*****************************************
'ऐक ना' त्याचे डोळे तिला खूप वेळ काही सांगू पाहत होते. आणि तिला सगळे समजूनही ती अबोल होती.
एवढ्या मोठ्या कुटुंबात आलेली ती नवी नवरी...मनात दडपण, नात्यांचे अनोळखी चेहरेन्याने पुरती भांबावून गेली होती. हातातल्या हातात पद राशी चाळे करत भिंतीला हलकेच टेकून उभी होती. नवविवाहित जोडी राधा आणि रमण..
" रमण उद्या.सकाळीच मुंबई ला जा मालाची डिलिव्हरी घेऊन ये" अण्णांचा रमणला आदेश येतो.
"अहो असं काय करता? आताच लग्न झालंय त्याचं, दुसऱ्या कोणाला तरी पाठवा" माई अण्णांना विचारतात.
"लग्न झालं मग बायकोला डोक्यावर घेऊन नाचायचं आहे का दिवसभर?, कामधंदा नको का करायला?"
अण्णा डोळे वटारुन मोठ्या आवाजात ओरडतात....
रमणच्या धाकट्या बहिणी रेणू आणि वंदू मध्ये खसखस पिकली.
" जातो अण्णा, सकाळी पहिल्या ST ने " रमण ने नाराज होत आज्ञा पाळली..
रेणू,वंदू राधा वहिनीला धक्का देत खुदू खुदू हसत होत्या.. राधा बावरली..
सगळ्यांची जेवण उरकले.. रमण राधाच्या जवळ येऊन हळूच म्हणाला, "लवकर ये वर , वाट पाहतोय". राधा लाजून हसली.
"रमण तयारी करतोस की नाही उद्याची? इकडे ये मी यादी देतो ती एकदा तपासून घे" अण्णांची हाक, रमण पटकन बाहेर पळतो..
"वहिनी तू राहुदे सगळ काम, आम्ही करतो..तू जा माळ्यावर. तयारी कर" रेणू,वंदू कडे बघत राधाला म्हणते. दोघींमध्ये परत खसखस..
" वंदू, रेणू काय चालू आहे तुमचं दोघींचं? राधाला त्रास देऊ नका उगीच...राधा तू आवरलं असेल तर जा हो...दमली असशील" राधा काही न बोलता पटापट आवरायला लागते.. सगळं आवरूनच जायचं ती ठरवते...
रमण अण्णा सोबत यादी करायला बसतो..पण त्याच सगळ लक्ष माळ्यावर जाणाऱ्या जिन्याकडे..राधाच्या आधी वर जायला हवे.. भरभर आवरून तो अण्णांना म्हणतो, "अण्णा आलय लक्षात सगळं, झोप येतेय.. खूप मी जाऊ का?" तरीही अण्णा एकदा यादी परत वाचायला सांगतात.. रमण वाचून झाल्यावर भरभर सर्व आवरून माळ्यावर पळतो..
लग्न, नंतर पूजा, देवदर्शन झाल्यावर आज पहिल्यांदाच राधा येणार..पहिली रात्र... रमणच्या पोटात गुदगुल्या होतात..आज पहिल्यांदा इतका वेळ देता येणार..नाहीतर लग्न ठरल्या पासून कधी निवांत बसून बोलताच नाही आलं...राधा पहिलच स्थळ, तिला पाहिल्यावर त्याच्या मनात बसली..तिचे सोज्वळ रूप पाहून त्याने लगेच पसंती सांगितली.. अण्णांनी बाकीची सगळी माहिती पाहिलीच होती. टिळा झाला आणि लग्नाचा मुहूर्त ही लगेचच ठरला.. रमण ला राधाशी खूप बोलायचय तीच्या गोष्टी ऐकायच्यात ..तो गाद्या , उशा नीट लावून ठेवतो. पेटीतल्या अत्तराची कुपी उघडून हाताला लावतो.. सगळ लक्ष आता दाराकडे ..अधीर होऊन राधा कधी येणार याच्याकडे....
राधाला सगळ आवरायला बराच उशीर होतो...माई शेवटी तिला दटावून च वर पाठवतात.. ती हातात तांब्या भांड घेऊन मलयार येते... सगळीकडे बघून टेबलावर तांब्या भांड ठेऊन देते.. रमण तिच्याकडे हसून बघतो...ती ही हसते...साडी नीट सावरून बसते... रमण तिच्याजवळ येतो आणि विचारतो..
"दमलीस का खूप?" राधा मानेने नाही म्हणते..
"तू काही बोलत का नाहीस?" रमण तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो
"असं काही नाही" राधा नजर चुकवत वळून म्हणते
"तुझा आवाज येतच नाही मला घरात, फक्त बांगड्यांची किणकिण आणि पैंजणांचा आवाज याने ओळखतो मी"
राधा गोड हसते..
"तू खूप गोड हसतेस, बैस इथे माझ्या जवळ" रमण राधाला बसवत म्हणतो.
"अय्या, तुमच्यासाठी दूध आणायचं राहिलं ना, आता जाऊन आणते पटकन" राधा उठते.. रमण मागून पटकन तिचा हात धरतो..राधा लाजून गोड हसते.
"मला नकोय दूध, मला तू ......." राधा हात सोडवून घेते...
"मला माईंनी सांगितलय तुम्हाला गरम दूध लागत झोपण्यापूर्वी, त्यांना कळल तर?" राधा विचारते...
"तू सगळ्यांना इतकी का घाबरतेस? जाच करते का माई तुला?"
"अहो नाही नाही, मला फक्त अण्णांची भिती वाटते"
"अण्णा मनाने खूप चांगले आहेत..पण खूप शिस्तीचे आहेत, त्यांना गोष्ट वेळच्यावेळी लागतेच..काम वेळेतच झालं पाहिजे, वाणी कडक आहे पण हृदय मृदू आहे"
"बरं" राधा जांभई देते... रमण हसतो..
"झोपतेस ? झोप ...खूप दमली आहेस" राधा ला जवळ घेत तिच्या केसांमधून हात फिरवत विचारतो..
"तुम्ही मुंबईला निघणार ना सकाळी? परत कधीं येणार?" राधा मिठीत जात रमण ला विचारते..
"तुला सोडून जावंस नाही वाटत अजिबात,, पण संध्याकाळी एक ST असते लगेच परत येतोच.. तुला काय आणायचं सांग मला " रमण तिला अजून जवळ ओढत म्हणतो.
"मला काही नको तुम्ही सुखरूप परत या"
राधा गोड हसते, तिचे गोरे गाल लाजून गुलाबी होतात.. रमण दिवे मालवतो..
तेवढ्यात दार वाजलं, वंदू असते. अण्णांना जरा त्रास होतोय,,येतोय का खाली? रमण तातडीने खाली जातो..त्यांना ताप आला असतो. रमण घरात काही गोळी बघतो.आणि त्यांना देतो..ताप उतरेपर्यंत तो त्यांचे पाय दाबतो. परत माळ्यावर येईपर्यंत राधाला झोप लागली असते.. रमण तिच्या अंगावर पांघरूण टाकतो आणि तोही झोपतो..
पहाटेच रमणला जाग येते. तो भरभर आवरून निघताना राधाला एकदा पाहतो.. ती सप्नांच्या दुनियेत हरवलेली असते , गाढ झोपेत तिचा चेहरा त्याला अजून सुंदर वाटतो...तो नाईलाजाने निघतो..अण्णांना सांगावं आज नाही जात असे त्याला वाटतं पण तो विचार सोडून देतो आणि जडपणाने पाय घराबाहेर टाकतो..
राधाला अण्णांच्या आवाजाने जाग येते. तिला इतका वेळ झोपून राहिलो म्हणून खूप ओशाळल्या सारखे वाटते...ती पटापट आवरून खाली उतरते...
"नवीन सून बाईंना सांगा, आपल्याकडे इतक्या उशिरा नाही उठत. त्या रमणने अर्धा रस्ता पार केला असेल" अण्णा माईना मोठ्या आवाजात म्हणतात..
राधा खूप घाबरते, माई तिला डोळ्यांनीच शांत राहण्यास सांगतात.. वंदू आणि मंजू राधा आत आल्यावर तिला चिडवून चिडवून खूप हसवतात... राधाचा सगळा ताण क्षणात हलका होतो...तिचे डोळे आता फक्त रमण येण्याची ,संध्याकाळची वाट पाहत असतात..
संध्यकाळची वेळ सरून जाते.. रमण आलेला नसतो..राधा वाट पाहून कासावीस होते, अण्णा ही अंगणात येरझाऱ्या घालत असतात..माई राधाला देवाजवळ दिवा लावायला सांगते. इतक्यात गणू घाबरा घुबरा होऊन धावतच येतो आणि ओरडतच म्हणतो, "" अण्णा घात झाला, मुंबई च्या ST घाटात अपघात झालाय..""
हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो..राधाच्या डोळ्यासमोर तर अंधारी येते.. ती चक्कर येऊन पडते..वंदू तिला सावरते..अण्णा माई जागच्या जागी सुन्न होऊन बसतात..गणू म्हणतो, "बरेच प्रवासी अडकलेत, किती वाचतील सांगता येत नाही, बस दरीत कोसळली" माई रडू लागतात.. अण्णाच्या डोळ्यात पाणी येतं त्यांना काही सुचत नाही..त्यांचे मित्र धावत येऊन अण्णांना स्टँड वर निघण्यास सांगतात..अण्णा आणि त्यांचे दोन मित्र स्टँड ला जाऊन माहिती देऊन घरी येतात..राधा धक्यामुळे पडूनच असते..मंजू उंबरठयावर भांड पालथं करुन ठेवते.
रात्री उशिरा कोणाची तरी चाहूल लागते.. " राधा" करत रमण धावतच आत येतो...अण्णा माई वंदू मंजु आनंदून जातात..आई रमणला जवळ घेते..त्याची नजर काढते...रमण राधाकडे धावतो...तिला खूप हाका मारतो.."मी आलोय ऊठ, मला काही नाही झालं"
राधाला रमणचा आवाज येतो आणि ती कशीबशी उठते.. तिचे डोळे आनंदाश्रु नी भरून येतात..ती रमण ला घट्ट मिठी मारते. आणि बराच वेळ रडत राहते, रमण तिला प्रेमाने थोपटत राहतो..
अण्णांचा बाहेरून आवाज येतो, " सूनबाई उठल्या असतील तर बाहेर येता का सगळे? रमण ला काही खाऊ पिऊ घालाल की नाही?"
अश्रू पुसून राधा उठते, रमण अण्णा जवळ बसतो, अण्णा मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. माई जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवतात.. सगळे शांत असतात, मनावरचे खूप मोठे ओझे उतरले असते...
खाऊन पिऊन झाल्यावर अण्णा रमण ला सविस्तर काय नेमके झाले हे विचारतात...सगळे रमणच्या भोवती बसतात..
"अण्णा खर तर मी मुंबईला गेलोच नाही.. काल खूप उशीर झाला रात्री आणि सकाळी निघालो, ST बस मध्ये बसलो पण मन लागत नव्हतं, सारखं घरी यावस वाटत होत..मग पुढच्या स्टेशनलाच उतरलो.. तिथे आपल्या दुकानाची कामं होतीच..ती करुन घेतली..आत्याकडे गेलो तिने थांबवलं...तोपर्यंत संध्याकाळ झाली...मग निघालो इकडे यायला.. बसस्टँड वर आलो तिथे कळलं ST बस ला उशीर होणार आहे, पुढे अपघात झालाय... मग आम्ही सगळे धावलो, मदतकार्य सुरू केलं... सगळं होईपर्यंत खूप उशीर झाला. मग लक्षात आलं की तुम्हाला मी अपघातात सापडलो असं वाटल असेल. मग तडक एका जीप मधून इथपर्यंत पोहोचलो.."
"देवच पावला रमण" माई हाताचा नमस्कार करत म्हणतात..
"माई देवाची कृपा आहेच पण खरंतर दादाचा जीव वहिनी मुळे वाचला..तिच्या आठवणी मुळे तो मागे फिरला असणार नक्की" मंजू रमण कडे बघत म्हणते.. रमण राधा कडे बघत एकदम हसत इकडेतिकडे बघायला लागतो..राधा गडबडते..
"अरे तुझा खरतर कान धरला असता, काम न करता असा घरी आला असतास तर" रमण अण्णा ओरडतील म्हणून घाबरतो...सगळे एकदम शांत होतात..
काही क्षणात अण्णा मोठ्याने हसतात आणि म्हणतात, " आज गोडधोड करा बरं जेवणात...राधा च्या आवडीच सगळे पदार्थ करा... घरच्या लक्ष्मीने आज मोठ्या संकटापासून वाचवले आहे..देवाला नैवेद्य ही करा"
अण्णांचा बदललेला सुर बघून सगळे हसतात..
राधा च्या डोळ्यात पाणी येतं, ती आणि रमण अण्णा माईंच्या पाया पडतात..त्यांना भरभरून आशिर्वाद देतात. जेवण आटपून राधा रमण माळ्यावर येतात..
रमण गुलाबाच्या पाकळ्या तिच्या अंगावर उधळतो.. राधा धावतच येऊन त्याच्या मिठीत शिरते..तो जवळ घेऊन म्हणतो, " आम्हाला माहीत नव्हतं कोणी इतकं प्रेम करत माझ्यावर"
" काही गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या" राधा रमणला म्हणते...
रमण हसतो "अस्स , पण आज मी म्हणतो तू मला खूप आवडतेस , मला अशीच आयुष्यभर साथ दे ". राधा रमणच्या डोळ्यात डोळे घालून त्याला वचन देते...रात्रभर प्रेमाची उधळण होते.. दोन्ही जीव खऱ्याअर्थाने आज एकजीव होतात...
....समाप्त.....
©️ शीतल अजय दरंदळे
( मागच्या काळातली कथा जेव्हा मोबाईल स्मार्टफोन नव्हते...जीवन फार साधं होतं.... कशी वाटली ही प्रेमकथा ,,नक्की कळवा)


0 टिप्पण्या
No spam messages please