लेख - अन्नाचं पुर्णब्रम्हत्व
पुणे महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी रोज दारावर कचरा उचलायला येत असते. छोटा टेम्पोच आहे तो. पुढच्या बाजूच्या ड्रायव्हरच्या सीटवर शर्टाची पुढची बटणे उघडी ठेवून ड्रायव्हर त्याचा टेम्पो वळवून बिल्डींगच्या फाटकाबाहेर थांबायचा आणि त्याच्या फाटक्या आवाजात जोरात ओरडायचा "कचssssरा". दोन तीन हाका मारल्यावर तो टेम्पो कोपऱ्यावर लावून त्याच्या हातावर तंबाखू मळायला घेई.
बिल्डींगचे वॉचमन मग ओला आणि सुका कचऱ्याचे भरलेले डबे ओढत त्या टेम्पोपर्यंत नेत.
टेम्पोच्या मागच्या उघड्या भागात एक १२,१३ वर्षांचा काळा सावळा मुलगा एक अतिशय मळकी टोपी घालून उभा असे, अर्धी चड्डी ,वर निळा ठिगळं जोडलेला चौकटीचा शर्ट,पायात चप्पल बर्याचदा नसेच.
दोन्ही पाय तो कचऱ्यात रोवून उभा असे. वॉचमनकडून भरलेल्या कचर्याचे डब्बे ओतून घेऊन तो रिकामे डबे परत वॉचमन देत असे. मग त्या ढीगातून प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करायला घेई. खाण्याच्या काही पिशव्या असतील तर तो वेगळ्या पिशवीत भरून ठेवी.
मग ड्रायव्हरची तंबाखू चोळून,तोबरा भरून झाल्यावर गाडी निघे पुढच्या सोसायटीत. त्या मुलाचं परत तेच काम.
काही दिवसांनी ड्रायव्हर जर निवांत दिसला. ,तो मुलगाही बराच वेळ काम उरकून टेम्पो कधी निघतोय याची वाट पाहत टेम्पोच्या एका पत्र्याच्या दाराला खेटून उभा राहिला होता.
मी खाली निघाले,आज जास्तीची भाजी आणि चपाती केल्याने मी ती पिशवीत भरून खाली आणली होती. कदाचित त्या मुलाला उपयोगी पडेल असे वाटलं.
त्याला पोळी भाजी दिल्यावर तो हसला. अन्न ताजे आहे हे ऐकल्यावर तो चक्क खुश झाला.डोळे चमकवून त्याने पटकन ते त्याच्या खिशात टाकले. मी आश्चर्याने त्याच्या या कृतीकडे पाहत राहिले.
त्याला विचारले,"का रे? तू असं लपवलस का?"
"ताई खूप दिवसांनी ताजं अन्न खायला मिळणार आहे"
आता हे ऐकून आश्चर्य होण्याची माझी पाळी होती.
"म्हणजे?" मी त्याला विचारलं.
"ताई,आमचं पोट रोज या पिशवीत मिळालेल्या, राहिलेल्या अन्नातूनच भरतं " खिन्न आवाजात तो मला म्हणाला.
"तू शाळेत जात नाहीस का?" मी परत त्याला विचारलं.
"जातो ना! आता घरी गेल्यावर आम्ही या खाण्याच्या पिशव्या बघतो. त्यात असलेल्या खाण्याचा कुबट वास नसेल किंवा आंबल नसेल ते अन्न गरम करतो. कधी भाकरी ,चपाती मिळते किंवा मग शिजवलेल्या भाताबरोबरच खातो"
"पण तुला पैसे मिळतात ना ? तू काम करतोस. अन्नसाठी पैसे नाही उरत काय ?"
" दिवसाला ५० रु. फक्त. सकाळी ६.३० ला निघतो, घरी पोहोचेपर्यंत १०.३० होतात. लगेच खाऊन मग शाळेत जावं लागतं"
" आई वडील काय करतात तुझे?" मी न राहवून विचारलं.
"आई रोज सकाळी रस्ते झाडते. महापालिकेचं काम आहे तिचपण. बाप दारू पिऊन घरात पडलेला असतो. मला तीन लहान भावंडही आहेत. आईकडून पैसे घेऊन बाप दारूत उडवतो. मारझोड करतो. मी काम करतो त्याला माहित नाही. आईचे आणि माझ्याकडचे पैसे कसे बसे साठवून आई घर चालवते . पैसा उरतच नाही "
"तुला अभ्यास करायला वेळ कधी मिळतो?"
" मी अभ्यास शाळेतच करतो. घरी आल्यावर परत संध्याकाळी भावंडांकडे पाहावं लागतं. बाप नाही आला तर शोधावं लागत.आई म्हणते तो सुधारेल कधी ना कधी,शेवटी आपलाच आहे तो, कधी जर काही खायला मिळालं नाही तर,उपाशीच झोपावं लागत ,पाणी पिऊन"
"मोठा होऊन तुला काय बनायचं आहे?"
"ताई मला हॉटेलच काढायचं आहे. सगळ्यांच पोट भरायचं आहे, अगदी माझ्यासारखे खूप जण आहेत. त्यांना ही मला पोटभर जेवायला घालायचं आहे"
इतक्यात ड्रायव्हरने गाडी सुरू केली,
" दोन मिनिटं थांब" असं सांगून मी वर गेले.केलेलं सर्व जेवण मी पिशवीत भरलं,बास्केटमधली फळही भरली.
खाली गेले आणि त्याला दिली.
" ताई,एवढं नको अहो...रोज सवय लागली तर शिळं कसं खाणार?"
त्याच्या प्रश्नाने माझ्या पोटात खड्डा पडला.
"माझा वाढदिवस आहे म्हणून घे,नाही म्हणू नकोस"... मी आग्रहच केला.
त्याने ऐकलं , तो समाधानाने हसला. टेम्पो आवाज करत परत पुढच्या सोसायटीकडे निघाला.
"अन्न हे पूर्णब्रह्म" हे कितीदा आपण वाचतो,शिकतो,लिहितो. पण आज मला याची लख्ख जाणीव झाली. तोंडात अन्नाचा घास घालताना मला जाणवले, या अन्नाची खरी किंमत ही फक्त त्याच्या मोजमापावर अवलंबून नाही तर ते कसे कोणाच्या पोटात जाते यावरही अवलंबून असतं . खऱ्या गरजूच्या पोटात हे अन्न जर आपल्याला पोहोचवता आलं तर?
रोज जेवतानाही एकही कण न वाया घालवता आपण सगळेही खरंच अन्नाला पुर्णब्रम्हत्व देऊयात का?
तुम्हाला काय वाटतं ?
...समाप्त..
©शीतल अजय दरंदळे
aolsheetal@gmail.com
(लेख कसा वाटला? नक्की कळवा कमेंटमधून...आवडल्यास "शीतलच्या शब्दांत " पेज नक्की like/follow करा )


0 टिप्पण्या
No spam messages please