंदळे
क्रमशः


1 टिप्पण्या
Thanks
उत्तर द्याहटवाNo spam messages please