Ad Code

Responsive Advertisement

कथा - पाऊस आणि ती

कथा - पाऊस आणि ती (marathi katha)


आज पहाटे पाच वाजताच त्याला जाग आली. त्याने आपल्या बेडरूमच्या खिडकीबाहेर पाहिले. पाऊस सुरूच होता. काल रात्रीपासून धो धो बरसतोय. सगळ्या मुंबईला पाण्याने नुसता झोडपून काढतोय. असा मुसळधार पाऊस जरी नवीन नसला तरी दर वेळी मनात धडकी भरवतोच. तो पटकन खिडकीखालच्या टेबलपाशी आला. समोरच्या बिल्डिंगमधील ती गॅलरी बंदच होती.

ती सध्या त्याची आवडती गॅलरी झालीये, कारण त्यातून त्याला ती दिसते. महिन्यापूर्वी नवीनच राहायला आलीये. बरेचदा फोनवरून खळखळून हसून बोलणारी, ओले मोकळे केस सोडून हलकेच पुसणारी, रोज छान रगेबिरंगाचे कुर्ते, नाजूक बांधा, सडसडीत, सावळी, वीस पंचविशीची असावी. त्याला चेहरा स्पष्ट दिसायचा नाही पण तरीही तो क्लीन बोल्ड झाल्याचं फीलिंग. धडपड धडधड...

ती पुसटशी दिसली की ह्याच्या हृदयाचे ठोके वाढायचे. आज किती वाजता ती बाहेर येईल याचे अंदाज हाच लावायचा. खूपदा त्याचे अंदाज चुकायचे. पण म्हणून सारखी नजर खिडकीला खिळलेली. खूपदा वाटायचं पटकन जाऊन त्या घराची बेल दाबावी आणि सरळ तिला डोळे भरून पाहावे. पण घाई काय? आता तर सुरुवात आहे. धिरे धिरे से जिंदगी मे ... चं फीलिंग

सकाळी सकाळी गॅलरी उघडलीच. ती चहाचा वाफाळलेला कप हातात घेऊन आलीच. तो कप नाजूक ओठांना स्पर्श करत तिला हुशारी येतेय, मस्त आस्वाद घेत पितेय. यानेही पटकन कपभर instant coffee बनवली आणि खिडकीत येऊन बसला. पावसाळी  थंडीत गरमागरम घोट ऊब देत होते. तिचे लक्ष नव्हतेच इकडे पण हा तिच्याकडे बघूनच कप ओठांना लावत होता जणूकाही तिच्यासोबतच पितोय. ती समोर बसलीये, हा काही जोक सांगतोय आणि ती  हसतेय आणि याला गुदगुल्या होतं आहेत,असं फीलिंग.एक गरम चाय की प्याली हो...

नूकतच वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं, त्याचा अख्खा दिवस याच रुम मध्ये जायचा त्याचा. आधी इतका कंटाळा यायचा पण जेव्हापासून ती दिसायला लागली याला अगदी फ्रेश वाटू लागलं, तिच्याबरोबरच जणू काही याचा दिनक्रम ठरलेला. ती नसेल तेव्हा बाकीची कामं आवरून घ्यायची. तिने पाहावं म्हणून याने ही भडक रंगाचे tshirt घालायला सुरुवात केली. पण अजून तिने पाहिलंच नाही. जालीम प्यार , कभी नजर तो मिल जाये, आँखो ही आखोमे काहीतरी व्हावं यासाठी तो वाट पाहायचा. 

पण आज त्याने इथूनच हात करायचं ठरवलेच. ती गॅलरीत आली याने पटकन हात केला. तिने हात बाहेर काढला आणि पावसाचे पाण्याचे थेंब हातावर झेलले. पावसाच्या थेंबांशी ती खेळत राहिली. याने खट्टू होऊन हात आत घेतला. तिचे लक्ष गेलेच नाही. पण तिचा पावसाशी खेळ पाहून त्याला गंमत वाटली, ते थंडगार तुषार जणू ती त्याच्यावरच उडवत आहे अशी फीलिंग.  तो स्वतःशीच हसला. पहिल्या नजरच प्रेम असंच असावं हे फीलिंग.

आज बऱ्याचश्या कुंड्या दिसल्या तिच्या गॅलरीत, मातीची पोती दिसत होती. आज रोपं लावायचा कार्यक्रम दिसत होता. तिची पूर्ण सकाळ गॅलरीत रोपं लावण्यात गेली. खूप वेळ तिची लगबग पाहण्यात हा दंग झाला. बरीचशी फुलझाडं दिसत होती. हिला फुलांची खूप आवड दिसतेय, आपण भेटू तेव्हा मी तिला गुलाबाची फुलं देईन, याने मनोमन ठरवलं. तिची खूपच गडबड चालली होती, सारखं आत बाहेर. शेवटी थकून खुर्चीवर बसली. याला वाटलं पटकन जाऊन तिला पाणी द्यावं का चहाच करावा? किती दमलीये बिचारी  ,याला कसकस झालं. तितक्यात याच्या बॉसचा फोन आला.तंद्री भंगली. याने फोन घेतला बराच वेळ बोलणं चालू राहीलं. बोलणं संपवून तो खिडकीपाशी आला गॅलरीचं दार बंद, ती गेलेली. अरर, चुटपुट ..मिसिंगचं फीलिंग..

तिच्या घरी अजून कोण कोण असेल याची उत्सुकता याला लागली.  अजून तरी कोणी दिसलं नाही. म्हणजे एकटीच आहे की काय? घरकाम करताना दिसे पण अजून कोणाची ये जा दिसली नाही. एकटी का राहत असेल? घरी काही प्रॉब्लेम असेल, एकटी मुंबईत शिकायला किंवा कमवायला आली असेल?  पण आता एकटी कुठेय? मी आहे ना!! आता लवकरच भेट होईल तेव्हा नक्की सांगेल सगळी माझी काळजी ,तुला पहिल्यांदा पाहताच कसा घायाळ झालो मी!? नीटशी पाहिलीच नाही तरी किती ओढ वाटतेय तिच्याबद्दल. काही नाती न समजणारी असतात हेच खरं? आमचं प्रेम जन्मोजन्मीच असावं... कधीही न संपणार? कदाचित तिलाही तेच जाणवेल मला भेटल्यावर असं त्याला जाणवून गेलं.. जनम जनम का साथ है, निभानको.... वालं फीलिंग.

अखेर स्वप्न पूर्ण होणार होतं. त्या संध्याकाळी रिमझिम पाऊस होता. ती गॅलरीत न दिसता तिच्या बिल्डिंगच्या गच्चीत दिसली. तो ही लगेच स्वतःच्या बिल्डिंगच्या गच्चीत गेला. त्याला पहिल्यांदा ती नीट दिसली. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. खूप अंतरावर नव्हती ती. हाक मारली तर सहज ऐकू येईल अशी. खुप सुंदर दिसत होती एक छत्री हातात घेऊन सगळीकडे पाहत होती. किती छान तयार झालीये, साडीत,  आहा, कशासाठी? कदाचित हिला कळलं की काय?  हा छत्री न घेताच गेला होता घाईघाईने. भिजत उभा, ती समोर छत्रीत उभी. तिची नजर याच्याकडे गेली. ती पुसटशी हसली. याला काय बोलावे सुचेना, तो पाहतच राहिला. तिने नजर वळवली. याला स्वतःचेच हसू आले, आता बोलायला हवं होतं तिच्याशी. ती किती गोड हसली माझ्याकडे पाहून. नक्कीच काहीना काहीतरी आहे तिच्याही मनात. तो खूप आनंदला. त्याने पावसात भिजतच  हात पसरून गिरकी घेतली. ते दोघेही एकटेच , ती तिच्या गच्चीत  आणि हा इकडे , वरून पावसाची रिमझिम. हा मदहोश. आता मनातल्या मनात शब्द जुळवत त्याने डोळे मिटले. आता बोलूयात सगळं सांगूंयात हीच ती वेळ... प्यार वाला टेन्शन की फीलिंग…बस एक जरा साथ हो तेरा..

तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने वरून इकडे तिकडे पाहिले. मग गच्चीच्या दरवाज्यात गेली. तिथे कोणी आला हो

marathi blog,marathi katha,marathi kavita

ते. याने डोळे उघडले, तिला हाक मारणार तर ती त्या कोणाच्यातरी मिठीत. असं वाटत होतं खूप दिवसांनी भेटत होते, त्यांच्या  हालचालीने जाणवलं तिचा नवराच असावा. नवऱ्याची वाट पाहत ही उभी इतका वेळ? बाहेरगावाहून आला होता बरेच दिवसांनी. बॅगही दिसत होती हातात, त्या दोघांचे बोलणे,  हसणे ,गुलू गुलू बोलणे सगळे याला इकडे ऐकू येत होतं. हृदयाचे तुकडेतुकडे झाले. मनातलं मनातच राहिलं. तो लगेच घरी गेला, आणि त्याने आपल्या रूमची खिडकी लावून घेतली गच्च..सारे सपने कही खो गये! हाय हम क्या से क्या होगये ??? दिल टूटनें वाला फीलिंग.


 ******समाप्त*****

©शीतल अजय दरंदळे

(कथा कशी वाटली नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा


(marathi katha,marathi blog)




Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या