Ad Code

Responsive Advertisement

लेख - ट्रीप मैत्रिणींची

 लेख - ट्रीप 


"चाललेय मी ट्रीप ला" नवऱ्याला सांगितल्यावर त्याने आपले लॅपटॉप वरचे डोळे जराही न हटवता फक्त ह्म् केले जणूकाही मी कोपऱ्यावर मारुती मंदिरात जाऊन येतेय.  मी जरा अजुन आवाज स्पष्ट करत "जातेय बरका, काशीदचे बीच चे बुकिंग करतोय आम्ही " 

"ममा खरंच?" दोन्ही मुलांनी आनंदानी हसत विचारलं.

"जाशील तेव्हा बघू, वर्षभर चाललय तुमचं, शेवटी ARAI पर्यंत जाऊन येता" नवऱ्याने हीही चिडवत सांगितलं.

"नाही यावेळी जातोय चौघी. अजिबात कॅन्सल करणार नाहीये. " मीही निक्षून सांगितलं तरीही मनात किंतू होताच..

दुसऱ्याच दिवशी बुकिंग केले. आता निर्धास्त. दिवाळी संपली आणि  सगळ्यांना तयारीचे वेध लागले. 

फराळात ५ ऐवजी ४ च लाडू खाल्ले. फोटो नीट यायला नको का? अगदी साइज झीरो नाही पण मग लांबून फोटो काढावे लागतात . हात दंड न दिसता ढाई किलो वैगेरे वाटतात. शेवटी तोंडावर ताबा म्हणजे ताबा.. तेलकट, तूप, गोड कमी.. पण चिरोट्यानी फसवले..इतके छान खुसखुशीत चिरोटे, नवऱ्याने 'खास' मला आवडतात म्हणून आणले. नाही कस म्हणायचं? चिरोट्याना फसवले असं होईल, जाऊदे थोडे खाल्याने काही फरक पडत नाही.केलेला 'पण' मागे पडला. आणि फराळावर ताव मारला.

पुढच्याच आठवड्यात चौघी पैकी एकीचे कॅन्सल झाले..नवऱ्याला सांगितले तेव्हा म्हणाला, "ARAI चालू केले आहे, जाऊ शकता"..मला चिरोटे आणल्याचा गोडवा विसरून मी चिडले, "एवढं हसायला नकोय, जायचं तर आहेच आणि तेही लांब"  "मम्मा सिंहगड लांब आहे, तिथे जा" खिखिखी

मत्रिनीशी फोनाफोनी  " नाही म्हणजे नाही, आपण तिघी तर तिघीच जाऊ.. "  त्यांचेही तेच म्हणणे होते..एकाच शाळेत एकाच बाइंकडून शिकलोय ना आम्ही , "इच्छा तिथे मार्ग" ....भले इच्छा गेले दीड वर्षापासून होती, मार्गावर कितीही काटेकुटे टक्के टोमणे,खिखी खु खू येऊदे..

दुसऱ्याच दिवशी बुकिंग वाल्याचा फोन आला....."मॅम जरा प्रॉब्लेम हो गया है, आपने जो रूम बुक की है, वह कॅन्सल करनी होगी.. मै आपको दुसरे ऑप्शन देता हुं"  बुकिंग करून निर्धास्त झालेली मी शॉक लागल्यासारखी उठले..प्रचंड चीड आली. हिंदीत कसा राग व्यक्त करू ? हिंदी विषय शाळेपासून ऑप्शनला टाकलेला..." अरे, अस कैसे तुम last minute पर फोन ...". थांबले..तो ही घाईघाईत म्हणाला"पानशेत, पवना का बुकिंग करू क्या? आपके लिये अच्छा रहेगा" त्याला फोन मधून सडके टोमॅटो फेकून मरावेसे वाटले...म्हणजे पुण्यातल्या मुलींनी फक्त पानशेत,खडकवासला, मुळशी फिरावी काय?  अलिबाग नाहीच.... पुणेरी मराठी बाणा जागा झाला.."नो need, तुम पैसे return करो, आम्हाला कुठे जायचं हे आम्हीच ठरवतो" एवढंच बोलून फोन ठेवला...

चिडून नवऱ्याकडे पाहिले, त्याच्या डोळ्यात ARAI टेकडीच दिसत होती..मी काही न बोलता लगेच मैत्रिणीला फोन लावला..त्यांना ही धक्का बसला.."don't worry, दुसरा ऑप्शन शोधू"  माझी समंजस मैत्रीण म्हणाली.. शेवटी रात्रीचा दिवस करून मोबाईल ला जराही आराम न देता, काशीद बीच रेस्टॉरंट सपडलेच...बुकिंग करून टाकले..निर्धास्त झाले ....

आता दिवाळी म्हणलं की फराळ तसं ट्रीप म्हणलं की शॉपिंग नको का? योगा क्लास बुडवून relaince ट्रेंड्स गाठल. दीड दोन तासांत एक टॉप आणि पलाझो घेतली. मग डोक्यात आले, तिघींनाही एक टाईप चा tshirt घ्यावा..फोटो भारी येतात.."अग uniform घातल्या सारखे दिसाल तुम्ही? उगीच काहीतरी शोधत बसते" माझी नजर बघून त्याने एक रॅक आणि मी एक रॅक घेतले शोधायला..तिघिंच्या वेगळ्या size एकाच टाईप मध्ये सापडेनाच...शेवटी अर्धा तास संपत आल्यावर एक रंग सापडलाच..दिल्ली जिंकल्याचा फील आला..मला लगेच काउंटर कडे गेले..तिथे काउंटर वाला म्हणाला, "मॅम ये पँट बारकोड नही हो रही है, आप दुसरी लेलो"..पुन्हा हिंदी?? दीड तास शोधून काढलेली पँट फक्त त्यांचा कॉम्प्युटर accept नाही करत म्हणून बदलू?  "अरे ऐसे कैसे तुम last minute?". नवऱ्याने अजून हिंदी बाहेर पडायला नको म्हणून  थांबवले... मला जरा लांब जाऊन बसायला सांगितले. शेवटी काहीतरी त्यांचे बोलणे झाले आणि सगळे कपडे घेऊन नवरा काउंटर सोडून माझ्यासमोर येऊन थांबला, " किती भारी आहेस रे तू, काय केलस?" त्याने आता घरी निघूया हा कटाक्ष टाकला..मी गप गुमान निघाले…

आणि अखेर तो दिवस आलाच..बॅग भरून तयार झाले.."मम्मा इतकी मोठी बॅग, आपण सगळे चाललोय का?" असे माझ्या बॅग ची size बघून अखेर विचारलेच.." चूप रे, तुला काय करायचंय?..तू नीट अभ्यास पूर्ण कर, वेळेवर खाऊन पिऊन घ्या, कुठे धडपडू नका". " अग थांब, एका रात्रीसाठी चालली आहेस तू, किती सूचना...you enjoy there, इकडची काळजी नको" माझी सूचनांची टेप थांबवत मुलगा म्हणाला..मुलगाही समंजस आहे 'त्याच्या पप्पा वर गेलाय' माझी आई हेच म्हणत असते…चांगल्याना चांगलेच मिळत असतात. असा माझा गोड समज आहे. पण आईसमोर मी काही बोलत नाही. आता सूचना बंद करून कधीच मी ट्रिपच्या रस्त्यावर लागले सुद्धा होते. ट्रिपच्या तयारीत दोन रात्र झोप आली नव्हती. आता फुल्ल आराम करायचा ठरवला.

असो..आता फिक्र नॉट ,जिस्ट चिल्ल...फुल दंगा आणि मस्ती. डोळ्यावर गॉगल, तोंडावर मास्क, खिशात sanitiser, पाठीवर सॅक आणि मनात "दिलं चाहता है" वाजू लागलं.....

झुमकन गाडी आली. "WE TIME "  सूरू झाला.... तिघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या.आणि ट्रीप सुरू झाली..दोन दिवस जो काही कल्ला, धमाल मस्ती, रात्रभर गप्पा,फोटोसेशन केलं त्याची तोड बाकी कशालाच नाही. अनेक जबाबदाऱ्यांमध्ये हरवून जाताना आपण स्वतःला किती विसरून जातो हे नव्याने लक्षात आलं.  

शाळेत खाल्लेलं आईस्क्रीम परत वेड्यासारखं चाखलं, रात्रभर गप्पांचा फड जमवला. मनातली लपवलेली कितीतरी दुःख हळूहळू बाहेर आली, मनं मोकळी झाली.. मैत्रीच्या नव्या बंधनात बांधले गेलो, समुद्राच्या पाण्यात लहान मुलासारखे मनसोक्त खेळलो. वाळूत पाय मुरवत चालत राहिलो..समुद्रकिनारी सूर्यास्त बघत फक्त शांत बसलो. मग दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु झाला. मनात असंख्य गोड आठवणी ठेऊन परत आलो... ही अवस्मरणीय ट्रिप परत कधी होईल? कशी होईल माहीत नाही.. पण सध्या तरी मी "सातवे आसमान पर" आहे..

शेवटी हेच म्हणेन, 

दिन बीत जाते है सुहानी यादें बनकर,

बाते रह जाती है कहानी बनकर,

पर दोस्त तो हमेशा दिल के करीब रहते है,

कभी मुस्कान तो कभी,आँखों का पानी बनकर। 

(शायरी गुगल केलीय, पण भावना त्याच आहेत बरं)


Tip--;... मुलींनो प्लॅन ढकलू नका, स्वतःला ढकला कारण मी जिंदगी ना मिले दोबारा!!!मग करताय।ना मैत्रिणींना फोन लगेच??? मलाही कळवा बरका...

Picnic plan friends, trip plan



...समाप्त...

©® शीतल अजय दरंदळे


(लेख  कसा  वाटला? नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow  करा )




Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या