Ad Code

Responsive Advertisement

माझा मॉर्निंग वॉक



माझा मॉर्निंग वॉक

प्रत्येकजण व्यायामाने स्वतः च्या तब्येतीची काळजी घेतोच. तेही विविध व्यायामाचे प्रकार करून. कोणी नाचून नाचून झुंबा करतं , कोणी योगा, कोणी जिममध्ये घाम गाळतं , तर कोणी सायकलिंग, ट्रेकिंग असे अनेक प्रकार आहेत. 

पण माझ्यासारख्या आळशी,झोपेवर प्रेम असणार्‍या मुलीच दु:ख्खं कोणाला कधी कळलं नाही. व्यायाम पाहायला तसा खूप आवडतो, पण करायचा म्हणजे? अतिशय अवघड होऊन बसतं . त्यात पहाटे उठून ? पहाटे तर खरी साखर झोपेची वेळ असते ना ? आईबाबांना कोण समजवणार.? लहान पडतो आपण बापडे..त्यांना तर रिस्पेक्ट द्यायलाच हवा ना. 
 
म्हणून मीही यावर्षी ठरवलंच आहे, आपल्या तब्येतीची काळजी घ्यायलाच पाहिजे बस... रिस्पेक्ट द्यायला हवा ना स्वतच्या शरीराला..मग सगळ्या व्यायामप्रकारांचा सखोल अभ्यास करून सगळ्यात शेवटी मी मॉर्निंग वॉक करायचा ठरवले. घरात आईला माझा निर्णय सांगितल्यावर आईने मोठा आ करून माझ्याकडे पहिले , मनात म्हणलेलं मला इथे स्पष्ट ऐकू आलं, " सकाळी उठायला तर पाहिजे ना?"

रोज सकाळी माझं वॉकला जाणे म्हणजे माझ्या आईसाठी मोठा अवघड प्रसंग, तिने तीनदा प्रेमाने हाक मारल्यावर चौथ्यांदा पोळ्या लाटताना खोलीत लाटणं आणून माझ्या कमरेत बसेपर्यंत माझी सकाळ होत नाही.
अशी किती लाटणीही तुटलीत. बाबांनी मग माझ्या मॉर्निंग वॉकच्या काळजीपोटी म्हणा किंवा सर्व घराची खाण्यापिण्याची गैरसोय नको म्हणून मंडईत जाऊन एकदम सहा लाटणी आणून ठेवलीत.

अगदी तो मंडईतला लाटणी विकणारा ही बाबांकडे बघून फिदीफिदी हसत म्हणाला "कडक का मऊ देऊ?" आता त्याला बिचाऱ्याला काय माहीत की लाटणी कोणावर तुटतायेत.

असो, तर अशी ही सकाळ झाल्यावर मी मग निवांत गॅलरीत बसून दात घासत बसते, तो सूर्यनारायणही माझ्याकडे बघून कुत्सित हसत म्हणत असेल ,"काय या मुलीला आळस?"

तो उगवेपर्यंत आमची अर्धी कॉलनी फिरून आलेली असते.आणि राहिलेली अर्धी कॉलनी मी निघाल्यावर घरी येत असते. असो, मी काही अश्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष देत नाही.
जनरली लोकं ओळख असल्यावर ज्या प्रकारे हसतात त्या प्रकारे माझ्याकडे हसणारे कमी आणि "अय्या,आत्ता निघतेय बघा ही,अजून अर्ध्या तासांत निघाली असती तर दुपारचं झाली असती" ही भावना ठेवून हसणारे जास्त असतात. त्यांच्या हसण्याने तसा मला फार फरक पडत नाही. लोक उगाच नाव ठेवतात जगात...

म्हणून मग मी ठरवते की उद्या यांच्या आधी निघायचं आणि यांच्या नाकावर(नाही त्या हसणाऱ्या दातांवर) टिच्चून लवकर घरी परत यायचं.म्हणून रोज रात्री अलार्म लावायला मोबाईल घेते तर फोनमधला वॉट्सअप्प नेमका टू टू वाजायला लागतो. आमच्या कॉलेजचा CCP नावाचा ग्रुप सुरू होतो.रोजचं रात्रीच्या अति महत्वाच्या गप्पा असतात. 

रात्री अकराला चॅट जे सुरू होतो ते थेट एक दीड वाजेपर्यन्त चालतच. मेसेजला रिप्लाय करावाच लागतो नाहीतर फोन करून विचारतात, "झोपली का?" फोन उचलल्यावर आता काय हो मी झोपलेय असं म्हणणार काय ?
अरे हो ग्रुप च नाव फुलफॉर्म सांगायचं राहीला CCP म्हणजे (चला चकाट्या पिटुया) असा आमचा सात जणांचा कॉलेजचा ग्रुप आहे .बरं आईबाबांना वाटतं लेक झोपली दहा वाजताच पण चादरी आडून मेसेजिंग सुरू असतंच. खूप गंभीर विषयावर गप्पा असतात ....

जसे कमीतकमी कष्टात अभ्यास करून कसे सहज पास व्हावे? किंवा हुशार चष्मीश सरांच्या लाडक्या मुलांकडून कसे प्रोजेक्ट करून घ्यावेत? त्यांना कश्या नोट्स आपल्याला द्यायला भाग पाडावे ? न जाता एटेंडेंस कसा लावावा ? इत्यादी इत्यादी
जाऊदे तुम्ही म्हणाल मुद्दा काय आहे ? ही बोलतेय काय ? बरोबर आहे तुमचं ...तर मेन मुद्दा काय आहे? मॉर्निंग वॉक ना?
एकदाच सुरू केलं मी मॉर्निंग वॉक . खरं तर खूप प्रसन्न वाटतं लवकर निघाल्यावर,किती तरी आजी आजोबा फिरायला येतात. मला ओव्हरटेक करतात चालताना, पण मी मनावर अजिबात घेत नाही, RESPECT नको का द्यायला मोठ्यांना? संस्कार आहेत हे.

काही जण तर इतकी घाईत निघतात की जणू काही त्यांना बस किंवा ट्रेन गाठायचिये, नुसते घामाने डबडबले असतात. मला नाही हा आवडत इतका घाम आलेला ,आपण कसं सावकाश चालावं,फुलं,पक्षी बघत बघत कसं छान वाटतं.
पण कोणाला याचाही राग येतो,परवा एक काकू मला म्हणतात कश्या "अगं पायाखालच्या मुंग्या मरतील बघ"
मी पहिल्या तर मुंग्या नव्हत्याच तर काकू म्हणाल्या "तुमच्या वयाच्या मुलींनी चांगलं धावावे,पळावे तर बघा.. आजकालच्य मुली म्हणजे ना " त्या उगीचच चिडल्या. पण मी एक शब्द ही वाईट वाटून घेतलं नाही,
रिस्पेक्ट तुम्हाला तर माहितीच आहे.

पण खरी गम्मत मला कुत्रा फिरायला घेऊन येणाऱ्या बायकांची वाटते. तो कुत्रा जबरदस्तीने त्यांना ओढत असतो ,त्या त्याच्यामागून धावत असतात. "Tommy स्लो, वेट" पण टॉमी रस्त्याच्या पलीकडच्या कुत्रीमागे असतो .या आपल्या सगळ्या सूचना देत त्याच्यापेक्षा जोरात ओरडत असतात. शेवटी एक ओरडणं जिंकत आणि शांतता होते. कोणाची ते माहितेय ना..!
मग येताना आईची कामही करावी लागतात दूध आणणे किंवा एखादी भाजी, कडीपत्ता आणणे. तेव्हा जरा चालण्याचा वेग कमी होतो, थांबाव लागत भाजीवाल्यापाशी. 

मग तिथेही काहीजण ही कशी भाजी आणलीय आज तू? जरा ताजी आणत जा, वगैरे असं त्या भाजीवल्याला उगीच ओरडत असतात. मी मात्र तो जी भाजी देतो ती निमूट घेते. तो त्याच्या शेतातून आणतो का? त्यालाही जशी मिळते तशीच आपल्याला देणार ना.
रिस्पेक्ट अश्या लोकांना द्यायला हवा ना?
आता कधी कधी निघते भाजी शिळी किंवा किडकी मग आई परत माझ्या नावाने ओरडते म्हणे " कसं होणार या मुलीचं लग्न झाल्यावर? एक काम नीट करत नाही."
मला प्रश्न पडतो लग्न फक्त घरकामासाठी करतात की काय?
मुलींना राजकुमाराची वैगेरे स्वप्न पडतात पण मला मी भांडी घासतेय आणि अख्ख॰ सासर उभे राहून भांडी कशी निघालीत हे चष्मा घालून तपासत आहेत आणि एखादं भांड जरी खरकटे राहिले तर दणकन माझ्यासमोर आपटतात.अशी स्वप्न पडतात.
पण आईसमोर आपण एक शब्द बोलत नाही , हो तुम्हाला तर माहितीच आहे "रिस्पेक्ट"
बापरे लिहीत काय बसले मी ? अलार्म लावायचा राहिला ना ...
चला उद्याचा अलार्म लावते. शुभ रात्री.
..समाप्त..

©शीतल अजय दरंदळे
aolsheetal@gmail.com



(लेख कसा वाटला? नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा )





x
x
Morning walk, funny

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या