लेख - अशी पाखरे येती....( Red Whiskered Bulbul)
पक्ष्यांबद्दल आकर्षण सर्वांनाच असते..लहान मुलांना तर आपल्यापेक्षा जास्त असते..अशीच एक बुलबुल जोडी घरात आली..हॉल मध्येच वर एक नकली फुलांचे बास्केट आहे तिथे त्यांना सुरक्षित वाटले असावे तिथे घरटे बांधू लागले. तब्बल ३ दिवस एक एक काडी जमवत घरटे बांधत होते.. खिडकीतून सारखी नर मादा यांची ये जा चालू होती. इवल्याश्या चोचीत काडी आणून व्यवस्थित विणली जात होती. एका कप आकाराचे घरटे तयार झाले ..आणि आश्चर्य म्हणजे एक ही काडी किंवा सुकलेले पान त्यांनी खाली पाडले नाही..
चौथ्या दिवशी एक अंडे घातले. नर आणि मादी दोघेही आळीपाळीने यायचे लक्ष ठेवायला...दुसऱ्या दिवशी मादीने अजून एक अंडे घातले. लालसर अशी छोटी छोटी अंडी...मग सुरु झाले उबवणे...मादी तासनतास अंड्यावर बसून असायची...नराची येऊन खाऊ घालायची जबाबदारी.. त्यांच्यासाठी आम्ही खिडक्या २४तास उघडी ठेऊ लागलो..मुलांचे सारखे लक्ष असायचे..इतकं कुतूहल असायचं, सकाळी उठल्या उठल्या पिल्लांचा आवाज येतोय का? याचा कानोसा घ्यायचे..."कधी पिल्लं बाहेर येणार?" असे सारखे प्रश्न विचारायचे...ऑनलाईन शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांना, मित्रांना सांगूनही झाले की आमच्या घरात घरटे बांधले आहे आणि लवकरच पिल्ले येणार आहेत..
आणि अखेर तो आनंदाचा क्षण आलाच. तब्बल १५ दिवसांनी सकाळीच दोन्ही पक्षांची बरीच लगबग सुरू झाली..रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं जाणवत होते...पिल्लांचा कोवळा आवाज कानात आला आणि पिल्ल अंड्यातून बाहेर आलीत यावर शिक्कमोर्तब झाले. मुलं आनंदाने उड्या मारू लागले...दोन्ही आजींना,आजोबांना, मामाला मुलांनी लगेच फोन केले, "आजी पिल्लं अंड्यातून बाहेर आलीत, आमच्या फॅमिलीत आज ८ मेंबर झाले...आम्ही ४ घं आणि बुलबुल पप्पा, आई, आणि २ पिल्ले..ते चौघे आणि आम्ही चौघे" मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता...
मग त्यांनी नवीन जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली की पिल्लांचे आता रक्षण करायचे..पिल्ल झाल्यावर दोन्ही आईबाबा बुलबुल यांना बऱ्याच फेऱ्या वाढवाव्या लागल्या.. पिल्लांना भरवायला चोचीत छोट्या अळ्या, किडे , फळांचे दाणे आणले जाऊ लागले..पिल्ल चिवचिवाट करत खायचे आणि. मग झोपून जायचे...तोपर्यंत बुलबुल आई बाबा बाहेर जाऊन खाऊन यायचे...आम्ही ही खिडकीत फळं आणि पाणी ठेवायचो...तेही खाऊन व्हायचे...
त्याचा आवाज तर कानात इतका ओळखीचा झाला होता...कधी कधी मोठे पक्षी ही खिडकीत यायचे.. पिल्लं झालीत हे त्यांना कळले असावे...पण आम्हाला पाहून ते आत यायची हिंमत करत नव्हते..मुलं सगळी वित्तंबातमी शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या त्यांचा मैत्रिणीला सांगायचे..त्यांच्या खिडकीतल्या गप्पा ही सकाळ संध्याकाळ रंगू लागल्या....त्यांना त्रास न देता फोटो काढायचे तंत्र मलाही लवकरच जमू लागले...सकाळी ६ वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस संध्याकाळी ६.३० ला संपायचा. आळीपाळीने नर मादी पिल्लांना भरवयचे. रात्री पिल्ले आणि आई घरट्यात च असायचे..
तिसऱ्या दिवशी रात्री अचानक मादी उडू लागली, पिल्ले खूपच आवाज करत होते... मादी बाहेर जाऊन लगेच परत आत येत होती. कदाचित अंधारात तिला बाहेर काही मिळत नव्हते...आम्हाला वाटले पिल्लांना खूप भूक लागली आणि मादीला बाहेर जाऊन आणताही येत नव्हते...मी लगेच बारीक पोळीचे तुकडे ठेवले. नर बुलबुल ही थोड्याच वेळात आला. दोघेही बाहेर उडून गेले.. पिल्लं बराच वेळ आवाज करत होते...आणि नर मादी दोघेही बाहेर...आमची नुसती घालमेल,,काय झाले असावे इतक्या रात्री? का असे उडून गेले? पिल्ल एकटी का राहिली? मुलं तर थोड्यावेळाने रडू लागले, त्यांना वाटले पिल्लांना काहीतरी ईजा झाली आणि त्यांचे आईबाबा त्यांना कायमचे सोडून गेले...आम्ही दोघांना समजावले आणि पण बिचारे रडत रडतच झोपून गेले...सकाळी ६ वाजता जेव्हा रोजचा चिवचिवाट सुरू झाला तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले..
..एक नविन बदल आमच्याकडे असा झाला की सकाळीं उठायला आम्हाला वेगळा अलार्म लावायला लागत नव्हता.. त्यांचा आवाज झाला की कळायचेच किती वाजले असतील ते....
हळूहळू पिल्ल मोठी होऊ लागली, आणि त्यांचे खाणे ही वाढू लागले..मोठे मोठे किडे आता बुलबुलच्या चोचीत दिसू लागले जसे फुलपाखरे, भुंगे, नाकतोडे, चतुर, मधमाश्या असे बरेच... घरात फिरणारे किडेही ते खाण्याचा प्रयत्न करत होते..शिकार बघायला खूप गंमत वाटायची..उंचावर असल्याने आम्हाला पिल्ले फारसे दिसत नव्हते पण. काही दिवसांनी त्यांची चोच दिसू लागली.. त्यांचे भरवणे बघताना आई जशी लहान बाळाला हाताने भरवते तसे ती आई चोचीने भरवतेय असेच वाटायचे.
जवळपास महिना होत आला...पिल्लांना पंख फुटले, ते घरट्यात च पंख फडफडवून तयारी करत होते. आम्हाला कळून चुकले की आता पिल्ले घरटे सोडणार... वाईट वाटू लागले...महिन्याभराचा सहवास...सवय झाली होती..लळा लागला होता.. उडण्याच्या एक दिवस आधी नर बुलबुल आमच्या खूप जवळ येऊन आम्हाला घाबरवू लागला... पिल्ले उडल्यावर आम्ही त्यांना ईजा करू नये म्हणून करत असावा...अखेर एक पिल्लू उडाले खिडकीच्या बार वर बराच वेळ बसून होते.. नर मादी आले आणि ते तिघे झाडामध्ये अदृश्य झाले दुसऱ्या पिल्लाला बराच वेळ लागला..ते उडाले पण भिंतीला धडकले आणि टेबल वर येऊन बसले.. अखेर मादीने आवाज दिला आणि ते ही बाहेर पडले...उडून गेले...
घरटे रिकामे झाले, घर शांत झाले...मुलांच्या डोळ्यात पाणी आले...खिडकीत बसून ते बराच वेळ पक्षी दिसतात का ते पाहत होते...मी मुलांना समजावत राहिले.. त्यांना रडू दिले..एक नातं निर्माण झाले होते तर थोडा त्रास होणारच... मुके पक्षीही किती जीव लावतात.. असा हा महिन्याभराचा सोहळा आम्ही अनुभवला...आणि अखेर तो संपलाही...पण खूप साऱ्या गोड आठवणी देऊन..
शेवटी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेल्या ओळी आठवतात..
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
...समाप्त...


0 टिप्पण्या
No spam messages please