कथा - तिची ओळख
**********************************
"चला चार ची वेळ झाली, चहा ठेवायला हवा" रोहिणी रितिकासोबत गप्पा अर्धवट टाकत उठली.
"अग ताई थांब की,, आता तीनला तर निवांत झालीस... नंतर चहा करू, बस जरा गप्पा मारू, वर्षाने भेटतोय जवळजवळ" रितिका रोहिणीला थांबवत म्हणाली.
" नाही ग, तुझ्या दाजीना चार च्या ठोक्याला चहा लागतो, फळं ही कापून ठेवते. नंतर कविता येईल कॉलेज मधून तिलाही चमचमीत खायला लागत काहीतरी, ध्रुवला पण क्लास ला जायचं असतं" रोहिणी वेळापत्रक सांगत राहिली.
रोहिणी पन्नाशीच्या आसपास आलेली गृहिणी. मुलगी कविता,मुलगा ध्रुव व निवृत्त पति यांच्यासोबत सुख वास्तू कुटुंबातली ग्रुहिणी. तिचं आयुष्य म्हणजे तिचं घर आणि कुटुंब. सगळी कामं आपण हातानं करायचं हा अट्टाहास. तब्येतीची कोणतीही कुरबुर आली तरीही घरगुती औषधोपचार करून संपवायची. कधी कोणी बोलावले तरी बाहेर जायचं नाही. फक्त लग्नकार्य, नातेवाईकांची भेट होत असे..आणि नेहमीचा बाजारहाट..स्वच्छतेची अत्यंत आवड.
रितिका ही रोहिणी ची धाकटी बहिण, वयात चार पाच वर्षाचे अंतर असेल. तिच्याकडे अधूनमधून राहायला यायची. तिला खूप बहिणीची काळजी वाटायची,.कशी ही ताई अशी स्वतःला गुरफटून घेते? कधी मोकळी राहत नाही. अगदी दमून जाते एकटी करून सगळं.
पण रोहिणी कधी ऐकायची नाही. गरमगरम पोळी तव्यावरून थेट ताटात पडली पाहिजे. सकाळ संध्याकाळ वेगवेगळा स्वयंपाक. कोणाचीही मदत तिला आवडायची नाही. सगळ्यांची जेवण झाल्यावर सगळ आवरून शेवटी ही जेवायला बसायची. प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या, नाष्टाचे निरनिराळे प्रकार. अगदी चहाही.. दाजींना बिनसाखरेचा, कविताला कॉफी, ध्रुवला मिल्कशेक ...आणि यांच्यात जे जास्त बनेल ते ती प्यायची. तिला स्वतः ची अशी आवड नव्हतीच जणू.
मध्यंतरी पाठीचे ऑपरेशन झाल्याने भांड्याला तरी कामवाली बाई ठेवली होती. पण बाकी सगळ ही जातीने करायची. सारखं झाड लोट, ओटा धुणे, कपाट आवरणे. स्वच्छ असलेले घर अजून कसे लखलखीत करायचे यासाठी ही झटायची.
आता रितिका आली म्हणून तिला तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात ती व्यस्त. तिला काय खायचं काय नाही यासाठीच तिची गडबड. रितिका तिला सांगायची," ताई जरा निवांत बस ग, बोलू निवांत. रात्री ही इतकी थकतेस की लगेच झोपून जाते..तुझ्याशी बोलायचं असत खूप काही, तुझ्याही मनातलं ऐकायचं असतं...काही क्षण थांब की, काही पदार्थ करू नकोस, नुसती खिचडी टाकलीस तरी पुरे आहे.."
" अग तू काय किती वर्षांनी येतेस राहायला इथे, तुझी आवड नको का जपायला? तुझ्या घरी तू सगळ करून दमतेस ना..मग इकडे फक्त आराम करायचा..राहणार आहेस ना चार दिवस मारू की गप्पा निवांत" रोहिणी तिला समजावत म्हणाली.
पण तो निवांत वेळ कधी यायचाच नाही. रीतिकाला खूप वाईट वाटायचं. भले ताई सगळं आवडीने करते पण स्वतःकडे काही लक्ष देतच नाही.. ही कुठल्या मैत्रिणींना भेटतही नाही कारण मग घरचं टाइमटेबल बिघडेल..
यावेळी रितिका काहीही करून ताईला समजावून सांगायचेच असा विचार पक्का करून आलेली..तिने ताईच्या मैत्रिणीच्या ग्रुप ला कॉन्टॅक्ट करून सगळ्यां ना एकत्र बोलावले होते. पाचजणी तरी जमणार होत्या. एका हॉटेल चे बुकिंग केले होते. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चा भेटीचा कार्यक्रम होता. पण रोहिणीला तिने आधी काहीच सांगितले नाही.
ठरलेल्या दिवशी रितिका ने काहीतरी कारण काढून रोहिणी ला बाहेर नेलं. रोहिणी वारंवार विचारत होती '"खूप उशीर तर नाही होणार ना? घरच्यांना लागतं माझ्या हातचं सगळं..., त्यांची तारांबळ नको व्हायला मी नसल्याने, बिचारे दमून येतात"
रितिका ने सांगितलं "तुला surprise आहे ताई. आणि आता आपण बाहेर पडलोय ना, घरची काळजी करू नकोस"
दोघीनी आधी शॉपिंग केले, रितिकाने रोहिणीला ला छान तयार केले. तिने जेव्हा स्वतःचं रूप आरश्यात पाहिलं तेव्हा तिला स्वतःलाच आश्चर्य वाटले. अश्या छान आपण तयार झालोच नाही कितीतरी दिवस, खूप मस्त वाटतय...रोहिणी मनोमन आनंदली..
मग दोघी फिरत ठरलेल्या हॉटेल ला पोहोचल्या, रोहिणीच्या मैत्रिणी आल्याच होत्या. सगळ्यांनी रोहिणीला पाहून एकच जल्लोष केला..
रोहिणी ही खूप खुश झाली. इतक्या वर्षांनी शाळेतला ग्रुप भेटल्यावर किती बोलू न किती नको असं होऊन गेलं सगळ्यांना..रोहिणी वरचेवर भेटत नाही म्हणून तक्रार ही करत होत्या मैत्रिणी...पण रोहिणी फक्त हसून विषय बदलत होती.. सगळ्यांची जेवण झाली. पोटभर गप्पा झाल्या..रोहिणी घरची कामं साफ विसरली होती..खूप मनापासून त्यांच्यात सहभागी झाली होती हे पाहून रितिकाला ही खूप बरं वाटलं..कितीतरी दिवसांनी ती इतकी निवांत व बिनधास्त बसलेली वाटली. संध्याकाळ उजाडली आणि रोहिणीला लक्षात आले आपण बराच वेळ बाहेर आहे. ती पटकन उठून उभी राहिली आणि तिची घरी जायची गडबड सुरू झाली.. सगळ्या मैत्रिणी ही निघाल्या..
रोहिणी आणि रितिका रिक्षात बसल्या, रोहिणीच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती..
"ताई, मजा आली ना? मग इतकी कशाची काळजी करतेस, जाऊ घरी आपण"
" अग किती वाजलेस पाहिलं का? घरचे वाट पाहत असतील. तू आधी सांगितल असतस तर सगळी तयारी करून आले असते मी, हे अचानक ठरलं. ध्रुव, कविता कॉलेज हून केव्हाच आले असतील..बिचारे खोळंबले असतील,मी नव्हते तर..."
"पण मग तुला माझं surprise नाही आवडल का?" रितिका ने खटटू होऊन विचारले.
"अग नाही गं, उलट इतक्या वर्षांनी मैत्रिणींना भेटले तर किती छान वाटल खरच, थँक्यू" रोहिणीचा खुललेला चेहरा पाहून रितिका ही खुश झाली.
घर जवळ आल्यावर रोहिणी आणि रितिका लगबगीने निघाल्या. बेल वाजताच ध्रुव ने दार उघडले. आतल चित्र पाहून रोहिणी ला अजून धक्का बसला.
कविता आणि दाजी किचन मध्ये काम करत होते, ध्रुव बाहेर उकडलेले बटाटे सोलत होता.. किचन मध्ये पसारा होता. पण सगळे उत्साहात तयारी करत होते.
" ये रोहिणी, दमलीस का गप्पा मारून, थोड्यावेळात स्वयंपाक तयार होईल..पुऱ्या गरमागरम सोडतोच बघ" दाजी रोहिणीकडे बघत म्हणाले.
"अहो, थांबा, मी करते पटपट, तुम्ही व्हा बाजूला सगळे" रोहिणी सगळ्यांना म्हणाली.
"अजिबात नाही आई, मी करतेय ना सगळं.. आज तुझ्या ताटात आम्ही गरमागरम वाढणार.. तू आणि मावशी फ्रेश व्हा आणि बसा निवांत, आज खूप मजा येतेय आम्हाला" सगळे हसले, ध्रुव बटाटे घेऊन किचन मध्ये गेला..
रितिका रोहिणीला ओढतच आत घेऊन गेली..
"अग बघ, सगळ त्यांना करावं लागलं, मी नव्हते ना" रोहिणी अपराधी स्वरात म्हणाली.
"ताई, relax. सगळे आनंदात करत आहेत, तुला कोणीही तक्रार करत नाहीये, मनाने करत आहेत...तू खूप नशीबवान आहेस , कळतय का तुला??"
"म्हणजे?" रोहिणी
"म्हणजे त्यांनाही तुझी धावपळ दिसते, तुझ्या कष्टांची जाणीव आहे..तू गृहिणी आहेस पण म्हणून तू स्वतःला कोशात का अडकवतेस? माझ्याशिवाय कोणाचं कस होणार? सगळे उपाशीच राहतील, असा ग्रह नको करुन घेऊस...होतात गोष्टी सुरळीत. तुझ्याइतक्या अचूक नाही होणार पण होतात ना,थोडी मोकळीक दे स्वतःला... होऊदे जरा गोष्टी निवांत...उशीर होऊदे एखाद्या दिवशी..जा जरा फिरायला मैत्रिणीबरोबर, तुला गायला आवडायचं ना? कर ना प्रॅक्टिस..कविता करायचीस तू, काढ वेळ.हातात लेखणी घे परत. माझी पूर्वीची ताई दिसतच नाही कुठे? स्वतः ची ओळख पुसू नकोस अशी."
"अगं वेळ नाही मिळत, काय करणार.. ईच्छा होत असते खूप " रोहिणी
"ताई आता वेळ नाही काढणार तर कधी काढणार? अर्ध आयुष्य सरलय अापलं आता.. मुलं आता मोठी झालीत. ती स्वतंत्र झालीत..दाजी ही रिटायर होऊन त्यांच्या आवडत्या गोष्टी करत आहेत..तू अजून तिथेच आहेस... मुलं लहान असतात तेव्हा ठीक आहे, पण आता त्यांनाही कळतय. त्यांना करुदेत त्यांचा चहा कॉफी, नाश्ता त एकच पदार्थ कर सगळ्यांसाठी..खातील की सर्व, एक एक दिवस सगळ्यांची आवड करायची..आणि हो तुझीही आवडती डिश असली पाहिजे त्यात... एकत्र बसा सगळे ..का शेवटी थांबतेस?...आपण च आपल्याला मान द्यायचा असतो तेव्हाच सगळे आपला मान ठेवतात..."
"मी खूप आवडीने करते सगळ्यांसाठी'"
"रोहिणी तुला वाटतं का मला दिसत नाही ते, अगं रोज म्हणतो आपण फिरायला जाऊयात..ही नको म्हणते कारण ध्रुव ची यायची वेळ असते..मुलांना आता एकट फिरायच असत... आपणच जाऊ म्हणल तर ही कधी तयारच नसते.. " दाजी, कविता व ध्रुव आत येत म्हणाले.
"आई पुढच्या महिन्यात, दोघांची उटी ची तिकिटे काढा आणि मस्त फिरून या...मी करेल सगळ घरचं , आणि ध्रुव आहे मदतीला" कविता म्हणते.
"हो, just chill mom" ध्रुव आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.
"म्हणजे तुम्हाला आता माझी गरज उरली नाही का?" रोहिणीच्या डोळ्यात पाणी येते.
" हे बघ परत चुकतेस, तू हवीच आहेस कायम आम्हाला पण तुझ्या स्वतंत्र अस्तित्वासकट, स्वतःकडे दुर्लक्ष न करता आणि आमच्यासाठी स्वतःची ओळख पुसू नकोस.." कविता
"हो ना तुझ्यासारखी परफेकशनिस्ट कोणी आहे का घरात?" ध्रुव आईला समजावत म्हणतो.
"बघ ताई, इतकी गुणी मुलं आणि समंजस नवरा मिळालाय तुला" रितिका रोहिणी कडे बघत म्हणते...
"खरंच ग ,इतका माझा विचार कोणी करत असेल वाटलच नव्हत कधी..आता कळलय मला. आपण इतकं गुंतून जातो की प्रत्येक जण आपल हित-अहित समजू शकतो हे माझ्या लक्षात आलेच नाही कधी.., गरज लागली तर आहेच मी...बहिणाबाई तुम्हाला स्पेशल थँक्यू" रोहिणी
" बरं चला, स्वयंपाक तयार आहे, सगळेच जेवायला बसुयात..आणि रोहिणी तुझे सगळे आवडते पदार्थ आहेत बरका?" दाजी रोहिणीला सांगतात
सगळे हसतात... रोहिणीचे डोळे आनंदाश्रू ने भरून येतात. .....
...समाप्त ...
©️शीतल अजय दरंदळे
(कथा कशी वाटली ,नक्की कळवा , धन्यवाद)
(कथा कशी वाटली नक्की कमेंट मधून कळवा)


1 टिप्पण्या
मस्त
उत्तर द्याहटवाNo spam messages please