कथा - अनोखी भेट
इम्रान, सुबोध आणि नेहा कॉलेजमधून घरी जाताना आज खूप खुश होते त्यांचा प्रोजेक्ट इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये पहिला आला होता. तिघांचेही शिक्षक, प्राध्यापक, प्रिन्सिपल व सर्व वर्गमित्रांनी खूप कौतुक केलं होतं. बारावीचा अभ्यास संभाळून त्यांनी या प्रयोगासाठी खूप कष्ट केले होते. कांद्यावर प्रयोग करून त्यांनी एक नवीन बीज उत्पादित केलं होतं. या बीजाचं वैशिष्ट हे होतं की कांदा खराब होण्याचा काळ कमी झाला होता. एरवी कांदा लवकर खराब होत असल्यामुळे लगेच विकावा लागायचा पण या नवीन बीजच्या शोधामुळे तो खराब न होता दीर्घकाळ टिकणार होता. या नवीन बीजाची चाचणी पुढच्या स्तरावर ही केली जाणार होती .
सुबोधचे वडील शेतकरी असल्याने त्यांना या प्रयोगासाठी बरीच माहिती मिळाली. त्यातून त्यांना ही अभिनव कल्पना सुचली. तसे ते तिघेही अभ्यासात खूप हुशार होते. तिघांनाही शास्त्र या विषयाची खूप आवड! सतत नवीन खटपट करून काहीनाकाही नवीन प्रयोग ते करायचेच. नेहाची आई शास्त्रज्ञ होती. इम्रानचे वडील कुक्कुट व्यवसाय सांभाळायचे. तर सुबोधचे वडील शेतकरी. तिघांच्या घरचे वातावरण तसे वेगवेगळे, तरीही त्यांची मैत्री खुप घट्ट होती. सुबोध होस्टेलमध्ये राहायचा, त्याला कशाचीही गरज लागली तर इम्रान व नेहा धावायचे. सुबोधच्या गावी सुट्टीत इम्रान व नेहा राहायलाही जायचे. ते गावाकडचे वातावरण त्यांना खूप आवडायचे. तिघांचाही शास्त्र या विषयाकडे ओढा असल्याने पुढेही संशोधन क्षेत्रातच करिअर करायचे हे तिघांनीही ठरवले होते.
अभ्यास बुडवणं, कॉलेजला दांडी मारणं त्यांना कधी आवडायचं नाही. त्या दिवशी रसायनशास्त्राचा तास चालू असताना नेहाचा फोन वाजला. फोन नेहमीप्रमाणे बॅगमध्ये सायलेंटवरच होता. तिचा भाऊ फोन करत होता. कॉलेजच्या वेळेत कधी असा फोन यायचा नाही त्यामुळे नेहाची चलबिचल झाली. नक्की काय झालं असेल ? काही तातडीचं कारण असल्याशिवाय फोन येणार नाही त्यामुळे ती सारखी फोनकडे बघू लागली. तास चालू असल्यामुळे तो तिला घेता येईना. फोनमुळे लेक्चरमध्ये काय चाललं आहे यावर तिचं लक्ष उडालं आणि नेमकं सरांनी बघितलं. सरांनी हाक देऊनही नेहा लक्ष देत नव्हती, शेवटी इम्रानने तिला आवाज दिला ती दचकली. उभं राहून सरांना सॉरी म्हणाली. लेक्चर संपल्यावर तिघेही बाहेर पडले,
" नेहा काय चाललय, तुला सर किती ओरडत होते कुठे लक्ष होतं?" दोघांनीही नेहाला विचारले.
" अरे घरून सारखा फोन येतोय! मला खूप टेन्शन आलय? असा फोन कधी येत नाही" नेहाने काळजीच्या स्वरात सांगितलं.
"एवढंच ना! फोन करून विचार की घरी.. नाहीतर मीच बोलतो तिकडे दे इकडे" सुबोध म्हणाला.
" नको " नेहाने फोन काढून नंबर प्रेस केला.
फोनवर बोलल्यावर कळलं की आईने त्या तिघांनाही घरी बोलावलं होतं. आता तर तिघांनाही टेन्शन आलं! नक्की काय प्रकार आहे हा ? कॉलेज सोडून इतक्या तातडीने घरी जायचं? पण तिघेही जास्त विचार न करता तडक घरी निघाले. घरी गेल्यावर आईने त्यांना समोर बसवले. तिघांनाही अचानक असं बोलवल्याबद्दल विचित्र वाटत होतं. नेहालाही काहीच कल्पना नव्हती त्यांचे असे चेहरे पाहून नेहाची आई हसली.
" अरे असे भांबावून जाऊ नका! काही काळजीचं कारण नाही. एक खूप मोठी स्पर्धा आहे त्याची माहिती सांगायची होती. मी उद्यापासून एका प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे, मग जास्त वेळ मिळणार नाही म्हणून लगेच बोलावून घेतलं" नेहाची आई म्हणाली.
तिघांनाही हायसं वाटलं. त्या कोणत्या स्पर्धेविषयी सांगत आहे याविषयीही खूप उत्सुकता वाढली.
"नासाची एक स्पर्धा आहे जागतिक स्तरावर. 'अंतराळ मोहिमेत टिकणारे अन्न पदार्थ' हा विषय आहे. तुम्हाला चांगली संधी आहे. साधारण दोन,तीन वर्षे एखादी मोहीम चालते. तिथे खूप अन्न पदार्थ नेता येत नाहीत. कारण वजनाची मर्यादा असते. त्यांना असा काही पदार्थ हवाय जो अंतराळात पिकेल किंवा त्याचे उत्पादन करता येईल. याचे बक्षीस तर खूप मोठे आहे. पहिले पाच नंबर काढणार आहेत आणि स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे" नेहाच्या आईने अजूनही बरीच माहिती सांगितली.त्यांनी तिघांनाही फॉर्म आणि स्पर्धेविषयी माहितीचे पेपर दिले. तिघेही डोळे विस्फारून ते पेपर वाचू लागले.
"वाचा आणि चर्चा करा. अभ्यास सांभाळूनच करा. उद्या दुपारपर्यंत मला सांगा तुमचे जे ठरेल ते?"
तिघांनीही पेपर हातात घेतले व सर्व डोळ्याखालून घातले. तिघेही विचारात पडले. संधी तर खूप मोठी होती. काय करता येईल याचे चक्र डोक्यात फिरू लागले. अंतराळात फार कमी-जास्त तपमान असते. अश्या तापमानात टिकेल, असा कोणत्या पदार्थाचा विचार करावा? थोडा सर्च करावा लागेल. कॉलेज संपल्यावर कम्प्युटरवर तिघांचाही शोध सुरू झाला. बरीच माहिती उपलब्ध होती, त्यांनी प्रिंटआउट घेतले. दोन तासांनी परत भेटायचं ठरलं. दोन तास म्हणता-म्हणता तीन तास झाले. तिघेही भेटल्यावर आपापली निरीक्षणं सांगायला खूप उत्सुक होते.
"नासाची स्पर्धा आहे मला खरंतर खूप टेन्शन येतंय" सुबोध म्हणाला.
" स्पर्धा आपल्यासाठी नवीन आहे का? एवढा का विचार करतोस? टेन्शन नको घेऊस." स्नेहा त्याला समजावत म्हणते.
" नाही गं, ही स्पर्धा म्हणजे खूप मोठी आहे "
"असू दे ना, स्पर्धेत भाग घेणं महत्त्वाचं! जिंकू किंवा हरू. आणखीन काय होणार आहे?" नेहा हसत त्याला समजावते.
"बरोबर बोललीस नेहा. प्रयत्न 100% करूयात. हे बघ मी पूर्ण यादी आणली आहे. अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, कसे झोपतात या विषयी सगळी माहिती आहे." इम्रान म्हणतो.
"हो आणि तिथे झिरो ग्रॅव्हिटी असते. आपण एखाद्या प्राण्याचा विचार केला तर ! ज्याचे मांस त्यांना खाता येईल. आमच्या पोल्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या आहेत. त्यांची अंडी टिकवण्यायोग्य करता आली तर, त्याचे उत्पादन पण करता येईल?" इम्रानने पुढे सुचवले.
"मी बटाट्याचा विचार करत होतो, तिथे पिकून त्यांना सहज खाता येतील. तो दीर्घकाळ टिकेलही. गाजर , मुळा असेही पर्याय आहेत" सुबोध म्हणाला.
" दोन्ही कल्पना चांगल्या आहेत. इम्रान तू अंडी आणि सुबोध तू बटाट्याचा प्रयोग सुरू कर. मी तापमान कसं कंट्रोल करता येईल हे बघते. " नेहाने सांगितले.
" हो लगेच सुरू करतो " इम्रान, सुबोध नेहाला म्हणतात.
दुसऱ्या दिवशी दोघेही उत्साहात नेहाच्या घरी गेले. नेहासुद्धा आईला त्यांच्या प्रयोगविषयी सांगायला आतुर होती. त्यांनी आपापल्या कल्पनांविषयी सांगितले. नेहाच्या आईने सगळे ऐकून अधिक माहिती दिली. त्यांची कल्पना आवडली असे सांगून त्यांना अजून प्रोत्साहन दिले.
"मी ऑनलाईन फॉर्म भरते आणि अजून काही माहिती आहे का ते बघते. बऱ्याच नोट्स आहेत माझ्याकडे त्याही उपयोगी पडतील तुम्हाला" नेहाच्या आईने दुजोरा दिल्यावर तिघांचाही उत्साह दुणावला.
नंतरचे काही दिवस पूर्णपणे प्रयोगात झोकून देऊन काम करायचे असं ते ठरवतात. इम्रानचा अंड्यांचा प्रयोग खूप जोमात सुरू होतो. अंडी अंतराळात घेऊन जाणे खूप आव्हानात्मक असतं. कारण ती फुटू शकतात. त्यांना नेल्यावरही कसं योग्य तपमानात उबवता येईल यावर प्रयोग सुरू होतो. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यावर त्यांचं खाणं आणि मोठं होणं. याची निरीक्षणं चालू असतात. तिकडे सुबोध बटाट्यावर प्रयोग सुरु करतो . बटाटा खाणं जास्त सोपं जाऊ शकतं पण टिकणं जास्त आव्हानात्मक असतं. कांद्याच्या जाती सारखा बटाट्याची नवी जात पिकवता आली तर ? याचा विचार सुबोध करत असतो.
त्यांना दोन्हीपैकी एकच प्रयोग पाठवता येणार असतो. महिन्याभराने सुबोधचा बटाट्याचा प्रयोग यशस्वी होईल अशी खात्री वाटते. एक नवीन लाल बटाट्याचा शोध तो घेतो जो जास्त काळ टिकू शकतो. गरम तपमानात तो अवघ्या सात मिनिटांत शिजून तयार. इम्रानचा अंड्याचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होत नाही.त्यासाठी आणखी वेळ लागणार होता. पण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असते. तिघेही नेहाच्या आईशी बोलून बटाट्याचा प्रयोग पाठवायचा ठरवतात. विविध तपमानात हे नवीन लाल बटाटे कसे व्यवस्थित उगवू शकतात याची पूर्ण माहिती ते फॉर्ममध्ये भरतात. पंधरा दिवसात उगवणारे आणि सात मिनिटांत खाण्यास योग्य असे लाल रंगाचे बटाटे ते शोधून काढतात. नेहाच्या आईने त्या स्पर्धेचे सोपस्कर सर्व पूर्ण केले. तीन महिन्यानंतर निकाल लागणार होता.
बराच वेळ प्रयोगात घालवल्यानंतर कॉलेजचा अभ्यास बराच मागे पडतो. त्यात बारावीची परीक्षा खूप लांब नसते त्यामुळे तिघे अभ्यासात बुडून जातात. बोर्डाची परीक्षा, प्रॅक्टिकल, सबमिशन सर्व सुरू होतं. शेवटी बारावीची परीक्षा संपते. दोन अडीच महिने त्यातच निघून जातात. तिकडे नासाच्या स्पर्धेचा विषय मागे पडतो.
नेहाच्या आई त्यांना आठवण करून देते. दुसऱ्याच दिवशी निकाल होता. तिघांच्याही पोटात गोळा येतो. काय असेल निकाल? खूप मेहनत घेतली होती. निकालाच्या दिवशी नेहाने इम्रान व सुबोधला घरी बोलावले. तिघांनीही बोटे क्रॉस फिंगर्स केली. अखेर तो क्षण आला. निकालाची यादी वेबसाईटवर पब्लिश झाली. तिघांनी डोळे विस्फारून ती पहिली. परत परत, तीन-चारदा त्यांनी ती यादी तपासली. पण पहिल्या पाच जणांमध्ये त्यांचे नाव नव्हते. नाव नसल्यामुळे ते तिघे निराश झाले. त्यांना वाईट वाटले. पण नेहाची आई त्यांना उत्साह वाढवण्यासाठी त्यांना छानसे आईस्क्रीम आणते, त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल तिघांनाही शाबासकी देते. त्यांचे कौतुकही करते. पण तिघे खट्टूच होतात. आईस्क्रीमही नको म्हणतात.
इतक्यात इम्रानचा मेल बॉक्सचा मेसेज वाजतो. तो मेल उघडून पाहतो तर नासाकडून एक अभिनंदनाचा इमेल आलेला असतो. त्या ई-मेलमध्ये त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं असतं. बक्षिस म्हणून एका कोर्सची स्कॉलरशिपही त्यांना मोफत दिलेली असते. इम्रान ते वाचून जवळजवळ उड्या मारू लागतो. नेहा आणि सुबोधही मेल बॉक्स उघडून बघतात, तर त्यांनाही तसाच मेल आलेला असतो. तिघेही एकदम उल्हासित होऊन जल्लोष करतात. जरी स्पर्धा जिंकले नसले तरी त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांना एक अनोखी भेट नासाकडून मिळालेली असते. या कोर्स उपयोग त्यांना पुढील शिक्षणासाठी ही नक्कीच होणार असतो. कुठल्याही बक्षिसापेक्षा ते कमी मौल्यवान नसते. तिघेही आता उत्साहात आईसक्रीम पार्टी करतात. स्पर्धा म्हणली की हार जीत ही होतच असते. पण खरी मजा असते तो प्रयत्न करत राहण्यात. काय माहित? कोणती अनोखी भेट आपली वाट बघत असेल.
©® शीतल अजय दरंदळे
कोथरूड, पुणे
मोबाईल- 8830153966


1 टिप्पण्या
अप्रतिम लेखन नवीन युवा पिढीला विचार करायला भाग पाडले
उत्तर द्याहटवाNo spam messages please