Ad Code

Responsive Advertisement

कथा- हरवलेली बाबी

कथा - हरवलेली बाबी 

कारल्यांच्या घरात आज सकाळपासूनच गडबड होती. शेजारच्या चाळीत राहणार्‍यापर्यंत आवाज जात होता. 
तशी ब्रेकिंग न्यूज म्हणा ना!! कारण कारल्यांची बबिता वय वर्ष फक्त खत्रा चुकले हा ?वय वर्ष फक्त
सतरा. लांब केस ,सडपातळ बांधा , निमगोरी , त्यात आडनाव कारले असून बोलायला अगदी गोड.
  आज सकाळपासून हरवली होती. आता एवढी तरुण मुलगी हरवली त्यामुळे बोभाटा तर झालाच
होता . शेजारी-पाजारी काळजीने (कमी,पण उत्सुकतेने ) कारल्यांच्या घरी हजारदा येऊन चौकशी
करत होते. कारले कुटुंब त्यांच्या चौकशीला जमेल तसं उत्तर देतच होते. पण बबिता उर्फ  बाबीच्या
अश्या गायब होण्याने सगळ्यात जास्त काळजीत होती ती म्हणजे बाबीची आई. 

तसे घरचे  सगळेच काळजीत होते. चला घरात बघूया डोकावून नक्की काय चाललय ते ?

कारल्यांच्या घरात बाबी धरून सहाजण आई ,बाबा , बबन ,आजी आणि आजोबा.

आई (डोळ्यात पाणी आणून ) - अहो बघा ना माझ्या बाबीला,कुठे गेलीये सकाळपासून? नाश्ताही तसाच राहिलाय,काय करू आता?

बबन ( शिर्‍याच्या कढईत बघत )- आई तू काळजी नको करुस, इकडे आण,मी खातो. संपवतो सगळा शिरा. 

आजी - नालायका,बहीण हरवलीये तिला शोधायचं सोडून शिरा हादडत बस इथे मेल्या. जा बघ बाहेर जाऊन.

 

बबन - ताई हरवेल कसली गं आजी? काय ती मांजरीचं पिल्लू आहे? चांगली सतरावर्षांची आहे. गेली असेल
कुठल्या मैत्रिणीकडे चकाट्या पिटायला, आई चहा ठेव ग पटकन. त्यशिवाय फ्रेश वाटत नाही.  

आजी (नाराजीने हातात जपमाळ घेतात)  - जरा बहिणीसाठी  माया नाही या पोरामध्ये!  सुमन चहा ठेवत
असशील तर मला ही ठेव गं . फक्त अर्धा कप, पूर्ण कप काही गळ्याखाली उतरायचा नाही बघ.

बाबा (येरझार्‍या घालत ) - मी जरा बघून येतो बाहेर जाऊन बाबी दिसतेय का ? अग येताना काही भाजी
आणायची आहे का?

आजोबा (डोके पेपरमध्ये घुसवून) - खूप दिवस झाले चिकन खाऊन....!
आई (काळजीच्या स्वरात) - अहो तुम्ही लेकीला शोधून आणायला निघालात ना? भाजी कसली विचारताय ?
जा लवकर.

आजोबा - तेवढा येताना नारळ पण आण बाबा !ओला नारळ वाटणात नसेल तर काही चव येत नाही
बघ चिकन ला. नुसतं पांचट लागतं.

बबन (आतल्या खोलीतून ओरडून ) - सापडली सापडली, .(सगळे उत्साहात आतल्या खोलीत जातात)आई हे बघ !  माझी जीन्स सापडली,कधीपासून शोधतोय.
आज दिसली. ताईंनीच लपवली असेल .

आई (चिडून त्याचा कान पिळत ) - घोड्या उठ,जा जरा बाबांबरोबर शोध बाबीं ताईला. फेकून दे ती जीन्स तिकडे लगेच. 

आजोबा - अरे पिशवी घेऊन जा बरका? नारळ आणि चिकन कसं आणणार येताना? उगीच हेलपाटा नको. 

आई बबनच्या हातात रागारागाने पिशव्या कोंबते, बाबा आणि बबन पायात चप्पल सरकवून निघतच असतात.

बबन (दारातून)  - आई एक विचारू?

आई - काय रे?

बबन- एक किलो चिकन बस ना?

आई चप्पल काढून मारणार इतक्यात बबन पळतो आणि दार उघड आहे हे पाहून  शेजारच्या चुगलिकाकू
पटकन घरात घुसतात.

चुगलिकाकू - काय हो कारले वहिनी? बबिता पळून गेली म्हणे.

आई - अहो शुभ बोला,माझी बाबी अशी नाही हो.


आजी (त्यांचं संभाषण ऐकून ) - काय गं चुगले, आधी हे सांग तुझ्या लेकाचा आणि सुनेचा घटस्फोट होणार
आहे ना? म्हणे सासू खूप छळते सुनेला

चुगलिकाकू (आजीच्या प्रश्नाने एकदम गडबडतात)  - ओह आजी,असं काय म्हणता ? मी साखर न्यायला
आलेय फक्त.

आई - हो घ्या साखर. माझ्या बाबीची खूप काळजी वाटते हो. असं न सांगता कधी गेली नाहीये कधी.  

चुगलिकाकू - सापडेल हो वाहिनी. पळून नसेल गेली तरकोणीतरी बॅग घेऊन जाताना पाहिलंय म्हणे तिला.

आजी ते बोलण ऐकून तावातावाने उठतात. चुगलिकाकू आजीचा एकंदर आवेश बघून घाबरून पळून जातात.

तासाभराने बाबा आणि बबन येतात. त्यांना आलेलं बघून आई लगेच बाहेर येते. 

बाबा- चिकन मिळालं गं घे. नारळपण मिळाला आहे, चार दुकानं फिरलो त्याच्यासाठी. पाणी दे जरा  प्यायला.

आई(त्रासिक) - अहो बाबीचं काय? तिला शोधलत की नाही?

बाबा- हो मग , पण ती  नव्हती,तिच्या मैत्रिणींनाही विचारलं पण त्यांनाही नाही माहीती काही.

बबन- मी पण सगळ्या पार्लरला जाऊन आलो. नाहीये ती. किती बिल पेंडिंग ठेवलंय ताईनी ,भरावं लागलं

मला. तिला आता बघतोच आल्यावर.

आजी- गप मेल्या,तुला कोणी सांगितलं होतं तिथे जायला,सगळे याचे मित्र आणि हा तिथेच बाहेर घुटमळत राहतात, पाहते ना मी?

बबन- ए आजी तू कधी जातेस पार्लरला ? देवळात असतेस ना रोज? आम्हाला तर तेच सांगतेस. 

आजी- अगदी रोजच नाही,परवाच फेशियल .... (मध्येच थांबवून)  तुला काय करायचीय नको ती चौकशी?

तू  तूझं बघ. 

आई (अगदी मेटाकुटीला येऊन ) - अरे माझ्या बाबीबद्दल बोलाल का कोणी?देवा आता तुझ्याच हातात सगळं 
(रडायला लागते)

बाबा - अगं काळजी करू नकोस,आपण थोडी वेळ वाट बघू नाहीतर पोलिसात कळवू.

बबन-  भूक लागल्यावर घरीच येईल ती. आई काहीतरी खायला कर ना.

आजोबा - मी नारळ देऊ का फोडून ? शिजत आलं का चिकन? मसाला नीट टाका. आणि वाढा लगेच.

मला गोळ्या घ्यायच्यात.

आजी ( आजोबाकडे बघत ) - तुझ्या आजोबांना काही ऐकायला येत नाही!! पण भूक कळते बरोबर. 

बाबा - तिचा फोन लागतोय का बघ ना बबन.

बबन (फोन हातात घेऊन ) - बाबा सकाळपासून हजारवेळा लावला असेल फोन , बंद येतोय. बघतो परत
थांबा.

बबन - आई हे बघ मेसेज आलाय ताईचा. "आत्याकडे पोहोचले."

बाबा - काय बाबी मुंबईला गेली? बोलली कशी नाही मग ? फोन लाव गोदाआत्याला आधी.

बबन फोन लावतो. पलीकडून बाबीच फोन उचलते. 

बबिता - आई पोहोचले मी, जरा उशीरच झाला.

आई - अगं, सांगून जायला काय होतं तुला? माझा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. 

बाबी -  म्हणजे अगं  इकडे ऍडमिशनच्या फॉर्मची शेवटची तारीख आहे आज. मी पण विसरले होते, मला राम दादानी  आठवण केली आणि तडक इकडे यायला सांगितलं . आजोबांना सांगितलं होत निघतानां.

फोनला रेंज  नव्हती बस मध्ये. आजोबांनी सांगितलं नाही का तुम्हाला

सगळे आजोबांकडे बघतात. सकाळपासून आजोबांच्या कानांना श्रवणयंत्र नव्हतं हे त्यांच्या लक्षात आलं.


आजोबा (उठतात )  - बसायचं का जेवायला? झालं का चिकन??जरा कांदाही कापा बर. बाबी कुठं दिसत
नाही ते

सगळे कपाळाला  हात लावतात.

 ******समाप्त*****

©शीतल अजय दरंदळे

(कथा कशी वाटली नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा)

 

कॉमेडी,comedy, marathi story

 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या