Ad Code

Responsive Advertisement

Marathi Katha ,marathi story कथा - बस स्टॉप

 कथा - बस स्टॉप Marathi story,marathi blog,marathi katha

********************************************
बस स्टॉप वर रोज निशाला एका आजोबा दिसायचे. रोज संध्याकाळी ती ऑफिस वरून यायची तेव्हा ते बस स्टॉप वर उभे असायचे.रोज दिसणाऱ्यांशी जशी नजरओळख होते तशी निशा आणि आजोबांची होती.
तिला खूप आश्चर्य वाटायचं की इतके वयस्कर आजोबा कुठे जात असावेत?
आजोबांचे वय असावे 75,80 च्या आसपास,सुखवस्तू घरातले दिसत होते.पांढरे शुभ्र केस, डोळ्यांना चष्मा, उजव्या हातात काठी.पायात स्पोर्ट शूज, अंगकाठी सडसडीत ,वयोमानाप्रमाणे थोडेसे झुकलेले. पण चेहऱ्यावर कायम हसू.
निशाची ऑफिस वरून घरी यायची वेळ आणि आजोबांची बस स्टॉप वर असायची वेळ जवळसपास एकच असे. त्यांची हमखास रोजच भेट व्हायची.निशा ला ते रोज विचारत " 110 बस नंबर आली का ग?"
निशा सांगत "आजोबा दर एक तासानी असते बस,6 ची येईल नाहीतर 7 ला च"
एवढंच संभाषण,अजून काही ते जास्त विचारत नसे, निशाही गडबडीमुळे घरी पळे.
आज निशा उतरली तर आजोबांच्या हातात एक अबोलीचा गजरा दिसला. निशाला हसू आलं,तिने गमतीने विचारलं ," अय्या आजोबा हा गजरा कोणासाठी हो? कोणी खास येणार आहे का?"
आजोबा हे ऐकल्यावर ते हसले, आणि त्यांनी नेहमीचा प्रश्न विचारला , " 110 नंबरची बस कधी येणार आहे ग?"
निशानेही घड्याळ बघत वेळेचा अंदाज सांगितला आणि तो घरी निघाली.
मध्ये 1,2 दिवस असेच गेले आजोबा काही दिसले नाही. निशाला वाटले कोणी पाहुणे आले असावेत, किंवा त्यांना बरं तर नसेल? तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले पण तिने ठरवले,आले की विचारावं. रोज हमखास दिसणारी माणसं कधी बरेच दिवस दिसले नाहीत तर कसं काही चुकल्याचुकल्या सारखं वाटतं तसच निशाचही झालं.
आजोबा तब्बल आठवडाभराने बस स्टॉप वर आले, निशा बस मधून उतरताच तिला ते दिसले आणि निशाला हायसं वाटलं.
तिने त्यांना पाहून विचारले, "आजोबा बरं आहे ना? इतके दिवस का दिसला नाहीत स्टॉप वर?"
आजोबानी बाकी काही न बोलता त्याचा रोजचाच प्रश्न विचारला, " 110 नंबरची बस कधी येणार आहे?"
निशाला खूप कुतूहल वाटलं,की कोण येतं असेल त्या बस ने आजोबांना भेटायला रोज? की आजोबा जात असतील कुठे ?तिने ठरवलं की एक दिवस थांबून बघुयात. इतका म्हातारा माणूस का बरं एकटाच येतोय असा ? कोणी घरी आहे की नाही? घरच्यांना काही काळजी आहे की नाही? बिचारे एकटे दिसतात. मनाचे मांडोरे..
दुसऱ्या दिवशी निशा बसमधून नेहमीप्रमाणे उतरली आणि पाहते तर काय? बरीचशी गर्दी जमलेली बस स्टॉप वर. ती पटकन त्या गर्दीत शिरते काय झालंय हे पाहायला,तिला बघून धक्काच बसतो. ते रोजचे आजोबाच बेशुद्ध पडलेले,हातातली काठी दूरवर पडलेली,हातातल्या अबोली च्या गजऱ्याच्या पाकळ्या झालेल्या. पिशवी एकीकडे. तिने पटकन पुढे होऊन आवाज दिला,पर्समधली पाण्याच्या बाटलीतले पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडले. आजोबांना जाग येते, त्यांना उठवून स्टॉप वरील बाकड्यावर बसवलं, कोणीतरी खायला पुढे केले,पण ते मानेने नाही म्हणाले.
निशा त्यांना विचारते, "आजोबा काय झालं? पडलात कसे? तुमच्या मुलांचा काही नंबर सांगता का?"
आजोबा सावकाश पणे विचारतात "110 नंबरची बस आली का ग?" निशाला त्यांचा सुरकूतलेल्या चेहऱ्यावर काळजी दिसली तो चेहरा पाहून तिला गलबलून येतं. तिने परत त्यांना ऐकू जावं म्हणून जरा जोरातच ओरडून विचारले ," आजोबा,कुठे राहता तुम्ही? पत्ता सांगा,फोन नंबर द्या."
कोणीतरी त्यांची पडलेली पिशवी उचलून निशाकडे दिली, निशा त्यात बघते , एक चिट्ठीत एक नंबर असतो तिने लगेच मोबाईल वरून नंबर डायल केला. पलीकडून एका तरुणाचा आवाज आला . निशा झालेले सर्व सांगते. तो तरुण लगेच निघालाच असं कळवतो. 10 मिनिटात तो व सोबत कोणी स्त्री, नवरा बायकोच असावेत. दोघे तडक धावत आले आणि आजोबांना बघून असवस्थ झाले. त्यांचा हात सावकाश धरून त्यांनी आजोबांना गाडीत बसवले.
निशा सर्व पाहत असते, ती तरुणाला म्हणते ," मी फोन केला होता तुम्हाला,वडील का तुमचे?"
"हो, खूप धन्यवाद ताई,बाबा आहेत माझे,त्यांना चक्कर आली असावी शुगर चा त्रास आहे" तो काळजीयुक्त स्वरात म्हणाला.
निशा विचारते, " अच्छा,रोज दिसतात मला, 110 नंबरची बस कधी येणार विचारतात,कुठे जातात का ते?"
"नाही ओ ताई, कसं सांगू तुम्हाला? 6 महिन्यांपूर्वी आई याच बसने येणार होती गावावरून परत. पण अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली. तेव्हापासून यांना भ्रम होतो,ते रोजच तिची वाट पाहतात. तिला अबोलीची फ़ुलं खूप आवडायची म्हणून जेव्हा मिळतो तेव्हा गजराही आणतात. किती सुकलेले गजरे मी स्वतः टाकून दिले आहेत.मध्ये आठवडाभर बरं नव्हतं म्हणून आम्ही दोघेही रजा टाकून घरीच होतो, डॉक्टर म्हणाले विसरणे वाढत आहे, कदाचित त्याच आजाराची लक्षणे असावीत. पण बाबांना आठवतंय, आईच्या प्रत्येक गोष्टी त्यांना स्पष्ट आठवतात. फक्त काही गोष्टी ते विसरत आहेत. आम्ही त्यांना इकडे येऊ नये म्हणून खूप सांगतो, पण मग ते चिडचिड करतात, खाण्यावर राग काढतात. म्हणून एक जण रोज त्यांना इथपर्यंत पोहचवत आणि तासा भराने येताना मी घरी घेऊन जातो. घरी जाताना मी त्यांना सांगतो की आजची बस कॅन्सल झालेली दिसते, उद्या येईल परत" त्याने डोळ्यांत पाणी आणून निशाला सांगितले.
निशाचे ही डोळे पाणावले. हे ऐकून तिने धीर देत म्हणले ," होईल सगळं व्यवस्थित, धीर सोडू नका तुम्ही"
"नाही ताई, मी आईला गमावलंय अचानकच, पण आता यांचा विचार करूनच रोज इकडे आणतो त्यांना, खोटी आशा ही माणसाला उभारी देते कधीकधी. त्यांना गमावू नाही शकत आम्ही . येतो आता, आणि thanku,तुमची मदत झाली खूप"
गाडी सुरू झाली आणि ते तिघे गेले.
निशाला सगळीच उत्तरं मिळाली होती पण मनात बरेच नविन प्रश्न कायमचे निर्माण करून.

Marathi story,marathi blog,marathi katha

... समाप्त..


कथा कशी वाटली नक्की कळवा.

Marathi story,marathi katha,marathi blog



@शीतल
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या