Ad Code

Responsive Advertisement

कथा - जान आणि जानू

कथा  - जान आणि जानू

-------

"ए सांगू नकोस ग कोणाला! "" प्रिया फोनवर नेहाला कुजबुजत सांगते.

"अग पण घरी धक्का बसेल सगळ्यांना"  नेहा

" ते बघू नंतर, पण आमचं प्रेम जिंकलं पाहिजे,घरी कधीच मान्य नाही करणार" प्रिया नेहाला समजावते.

"बघ बाई, रिस्क आहे, अमर पण तयार आहे ना?"

"त्याचीच कल्पना,आज रात्रीच निघणार" प्रिया अजून हळू आवाजात बोलून फोन ठेवते.

प्रियाच्या पोटात गोळा, भीतीने तिला थोडं ताण आल्यासारखं वाटतं. 

तितक्यात फोन वाजतो, स्क्रीन वर नाव "जानू". 

प्रिया लगेच फोन उचलते. इकडे तिकडे बघत खोलीच्या कोपऱ्यात बसून हळूच म्हणते " जानू टेन्शन आलय रे"

"प्रिया मेरी जान" !! ,बस थोडा वेळ मग आपण एकत्र येऊ कायमचे, डर मत, तू बॅग भरलीस का? " अमर

"हो, तू किती वाजता येशील?  रात्री 1 वाजता?" प्रिया विचारते.

"हो थोडं आधीच येईल, कोपऱ्यावर थांबतो, बाईक चा लाईट मारेन तुझ्या खिडकीवर,तू लगेच ये" अमर सांगतो.

"ओक जानू" प्रिया

"जान, I love you" अमर

अमर अगदीच सामान्य कुटुंबातला आणि प्रिया गडगंज. अमरचे वडील रिक्षाचालक, तर प्रिया च्या वडिलांचा स्वतःचा यशस्वी व्यवसाय.  तर या जान आणि जानूचे  प्रेम जुळले ते कॉलेज मध्येच. प्रियाला तर माहिती होतेच अमरला घरी कधीच जावई म्हणून मान्य करणार नाही. म्हणून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय. कोणच्याही नकळत दोघांचा छूमंतर व्हायचा प्लॅन.

रात्री सर्व ठरल्याप्रमाणे...अमर येतो बाईक चे हेडलाईट प्रियाच्या खिडकीवर मारतो. प्रिया आपली बॅग व मोबाईल घेऊन,घरी काही न कळू देता अगदी सावकाश निसटते. अमरच्या कडे बॅग देऊन मागच्या सीट वर दोन पाय दोन्हीकडे टाकून बसते. चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेला तर अमरच्या अर्धवट  चेहऱ्यावर रुमाल बांधलेला. अमर सुसाट निघतो. दोघांच्या मनात भीती असतेच.

तास दिडतास चालवून झाल्यावर अमर बाईक थांबवतो. प्रिया उतरून त्याच्याबाजूला उभी राहते. प्रिया स्कार्फ सैल करते. अमर रुमाल काढतो. दोघेही एकमेकांकडे बघून तोंडभर हसतात. मोठा सुस्कारा सोडून एकमेकांना टाळ्या देत अमर जोरात म्हणतो

" yes, we did it. आता आपण दोघेच, मेरी जान और मै" अमर दोन्ही हात उघडून उभा राहतो.

"हो, इतकी खुश आहे ना आज मी,अस वाटतंय स्वातंत्र्य मिळालाय, पंख पसरुन पहिल्यांदा झेपावलेय इतक्या दूरवर"

अमर तिला जवळ ओढून गाऊ लागला " हमने घर छोडा है, रसमोको तोडा है..."

""शू..आपण रस्त्यावर आहोत, आपण निघालोय कुठे ??  ते तर सांग"

"माझ्या मित्राचं गाव आहे, अजून तास दिडतासातच पोहचू " अमर तिला सांगतो.

गाडी परत सुरू होते, दोघांच्या स्वप्नाच्या गावी. झुंजूमंजू होते, पक्षांचा किलबिलाट. हळूहळू सूर्यनारायण दर्शन देतात. ते दोघे मित्राच्या त्या घराशेजारी पोहोचतात. प्रिया उडी मारून गाडीवरून उतरते. खूप छान वातावरण असतं, एकदम हिरवेगार चोहीकडे, जवळ विहीर असते. 

 अगदी चित्रात रेखाटल्याप्रमाणे ते झोपडीवजा घर उभे असते. अमर धक्का मारून दार उघडतो. आत बरीच धूळ,जाळ्या असतात, थोडी भांडी, स्टोव्ह, अगदी थोडेच केस शिल्लक असलेला झाडू, छोटीशी खाट , दोन बादल्या , छोटीशी कोपऱ्यात मोरी व एक कोळ्यांच्या जाळ्यात झाकला गेलेला बल्ब. प्रिया ते पाहून ठसकाच लागतो.

"आपण इथे राहायचं? किती घाण आहे इथे? इतकी लहान खोली?" प्रिया चेहऱ्यावर नाराजी दर्शवत विचारते.

"जान मी साफ करतो, तू निवांत बस बाहेर" अमर हसून.

प्रिया त्याचा समजूतदारपणा पाहून सुखावते आणि बाहेर बसते. थोडयावेळाने अमर हाक मारतो.

" जान ये आत" प्रिया उठून आत जाते आणि पाहते तर खोलीचा कायापालट झाला असतो, सर्व चकाचक. 

ती प्रेमाने अमरकडे पाहते, " जानू किती गोड आहेस रे तू, पूर्ण आयुष्य काढेल मी तुझ्यासोबत या खोलीत" अमर तिचे गोडगुलाबी बोल ऐकून तिच्या जवळ यायला लागतो.  प्रिया त्याला हाताने थांबवत " तिथेच थांब, फ्रेश तर हो आधी, स्वतःचा अवतार पहिला आहेस का?" अमर तसाच वळून विहिरीकडे जाऊन बादली भरून आणतो आणि आंघोळ करून फ्रेश होतो. 

प्रिया तोपर्यंत बॅग उघडून सर्व खाण्याचे सामान बाहेर काढते. स्टोव्ह पेटवायचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर प्रिया अमरला हाक मारते. अमर येऊन स्टोव्ह पेटवतो. आणलेली सर्व पाकिटे फुटतात. पहिला चहा, बिस्कीट खाऊन तरतरी येते.

" जानू फोन चालू करू का आता?" प्रिया विचारते.

" नको, फोन करत असतीलच घरचे, अजून चार पाच दिवस अजिबात फोन चालू नको करायला. जेवायला काय बनवणार आहेस? मी सामान आणतो"

"मला फक्त मॅगी आणि चहा येतो, जानू" प्रिया बारीक चेहरा करून सांगते.

"ठीक है, तुम्हारे प्यार मे मॅगी खाके दिन निकालेंगे" प्रिया हे ऐकून वेडावतेच, त्याच्या मिठीत जाते. जानू आणि जान तसेच घट्ट मिठीत... कितीतरी वेळ. जानू तिच्या मानेवर ओठ टेकावतो. जान शहारते.तो तिच्या ओठावर ओठ टेकवणार इतक्यात ती मागे सरकते "जानू, लग्न झाल्यावर बाकीचं..." जानू हसतो. तिच्या कपाळावर ओठ टेकवून निघतो.

अमर गेल्यावर प्रिया एकटीच बसते, बाहेर येते. विहिरीवर जाऊन पाणी ओढून घेते. स्वच्छ गाळून पिण्यासाठी भरून ठेवते. मॅगी करायला घेते. बराच वेळ जातो. अमर सामान घेऊन आलेला असतो. दोघे एका ताटातच जेवतात. व लगेच झोपी जातात.

सकाळी अमर उठलेला असतो, प्रिया उठते पण त्रासलेल्या चेहऱ्यानेच " किती डास चावले रात्री, अजिबात झोप आली नाही. पोटही खूप दुखतंय"

"अग, इथे असंच असणार, मी डास मारायची उदबत्ती आणली पण तुला वासाचा त्रास होतो म्हणून नाही लावली, पोट का दुखतंय?" अमर काळजीने विचारतो.

"मला अपचन झालं बहुतेक,  इथे मेडिकल आहे का, मी गोळी आणते?"

" छे , मेडिकल खुप दूर आहे, तू कालच का नाही सांगितलंस?"

"मला कसं कळणार माझे पोट दुखणार आहे ते?"  चिडक्या स्वरात

" माझ्यावर का चिडतेस? सकाळपासून भूक लागलीये मला, फक्त मॅगी खाल्ली आहे काल" अमरही चिडून ओरडतो.

प्रिया रडू लागते. अमर तिच्याजवळ जाऊन सॉरी म्हणतो व गरमगरम चहा बनवून तिला देतो. प्रियाला बरं वाटतं. ती फ्रेश होऊन डाळ भात करायचा विचार करते. पण कुकरशिवाय काही जमत नाही. सगळं उतू जातं, राहिलेलं करपत. मग शेवटी मॅगी खाऊनच दोघे जेवण उरकतात.

जेवण झाल्यावर दोघे पैशांचा हिशोब मांडतात. पुढचे काही दिवस जातील इतकेच पैसे शिल्लक असतात.

 अमर म्हणतो "मला काही काम पाहावे लागेल. तू घरीच थांब"

"पण मी एकटी काय करू इथे? ना कोणी जवळपास आहे? ना टीव्ही ना फोन??"

"पण जगण्यासाठी पैसे लागतातच ना?"

" तुझ्याकडे नाहीत तर मला सांगायचे ना, मी आणले असते पप्पाकडून"

"तू काय बोलतेस? आपण पळून आलोय, पुढे संसाराची स्वप्न पाहतोय, काही वर्षे हलाखीत काढावी लागतीलच."

"वर्ष????मला सवय नाहीये असलं राहायची ,!!?" प्रिया रागाने

" मग मला ही मॅगी खायची सवय नाहीये, खातोय ना?"

 अमर रागाने बोलून उठून निघतो , गाडीचा लांब गेल्याचा आवाज येतो.

संध्याकाळी अमर घरी येतो तेव्हा छान काहीतरी शिजल्याचा वास येत असतो. तो पटकन आत येतो. तर सगळीकडे पसारा असतो. प्रिया त्याच्याकडे पाहून उत्साहात म्हणते " हे बघ, मी खिचडी केलीये दोघांसाठी" 
अमर कसनुस हसतो, त्याला भूक लागलेली असतेच. दोघे पटकन खाऊन घेतात. भूक लागल्याने खारट झालेली खिचडीही अमर पटापट गिळतो. प्रिया ला ही आवडत नाही, तिच्या डोळ्यात पाणी येते.

अमरला वाईट वाटतं, दोघे ही मिळून घर आवरतात. 

प्रिया अमरच्या खांद्यावर डोके ठेऊन म्हणते, "सॉरी जानू, खूप त्रास देतेय ना तुला, सारखी भांडणंच होत आहेत आपली"

अमर तिच्याकडे प्रेमाने बघून म्हणतो " सॉरी , मी पण उगीच चिडलो"

प्रिया त्याच्याकडे बघत म्हणते "अवघड आहे, मला कशाचीच सवय नाहीये, आमच्या घरी सगळं आपोआप कोणीतरी करतच, मला वेळच आली नाही रे"

"मी आज काम बघायला गेलो तर graduation नाही म्हणून खूप हलकं काम देतायेत ग सगळे. आणि महिन्याला फक्त काही हजारच हातात येतील. इतक्या कमी पैशात तर चांगले घर पहायचे म्हणले तरी भाडे परवडणार नाही" अमर काळजीत म्हणतो.

" आपण घाई केली का रे अशी पळून यायची?" प्रिया

" अजून सर्व अर्धवट आहे ग आपलं, ना शिक्षण, कशाची जबाबदारी मी ही कधी घेतली नाहीये. घरी अण्णा आणि आई पाहतात सारं, कमी पैसे आले तरी कसं भागवतात सगळं ?? कधी विचारच नाही केला मी , कमी पैश्यातही माझे सारे हट्ट पुरवतात"

' मला खूप आठवण येतीये घरच्यांची, मी पप्पाना सोडून कधीच राहिली नाहीये " प्रियाचे डोळे पाणावतात.

"मलाही येतेय ग, पण उशीर झाला खूप, आधीच विचार करायला हवा होता" अमर खाली डोके घालून बसतो.

तेवढ्यात दार वाजते. अमर मान  वर करून पाहतो तर अण्णा आणि प्रियाचे पप्पा. आणि त्यांच्यामागे कोणीतरी असते.  अमर प्रिया दोघे घाबरून उभे राहतात.

" अरे वा, छान संसार थाटलाय दोघांनी" प्रियाचे पप्पा खोलीत बघत म्हणतात.

 अण्णा त्वेषाने अमरकडे येतात आणि त्याचा घट्ट कान पकडून ओरडतात " काय रे? या पोरीला तू पळवून आणलं?? कोणाच्या जबाबदारीवर??" अण्णा हात उगारतात पण प्रियाचे पप्पा त्यांना थांबवून म्हणतात, 

"आपलं काय ठरलंय विश्वासभाऊ? या दोघांचा निर्णय आहे ना?आता आपण फक्त लग्न लावून द्यायचंय, करू दे यांना सुखाने संसार, माझी ना नाही...गुरुजी हार आणा बरं, चला मंत्र म्हणायला सुरुवात करा" मागाहून खरंच गुरुजी हार घेऊन येतात.

प्रियाला हे सगळं पाहून धक्का बसतो  " पप्पा, हे काय करताय? लग्न नको नको.मला नाही करायचं" 

"अण्णा मला ही नाही करायचं, उगीच पळून आलो आम्ही, थांबवा हे सगळं" अमर  ही कळवळून विनंती करतो.

"अरे, नाही का म्हणताय? त्यासाठीच तर तुम्ही पळून आलाय, प्रिया तू मला विश्वासात घेऊन सांगायचं एकदा तरी, आता जमाना बदलला आहे, मी काही गरीब श्रीमंत भेद मानत नाही. पण हे असं पळून?????? खूप दुखावलंस मला" प्रियाचे पप्पा दुखावलेल्या स्वरात म्हणतात.

"पप्पा, खरंच सॉरी, आम्ही तुम्हा कोणाचाच विचार केला नाही. चुकीचा निर्णय घेतला. पण खरी जबाबदारी आल्यावर कळलं की हे वय नाही. आधी स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे" प्रिया रडवेल्या आवाजात

"हो काका, मी स्वतः माफी मागतो.आता मी पूर्ण शिक्षण पूर्ण करणार, खूप मेहनत घेणार आणि स्वतःच्या पायावर उभा राहणार आणि नंतरच लग्नाचा विचार" अमर सर्वांना आश्वस्त करतो.

"म्हणजे लग्न कॅन्सल? कॉलेज परत सुरू? आपापल्या घरी परत येणार ना?" प्रियाचे पपा विचारतात.

दोघे जोरात " हो हो हो"

पप्पा प्रियाला जवळ घेतात. प्रिया मुसमुसुन रडू लागते. अण्णा अमरच्या पाठीत धपाटा घालून त्याला म्हणतात," परत जर कधी तिला रडवलस तर याद राख, माझा हात आहे आणि तुझी पाठ"

अमर  अण्णांची माफी मागून त्यांच्या पाया पडतो. प्रियाही पाया पडते. दोघांना आशीर्वाद देऊन सगळे निघतात.

 प्रियाची मैत्रीण नेहा बाहेर आल्यावर प्रियाला घट्ट मिठी मारते आणि कानात म्हणते, "तुमच्या काळजीने सांगितलं मी सगळं, सॉरी" प्रिया आणि तिचे पपा तिचा अपराधी चेहरा पाहून जोरात हसायला लागतात. 

प्रिया आणि अमर तिला नजरेनेच थँक्स म्हणतात.

आणि अशा प्रकारे जान आणि जानूची गाडी परत रुळावर येते..

....समाप्त.......

© शीतल अजय दरंदळे, पुणे
aolsheetal@gmail.com

(शेवटी असंच)

" अल्लड, कोवळ्या त्या वयात
स्वप्नही मोठी फिल्मी असतात,
घसरणे ही होते नकळत कधी
तरी  "आपलेच" तेव्हा सावरतात...





Reactions

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

No spam messages please