कथा - "हो खंबीर तू"
एक हसतंखेळतं त्रिकोणी कुटुंब,दीपक,दिव्या आणि त्यांची लेक दृष्टी.
दृष्टीच्या शाळेला सुट्टी लागली आणि दीपक, दिव्याने ऑफिस ला सुट्टी टाकून vacation प्लॅन केली. त्यांचं नेहमीचं आवडतं destination गोवा.
गोव्यात खूप मज्जा करून,अनेक फोटो काढून तिघेही अतिशय आनंदात घरी परतत होते. कधी त्यांना वाटलेही नव्हते की ही त्यांची शेवटची पिकनिक असेल.
पण एक ट्रक मृत्यू बनून समोरुन आला. टक्कर इतकी जोरात होती की तिघे उडाले, जोरात जाऊन आपटले. दीपक 3 दिवस मृत्यूशी झगडला पण व्यर्थ.
दिव्या आणि दृष्टी कशाबशा वाचल्या पण दीपकची अकाली exit त्यांना धक्का देऊन गेली. बऱ्याच काळाने त्या उभ्या राहिल्या पण एक मोठा मनावरचा घाव घेऊनच.
कोणी कोणाला कसे समजवावे?कसे सावरावे?
दीपक जाऊन आता पाच वर्षे होऊन गेली. दिव्याने स्वतःला लगेच सावरत नोकरी सुरू केली.
अवघ्या १५ वर्षाची दृष्टी मात्र बाबा गेल्यावर अगदीच कोमेजून गेली. आत्मविश्वास गमावलेली, स्वतः मध्ये हरवलेली,कोणाशी खेळणं नाही , मैत्रिणीबरोबर कामासाठी इतकंच काय ते बोलणं,अगदी एकटी पडली.
शाळा,पुस्तकं आणि तिचं घर..एवढंच ते काय तिचं जग उरलं....
आईशीही मोकळेपणाने बोलणे नाही. पण आईला हरेकप्रकारे मदत करायची. तिच्या कोवळ्या मनाला इतकी समज आली होती. आईचे कष्ट दिसत होते,पण बाबांचे जाणं जणू तिला मुकं करून गेलं होतं. अकाली प्रौढ झाल्यासारखं..
दिव्याला खूप चिंता लागली होती दृष्टीला कसे समजवावे? तिचे अनेक प्रयत्न सुरूच होते. पण अजून वेळ द्यावा तिला सावरायला असे ती स्वतःला वारंवार समजावे.
दिव्या आणि दृष्टी या दोघींचच एक छोटंसं जग झालं होतं.
दिवस जडपणे सरत होते... दीपकची पोकळी परोपरी जाणवत होती.
असेच एके दिवशी दिव्या ऑफिसला गेल्यावर दृष्टी एकटीच असे. दुपारी अभ्यास उरकून ती काही वाचत बसली होती.
तेवढ्यात दाराची बेल वाजली. दृष्टीने दाराच्या की होल मधून पाहिलं कोणी एक तरुण उभा असलेला दिसला.
तिने हळूच दार उघडले,saftey door न उघडता तिने विचारले, "कोण?"
"हाय , मी विक्रम. इथे तुमच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये राहायला आलोय"
हसतमुख चेहरा , थोडेसे विस्कटलेले थोडे लांबच केस, दाढीही वाढवलेली, त्याच्या गोऱ्यापान चेहऱ्याला अगदी शोभून दिसणारी. लाल चेकचा रेड शर्ट बाह्या दुमडलेला,खाली ढगळी 3,4th ब्लू पॅन्ट.
एक मोहक व्यक्तिमत्त्व विक्रम.34,35 वय वर्ष.
पायात चप्पलही न घालता तो हातात पाण्याची रिकामी बाटली घेऊन उभा होता.
दृष्टीला काही सुचले नाही. पाणी नेण्यासाठी तो आला होता. अनोळखी पण शेजारी राहणारा नाही कसे म्हणावे? दार कसे उघडावे? ती थोडी गोंधळली.
"मी बाटली ठवतो बाहेर,आवरून येतो. तू भरून ठेवशील का इथे?" तिचा ताण हलका करत विक्रम हसून बोलला.
तिला हलके वाटले,तिने मान हलवली. तो बाटल्या ठेऊन निघून गेला.
दृष्टीला वाटले,याला कळलं कस मी एकटीच आहे ते? आणि माझ्या मनात कसला गोंधळ उडालाय तो?
आई ऑफिस वरून आल्यावर दृष्टीने विक्रमविषयी सांगितले. दिव्यालाही कुतूहल वाटले.
दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून येताना दिव्या हातात बऱ्याच पिशव्या आणत होती ते पाहून विक्रम पुढे सरसावला आणि पिशव्या दारासमोर ठेऊन निघू लागला.
दिव्याने विक्रमला थांबवत चहा साठी विचारले, विक्रम घरात आला.
पहिल्या भेटीतच त्यांची गट्टी जमली. विनोदी स्वभाव आणि बोलघेवडा विक्रमने पटकन दिव्या आणि दृष्टीशी मैत्री केली.
दृष्टीही तिच्या बाबानंतर बऱ्याच दिवसांनी एक पुरुष आवाज घरात ऐकत होती. आई आणि विक्रमच्या गप्पा ऐकून तिला ही बरं वाटलं.
हळूहळू विक्रमचा नवखेपणा संपला. ते तिघेही एकमेकांच्या घरी ये - जा करू लागले.
विक्रम तर अगदी सहज घरात वावरत होता,दृष्टी आणि त्याचीही चांगली गट्टी जमली. घरात बनवलेले नवीन नवीन पदार्थ विक्रमला मिळत होते. विक्रमचीही खूप मदत त्यांना होत होती.
खूप दिवसांनंतर दृष्टी खुलली होती. दिव्याही हे पाहून आनंदात होती. नकळत दीपक गेल्याचे दुःख त्या दोघी विसरत होत्या.
दृष्टीचा वाढदिवस आहे हे समजल्यावर तर विक्रमने इतकी जय्यत तयारी केली की दृष्टीला विश्वासच बसेना.
कोणीतरी आपल्यासाठी इतकं करतय हे पाहून ती हरखली होती. तो दिवस ही खूप आनंदाने गेला.
दुसऱ्या दिवशी दुपारी दृष्टी घरी असताना विक्रम नेहमीप्रमाणे आला. दृष्टीही शाळेत काय घडलं हे सांगत होती.
पण अचानक आज विक्रम जवळ आला,त्याने दृष्टीच्या कमरेभोवती हात घातला आणि जवळ ओढले.
दृष्टीला हे खूप धक्कादायक होते. त्याची नजर वेगळीच वाटली. तिने त्याचा हात सोडवून पटकन ती घराबाहेर पडली. विक्रमही निघून गेला.
दृष्टीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला खूप धक्का बसला होता. असं का वागला असेल विक्रम? आईला सांगू का,ती दिव्या येईपर्यंत घरात आलीच नाही.
संध्याकाळी दिव्या आल्यावर पाहते तर घरात कोणीच नाही. विक्रमच्या घरालाही कुलूप.
दृष्टी घरी आली, तिला सगळे आईला सांगावेसे वाटले पण ती शांत बसली. आईला परत त्रास व्हायचा.
दृष्टी आतून घाबरली होती, विक्रम दुसऱ्यादिवशी आला नाही.
4,5 दिवस गेले. दुपारी दृष्टी मोबाईलवर काही बघत बसली होती.
विक्रमला कोणी काही बोललं नाही म्हणून त्याचा कॉन्फिडन्स वाढला. तो परत आला.
"दृष्टी सॉरी,त्यादिवशी चुकलो मी. पण तू खूप आवडतेस मला,एकदाच फक्त जवळ ये. तुझी आई मला ओळखते, काही बोलणार नाही ती. तुलाही मी आवडतो ना? मग काही होत नाही"
दृष्टी जोरात ओरडली ," तुला लाज नाही वाटत असं बोलायला?काय समजला होता तुला आम्ही? तुझी अशी नजर,अजिबात आवडत नाहीस मला,निघून जा इकडून"
विक्रम चिडला, "तुला जिवंत ठेवत नाही बघ आता. सगळ्यांना सांगतो. तुझी असली बदनामी करतो की तू इथे राहू शकणार नाहीस." तो ओरडून म्हणाला.
"अरे इतका विश्वास ठेवला तुझ्यावर..का असा वागतोस?" दृष्टी रडतच म्हणाली.
विक्रम एक दोरी घेऊन त्वेषाने जवळ आला. तेवढ्यात बाहेरून पोलीस गाडीचा आवाज झाला.
पोलीस आले, विक्रमला काही कळायच्या आत त्याला पकडले.
मागून दिव्या ही आली. ती अत्यंत घाबरलेली होती ,दृष्टीला पाहताच तिने मिठीच मारली , "ठीक आहेस ना तू बाळा? तू मला काहीच का सांगितले नाहीस? "
"आई तू घाबरशील,म्हणून मी नाही सांगीतले. पण त्या दिवशी विक्रमचं वागणं पाहून मी घाबरले आणि घराबाहेर पडले तेव्हा हे पोलिसकाका बागेच्या बाहेर भेटले. मला रडताना पाहून त्यांनी मला बोलते केले आणि नंबर दिला. 112 app विषयी सांगितले. त्यावर SOS बटन दाबले की लगेच पोलिसांना alert जातो, location ही समजते. हे मला कळले
कधीही फोन कर, त्याला आम्हाला रंगेहाथ पकडले तर शिक्षा होऊ शकते असे सांगितले. आज मी तेच केले, बटन दाबले आणि या काकांनीही मिस कॉल केला आणि पोलीस दहा मिनिटात इथे पोहोचले."
पोलिसिकाका दिव्याकडे बघून "हो,तिने तुमचा नंबर ही आम्हाला दिल्यामुळे आम्ही तुम्हाला बोलावून घेतले..खरंच धाडसी आहे तुमची लेक"
पोलीस विक्रमला बेड्या घालून घेऊन गेले. दृष्टी आणि दिव्या एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या .
दृष्टी आईचे डोळे पुसत " आई आता हे शेवटचे रडणे,आता आपण आहोत एकमेकीसाठी,कोणालाही घाबरायची गरज नाही"
दिव्या दृष्टीचा आत्मविश्वास पाहून सुखावली,अभिमान वाटला तिला लेकीचा.
खरंच आपली लेक मोठी झालीये,खंबीर झालीये.दृष्टीचा जणू नवजन्मच.
दीपक आज असता तर नक्कीच त्यालाही तिचा अभिमान वाटला असता.
तिने देवासमोर दिवा लावला.दोघीच्या डोळ्यात एक नवीन चमक होती.


0 टिप्पण्या
No spam messages please