Ad Code

Responsive Advertisement

भारत माझा देश

 भारत,देशभक्ती,माझा देश,माझा अभिमान


मला लहानपणीचा किस्सा आठवतो. सातवीत असताना 

आमची सहल किल्ल्यावर गेली होती. आम्ही मुली मुली एकत्रच जात होतो. गडाखाली आल्यावर आमची बस थांबली होती. सगळे वर चढत जाणार होतो. तितक्यात २०,२२ वयाच्या मुलांच्या  दोन चार बाईक आल्या.  हुल्लडगिरी करू लागल्या. आम्हा मुलींकडे बघून दात विचकत हसणं, डोळे मिचकावत हातवारे करणं सुरू झालं. आम्ही जरा भांबावलो पटापट पावलं पडू लागली. पण जसे जसे वर चढू लागलो तसे ते आमच्या मागून येत होते. कोणाच्याही नकळत आमच्यावर शेरेबाजी चालली होती. मला प्रचंड राग येत होता. सरांना सांगायचं होतं पण वाटलं गप्प बसतील थोड्या वेळाने. पण तसं काही झालं नाही. शेवटी सर आमच्यासोबत चालू लागले आणि ते पुढे निघून गेले. आमच्या जीवात जीव आला. एक पॉइंटवर ते आम्हाला परत दिसले तेव्हा आम्ही तिघीच होतो. त्यांच ते घाणेरडं वागणं परत सुरू झालं.


 मी भयंकर चिडले त्यांना बोलले,"अश्या पवित्र ठिकाणी असं वागणं शोभत का तुम्हाला?" त्यातला एक बोलला, "तू लढलीस का हा किल्ला घ्यायला?" "नाही, पण मला जाण आहे की कोणी आपल्यासाठी बलिदान केलंय या जागेवर, अनेक शूर निधड्या छातीने इथे लढले आहेत. आपण खूप नशीबवान आहोत की स्वातंत्र्यात जन्मलो. पण म्हणून असं वागून लाज आणू नका."       "ए लेक्चर देऊ नको बाई, चल निघ इथून, शहाणपणा करतेय" त्याचे मित्र परत हसले. माझा संताप होत होता, पण मैत्रिणींनी थांबवलं. आम्ही पुढे निघून गेलो. पूर्ण फिरून झाल्यावर परत बसपाशी आलो. ती मुलं आलीच होती पण शांततेत निघून गेली.


माहीत नाही तेव्हा काय झालं होतं? पण अश्या ठिकाणी एक वेगळंच स्फुरण चढतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांनी त्या मातीवर रक्त सांडलं आहे,गडकिल्ले चढताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य वाटलं, मुजोर आदिलशाही आणि निजामशाही विरुद्ध फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी.


हळूहळू जसे मोठे होत जातो अजून स्वातंत्र्यवीर कळत जातात. गांधीजी, सुभाषचंद्र बोस, सावरकर, टिळक, भगतसिंग, राजगुरू, आंबेडकर, महात्मा फुले अशी कितीतरी नाव आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. ही मोजकी नावं आहेत, तशी यादी किती मोठी आहे. पडद्यामागे तर कितीतरी unsung heroes आहेत. मला लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवते. त्यांच्या लहानपणी सगळेजण भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी छोटा का होईना खारीचा वाटा उचलायचे. आजोबांनी स्वतः हॅण्डबील वाटली होती. गावात एक स्वातंत्रवीर काही महत्वाची माहिती घेऊन आला होता. त्याची बातमी सगळीकडे पसरू नये म्हणून लहान मुलांच्या हाती छोटे संदेशाचे कागद त्या त्या घरी पोहोचवण्याचे काम होते. लहान मुलांना कोणी आडवायचे नाही. अशा कितीतरी गोष्टी ऐकल्यात. भूमिगत कोणी झाले तर त्यांच्यासाठी खायची, प्यायची , रहायची सोय करायची आणि तेही अगदी गुप्तपणे..कारण ध्यास एकच. आपल्या मायभूमीला परकीय आक्रमापासून वाचवणे. अख्खा गाव त्यावेळी एक व्हायचा. कुठलाही धर्म, जात, असो फरक पडायचा नाही. एकच कुटुंब व्हायचे सगळे. अनेक कथा तुम्हीही ऐकल्या असतील. आता इतका सोपा काळ नक्कीच नव्हता तो. पण  याची जाणीव कायम मनात रहायला हवी. त्यांनी स्वार्थी विचार केला असता तर आज हा मोकळा श्वास घेता आला असता का?


दहावीत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरच " महानायक"  पुस्तक वाचनात आलं. केवढा मोठा लढा दिला आहे त्यांनी. शेवंटपर्यंत वाचताना डोळे अखंड वाहत होते. किती तो अविरत ध्यास, मातृभूमीसाठी प्रेम, भक्ती , वाचून सुन्न व्हायला होतं. आजच्या पिढीला हे मोल पुस्तकातून वाचून कळेल, सिनेमातून कळेल. पण ते कळून उपयोग नाही ते नसानसांत भिनलं पाहिजे. त्यासाठी वर्षात फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट पुरेसे नाहीत. देशभक्ती हा दिखावा नाही, आपल्या देशाविषयी हे प्रेम आतून यायला हवं. आपल्या आईविषयी जे आपल्याला वाटतं तीच भावना मातृभूमीसाठी येते. प्रेम , भक्ती ओढून ताणून येत नाही. ती मुळापासून रुजायला हवी.


आज क्रिकेटमध्ये भारत जिंकला तर जल्लोष होतो, अभिमान वाटतो. तीच गोष्ट कुठल्याही खेळाविषयी, भारत अजिंक्य हवा असं वाटतं. याचं कारण प्रेम आपल्या देशाविषयी. कोणी भारताला दूषणं दिली तर संताप होतो. भारतीय सैनिक शहीद झाले की डोळे पाणावतात. कारण ही जाणीव प्रत्येकामध्ये असतेच. देशभक्ती आणि देशप्रेम हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू वाटतात. थोडीशी वागण्यातून जागरूकता आणली की झालं. 


बऱ्याचदा परदेशाचे गोडवे गायले जातात, तिथे राहणं किती चांगलं आहे याविषयी गप्पा होतात. यात काही गैर नाही पण जेव्हा संकट येतं तेव्हा तिथल्याच भारतीयांना पहिल्यांदा घरी पाठवलं जातं. कारण त्यांच्यासाठी आपण परकेच. प्रत्येक देशाची वेगळी संस्कृती असते. आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान हवा. आपल्या संस्कारातून तो येत असतो. तो असाच पुढच्या पिढीत रुजवायला हवा. तरच हा देश पुढे जाईल. 


देशभक्तीची गाणी, आठवणी , पुस्तके यांमधून जे स्फुरण चढतं ते जपायला हवं. देशाला नावं ठेवणं अगदी सोपं आहे. पण आपल्याकडून असं तरी कृत्य घडू नये ज्यामुळे देशाची मान झुकेल. शेवटी देशाची ओळख ही तिथल्या माणसांमुळे होते. सर्वसामान्य माणूस जर स्वातंत्र्ययोध्यांच्या पाठीशी नसता तर आजचे स्वातंत्र्य  आपल्याला उपभोगता आले असते का?  त्यामुळे आपली जबाबदारी ही खूप मोठी आहे. देशभक्ती म्हणजे फक्त बॉर्डरवर जाऊन लढणं नाही किंवा तिरंगा घेऊन फिरणं नाही तर ती एक जबाबदारीची जाणीव आहे, जी फक्त एका भारतीयाला कळते. 


ए वतन ... मेरे वतन ...

 आबाद रहे तु 

मे जहां रहु,जहां मैं याद रहे तु




राजी मधलं हे गाणं ऐकताना किवा अजून कितीतरी गाणी आहेत की ऐकून अंगावर शहारे येतात. भावना उचंबळून येतात. यातले शब्द जणूकाही प्रत्येक भारतीय मनाचे प्रतिबिंब आहे असच वाटतं. तुम्हाला काय वाटतं? 


India,भारत,26 January,15 August,

 


 जयहिंद, वंदे वातरम


©शीतल अजय दरंदळे

(लेख कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून. धन्यवाद)


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या